राज्यातील दहा महानगरपालिकांच्या  निवडणुकीसाठी ( Municipal Corporation)  अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असल्यामुळे मुंबईसह सर्वच ठिकाणी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची झुंबड उडालेली आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबई महानगरपालिकेसाठी (BMC)केवळ १६६ उमेदवारांनी अर्ज भरले होते. मात्र, राजकीय पक्षांकडून एबी फॉर्मचे वाटप करण्यात आल्यानंतर कालपासून उमेदवारांनी अर्ज भरण्यास सुरूवात केली आहे. दरम्यान, वादग्रस्त जागांवरून होणारी बंडखोरी टाळण्यासाठी शिवसेनेने शेवटपर्यंत उमेदवारांची नावे जाहीर केली नव्हती. मात्र, एबी फॉर्म न मिळालेल्या उमेदवारांनी कालपासूनच पक्षाला अखेरचा ‘जय महाराष्ट्र’ करण्यास सुरूवात केली आहे. कालच विद्यमान नगरसेवक नाना अंबोले आणि दिनेश पांचाळ यांनी बंडखोरी केल्यानंतर आता शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या दादर आणि प्रभादेवीमध्येही बंडखोरी झाली आहे.  प्रभादेवीतील शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकर यांना तिकीट दिल्याने शिवसेनेचे नाराज महेश सावंत यांनी त्याविरोधात बंड पुकारले आहे. महेश सावंत हे प्रभादेवी वॉर्ड १९४ मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे प्रभादेवी विभागात शिवसेनेचाच अंतर्गत सामना रंगणार आहे. दादर, माहिम, प्रभादेवी हे शिवसेनेचे बालेकिल्ले मानले जातात. यापैकी दादर विभागातील सात जागांवर गेल्या निवडणुकीत मनसेचे उमेदवार निवडून आले होते. त्यामुळे शिवसेनेच्या वर्चस्वाला मोठा धक्का बसला होता. यावेळीही शिवसैनिक एकमेकांविरुद्ध उभे ठाकणार असल्याने मतांच्या विभागणीमुळे शिवसेनेला फटका बसू शकतो. काल रात्री उशीरापर्यंत मातोश्रीवर सरवणकर आणि महेश सावंत यांच्यात वाटाघाटी सुरु होत्या. मात्र, मातोश्रीने समाधान सरवणकर यांच्या पारड्यात दान टाकल्याने महेश सावंत यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.

 

Live Updates
19:59 (IST) 3 Feb 2017
नाशिक: शिवसेनेकडून प्रभाग २८, २९ आणि ३ मध्ये डबल एबी फॉर्मचे वाटप; गोंधळाचे वातावरण
19:58 (IST) 3 Feb 2017
नाशिक: शिवसेनेच्या एबी फॉर्म वाटपात गोंधळ; प्रभाग ४ मध्ये एबी फॉर्म न पोहचल्याने ४ उमेदवार पुरस्कृत करण्याची शिवसेनेवर नामुष्की
19:36 (IST) 3 Feb 2017
पुण्यात इच्छुकांना उमेदवारी न मिळाल्याने भाजप कार्यालयाबाहेर गर्दी, पोलीस बंदोबस्तात वाढ
19:36 (IST) 3 Feb 2017
पुण्यातील भाजप कार्यालयाबाहेर शहाराध्यक्ष योगेश भोगले यांच्या फोटोला नाराज कार्यकर्त्यांनी काळ फासलं
19:35 (IST) 3 Feb 2017
पिंपरी चिंचवडमध्ये भाजपने फक्त तीन जागा दिल्याने रिपाई नाराज
19:34 (IST) 3 Feb 2017
पिंपरी चिंचवडमध्ये भाजपने रिपाईसोबतची युती तोडली
19:33 (IST) 3 Feb 2017
सोलापूरात काँग्रेस-राष्ट्रवादीने शेवटच्या दिवशी वाटले एबी फॉर्म
19:32 (IST) 3 Feb 2017
सोलापूरात काँग्रेसने १०२ जागांवर उमेदवार दिले; राष्ट्रवादी ६२ जागा लढवणार
19:31 (IST) 3 Feb 2017
शिवसेनेचे माजी नगरसेवक बाळा घाग आणि पत्नी संगीता घाग यांचा राष्ट्रवादीतून उमेदवारी अर्ज
16:47 (IST) 3 Feb 2017
आशिष शेलार संपूर्ण मुंबईत रोड शोद्वारे प्रचार करणार
16:47 (IST) 3 Feb 2017
विनोद तावडे आणि आशिष शेलार मराठी भागांमध्ये प्रचार करणार
16:46 (IST) 3 Feb 2017
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईत प्रचारासाठी दहा सभा घेणार
16:19 (IST) 3 Feb 2017
ठाण्यातील ज्येष्ठ शिवसैनिक बाळा घाग यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
15:58 (IST) 3 Feb 2017
पिंपरीत जेलमधून भरला उमेदवारी अर्ज; आरोपी अरविंद साबळे बसपाच्या तिकीटावर निवडणूक लढणार
15:08 (IST) 3 Feb 2017
शिवसैनिकांचा विरोध डावलून महापौर स्नेहल आंबेकर यांना वॉर्ड क्र. १९८ मधून उमेदवारी
15:03 (IST) 3 Feb 2017
मुंबईत भाजप आणि मित्रपक्षांचा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित; भाजप १९५ , रिपब्लिकन पक्ष २५, रासप ५ आणि शिवसंग्राम ४
13:44 (IST) 3 Feb 2017
कोकण विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक; १२ वाजेपर्यंत ठाणे जिल्ह्यात ३४.३४ टक्के मतदान
13:39 (IST) 3 Feb 2017
माजी महापौर विनायक पांडे आणि महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांच्या गटात हाणामारी
13:38 (IST) 3 Feb 2017
नाशिकच्या चांडक सर्कलमध्ये शिवसैनिकांच्या दोन गटांमध्ये हाणामारी; पोलिसांचा सौम्य लाठीमार
13:37 (IST) 3 Feb 2017
ठाण्यात भाजपच्या कार्यालयात धक्काबुक्की
13:35 (IST) 3 Feb 2017
मनसेने १७५ दिले एबी फॉर्म
13:35 (IST) 3 Feb 2017
प्रभादेवीमध्ये शिवसेनेमधील अंतर्गत संघर्ष पेटला, समाधान सरवणकर यांना तिकिट दिल्याने सेनेत बंडखोरी, महेश सावंत अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार
13:33 (IST) 3 Feb 2017
प्रभादेवीमध्ये शिवसेनेमधील अंतर्गत संघर्ष पेटला, समाधान सरवणकर यांना तिकिट दिल्याने सेनेत बंडखोरी, महेश सावंत अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार
13:32 (IST) 3 Feb 2017
शिवसेनेत बंडखोरी सुरुच, शिवसेनेचे माजी शाखाप्रमुख अभिषेक सावंत यांच्या पत्नी आदिती सावंत वॉर्ड क्र. २००मधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार