• प्रभागफेरीएनविभाग
  • अंतर्गत भाग : घाटकोपर, विक्रोळी

केवळ कोकणातून नव्हे, तर आसपासच्या राज्यांतून नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने अनेकांनी मुंबईची वाट धरली आणि एकेकाळी ओसाड असलेल्या या भागात हळूहळू लोकवस्ती आकारास येऊ लागली. घाटकोपर पूर्वेला असलेल्या खाडीत हळूहळू भरणी होऊ  लागली. या भरणीवरच उभे असलेले डॉ. हेडगेवार उद्यान बहरले. आजघडीला हे उद्यान घाटकोपरवासीयांसाठी विरंगुळ्याचे ठिकाण बनले आहे. त्याशिवाय सुमारे ३५ छोटी-छोटी उद्याने-मैदाने घाटकोपर परिसरात आहेत.

पुनर्विकासाच्या निमित्ताने मुंबईत अनेक ठिकाणी टोलेजंग इमारती उभ्या राहात आहेत. पण घाटकोपर गावाने आपले अस्तित्व आजही टिकवून ठेवले आहे. या गावात अनेक मंदिरे असून या मंदिरांमध्ये वर्षभर काही ना काही उत्सव सुरू असतात. मराठी, गुजराती, जैन, वैष्णवांची संख्या या भागात मोठी आहे. त्यामुळे गणेशोत्सव, नवरात्रोत्सव हे उत्सव मोठय़ा दणक्यात येथे साजरे केले जातात.

प्रभागांच्या समस्या

टेकडय़ांवरील वस्त्या धोकादायक

घाटकोपर परिसरातील टेकडय़ांवर अनेक वस्त्या उभ्या राहिल्या आहेत. उंचावर असलेल्या या वस्त्यांमधील रहिवाशांना मुख्य प्रश्न भेडसावतो तो पाण्याचा. उंचावर असल्याने तिथपर्यंत पाणी पोहोचविणे पालिकेला जिकिरीचे बनले आहे. काही ठिकाणी जलकुंभ उभारून टेकडीवरच्या वस्त्यांपर्यंत पाणी पोहोचविण्याचा प्रयत्न पालिकेकडून करण्यात आला आहे. मात्र तरीही रहिवाशांना अपुरेच पाणी मिळत आहे.

दाटीवाटीने उभ्या असलेल्या झोपडपट्टय़ा

घाटकोपरमध्ये केवळ टेकडय़ांवरच नव्हे तर अन्य काही भागांतही झोपडपट्टय़ा उभ्या आहेत. विक्रोळीमध्येही तसेच काहीसे चित्र आहे. अपुरा पाणीपुरवठा, अस्वच्छता, मलनिस्सारण वाहिन्यांच्या जाळ्याचा अभाव, आरोग्याचे प्रश्न असे एक ना अनेक प्रश्न झोपडपट्टीवासीयांना भेडसावत आहेत. अस्वच्छतेमुळे डासांचा प्रादुर्भाव होत असून त्यामुळे अधूनमधून या भागातील रहिवाशांना साथीच्या आजारांचा सामना करावा लागत आहे.

एलबीएस मार्गामुळे कोंडी

पूर्व उपनगरांना जोडणारा लालबहाद्दूर मार्ग घाटकोपरमधून जातो. वाढती लोकसंख्या आणि वाढत्या वाहनसंख्येमुळे या मार्गावरील वर्दळ प्रचंड वाढली आहे. हा रस्ता अरुंद असून त्याच्या रुंदीकरणाचा विचार पालिका प्रशासन पातळीवर झाला आहे. मात्र निरनिराळी विघ्न आल्यामुळे गेली अनेक वर्षे या मार्गाच्या रुंदीकरणाचा प्रश्न रेंगाळला आहे. त्यामुळे घाटकोपरवासीयांना कायम वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

खाडी आक्रसली

घाटकोपरमधील काही झोपडपट्टय़ा खाडीलगत उभ्या राहिल्या आहेत. तेथे झोपडपट्टी दादा सक्रिय असून खाडीमध्ये भराव टाकून त्यावर झोपडय़ा बांधण्याचा घाट आजही घातला जात आहे. त्यामुळे खाडीवरील अतिक्रमण वाढतच असून त्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्याशिवाय मलजल आणि सांडपाणी खाडीतच सोडून देण्यात येत असून त्यामुळे समुद्राची मोठी हानी होत आहे. मात्र गेली अनेक वर्षे या प्रश्नाकडे कानाडोळा केला जात आहे.

