दोन दिवसांत २० हजार ट्विट्स, १० हजार फेसबुक पोस्ट, ५०० ध्वनीचित्रफिती प्रसारित

वर्षभर अभ्यास न केलेले विद्यार्थी परीक्षेचे दिवस जवळ आले की संबंधित विषयाचे मिळेल ते पुस्तक हातात घेऊन वाचू लागतो. उरलेल्या दिवसांत पूर्ण अभ्यास करण्याचा त्याचा अट्टहास असतो. असाच अट्टहास सध्या मुंबई महापालिकेच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांचा दिसून येत आहे.

उपलब्ध सर्व मार्गानी लोकांपर्यंत पोहोचण्याचा ते प्रयत्न करत आहेत. यामुळे घरोघरी प्रचार करण्याबरोबरच शनिवारी आणि रविवारी सर्वच राजकीय पक्षांनी समाजमाध्यमांवरूनही जोरदार प्रचार केला. महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी समाजमाध्यमांचा वापर होत असलेली ही पहिलीच निवडणूक आहे.

या दोन दिवसांत मुंबईच्या निवडणुकांच्या संदर्भात तब्बल २० हजारहून अधिक ट्वीट्स करण्यात आले तर दहा हजारांच्या सुमारास फेसबुक पोस्ट करण्यात आल्या. इतकेच नव्हे तर सुमारे पाचशे व्हिडीओ क्लिप्सही अपलोड करण्यात आल्या आहेत. इन्स्टाग्रामवर दीड हाजाराच्या सुमारास छायाचित्र अपलोड करण्यात आले आहे.

विविध समाजमाध्यमांवर उपलब्ध असलेल्या मुंबई महापालिका ट्रेंड्समधून ही माहिती मिळवण्यात आली आहे. रविवारी सकाळपासून ते रात्री आठ वाजेपर्यंत बीएमसी विषयासंदर्भात २७०० ट्वीट्स, बीएमसी हा हॅशटॅग वापरून १४०० ट्वीट्स, बीएमसी पोल हा हॅशटॅग वापरून १३००, बीएमसी इलेक्शन नावाने ८१० तर बीजेपी फॉर मुंबई नावाने १८०० ट्वीट्स करण्यात आले होते.

शिवसेनेचा हॅशटॅग वापरून १३०० तर शिवसेनेचे अधिकृत ट्विटर हँडल वापरून आणि त्या ट्विटर हँडलवरून करण्यात आलेल्या ट्वीट्सची संख्या ३३०० इतकी होती. काँग्रेस फॉर मुंबई या हॅशटॅगचा वापर आत्तापर्यंत तब्बल ५९ लाख ७० हजार लोकांनी केला आहे. तर हा हॅशटॅग देशभरात ७० लाख लोकांपर्यंत पोहोचला आहे, अशी माहिती पक्षाच्या समाजमाध्यम कक्षातर्फे देण्यात आली.

शनिवार आणि रविवार या दोन दिवसांमध्ये घेण्यात आलेल्या प्रचार सभा, प्रचार फेऱ्या, स्थानिक उमेदवारांची भाषणे आदींच्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम पोस्टही सातत्याने होत होत्या. या पोस्टना लाइक्स आणि शेअरचे प्रमाण खूप जास्त होते. इतर दिवशी २०० पर्यंत मिळणाऱ्या लाइक्सचे प्रमाण शनिवार आणि रविवार या दोन दिवसांत ५०० ते १००० लाइक्सपर्यंत पोहोचल्याचे विविध राजकीय पक्षांच्या समाजमाध्यम कक्षातील लोकांनी सांगितले.

तर मुंबईच्या निवडणुकांची माहिती मिळवण्यासाठी ‘गुगल शोधकां’ची संख्याही या दोन दिवसांत वाढली आहे. मुंबई निवडणुकीच्या संदर्भात माहिती मिळवण्यासाठीच्या प्रमाणात शनिवार, रविवारी ५०० टक्क्यांनी वाढ झाल्याचे गुगल ट्रेंड्सवरून स्पष्ट झाले आहे. याचबरोबर या दोन दिवसांत व्हॉट्सअ‍ॅपद्वारेही प्रचार करण्यात आल्याचे समाजमाध्यम कक्षांनी नमूद केले.