अन्य पक्षांच्या कमकुवतपणाचा भाजपला फायदा

साधारण ५० वर्षांपूर्वी घाटकोपर पूर्वेला जनसंघाचे, तर पश्चिमेला काँग्रेसचे वर्चस्व होते. रा. ता. कदम यांच्या रूपात काँग्रेसने एक उत्तम अभ्यासू नगरसेवक घाटकोपरला मिळाला होता. मात्र काँग्रेसला या भागातील वर्चस्व टिकविता आले नाही किंबहुना काँग्रेसला मतदारांची नस ओळखता आली नाही. त्यामुळे हळूहळू या परिसरावरून काँग्रेसची पकड सुटत गेली. कालौघात जनसंघाची जागा भाजपने घेतली आणि घाटकोपर पूर्वचा गड भाजपकडे आला. या परिसरात वास्तव्यास असलेल्या गिरणी कामगारांमुळे कामगार नेते डॉ. दत्ता सामंत यांच्या कामगार आघाडीचे काही काळ येथील निवडक प्रभागांवर वर्चस्व होते. दरम्यानच्या काळात शिवसेनेनेही या विभागात आपले पाय रोवायला सुरुवात केली होती. परंतु पक्षांतर्गत कलहाचा शिवसेनेला फटका बसला. आजघडीला घाटकोपरमध्ये शिवसेना जेमतेम आपले अस्तित्व टिकवून आहे. मनसेतून शिवसेनेत आलेले आमदार राम कदम आणि गेल्या सहा विधानसभा निवडणुकांमध्ये विजयी झालेले प्रकाश मेहता यांच्या बळावर घाटकोपरवर भाजपने घट्ट पकड घेतली आहे. पालिकेच्या मागील निवडणुकीत राष्ट्रवादीच्या राखी जाधव विजयी झाल्या. पण राष्ट्रवादी पक्षामुळे नव्हे, तर या परिसरातील जाधव कुटुंबाच्या सुभेदारीमुळे. आजघडीला काँग्रेसचे या विभागात पूर्णपणे पानीपत झाले आहे. तर मनसेची ताकदही कमी झाली आहे.

05

मेट्रोमुळे प्रवासी, वाहनांची वर्दळ

सध्या वर्सोवा ते घाटकोपर अशी मेट्रो रेल्वे धावत आहे. त्यामुळे वर्सोवा येथून पूर्व उपनगरात जलदगतीने पोहोचण्याची सुविधा मुंबईकरांना उपलब्ध झाली आहे. घाटकोपर रेल्वे स्थानकालाच लागून असलेल्या मेट्रो स्थानकामुळे सकाळी आणि संध्याकाळी या परिसरात प्रवाशांची प्रचंड वर्दळ असते. स्थानक परिसरात रिक्षा-टॅक्सीची प्रचंड प्रमाणात ये-जा सुरू असते. परिणामी, या परिसरावर प्रचंड ताण पडू लागला आहे. त्यातच फेरीवाल्यांनीही पदपथावर पथाऱ्या पसरल्यामुळे रेल्वे स्थानक परिसर बकाल बनू लागला आहे.

06

वाहतूक कोंडी हा घाटकोपरवासीयांचा मोठा प्रश्न. गेली अनेक वर्षे हा प्रश्न पालिकेला सोडविता आलेला नाही. घाटकोपरच्या पूर्व भागातून पश्चिमेला जाण्यासाठी अध्र्या तासाहून अधिक वेळ लागतो. केवळ वाहनचालकच नव्हे तर पादचारीही या प्रश्नामुळे हैराण झाले आहेत.

अतुल भयाणे, सामाजिक कार्यकर्ते

खाचखळग्यांनी भरलेले अरुंद रस्ते, गाईंचा स्वैरसंचार आणि वाहतूक कोंडी अशा वेगवेगळ्या समस्यांनी या परिसरातील रहिवाशी हैराण झाले आहेत. घाटकोपरमधील रस्ते अरुंद असून त्यावर खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात या रस्त्यांवरून चालताना तारेवरची कसरत करावी लागते. चालताना अंदाज चुकला तर पाय मुरगळण्याची वेळ येते. ज्येष्ठ  नागरिकांना रस्त्यामुळे प्रचंड त्रास होत आहे.

हरेन र्मचट, स्थानिक