उद्धव ठाकरे आज मोदी व भाजपला लक्ष्य करणार

शिवसेना-भाजप युतीची चर्चा अधांतरीच असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसेनेच्या गुरुवारी होणाऱ्या मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर तोफ डागणार आहेत. स्वबळाचे स्पष्ट संकेत देऊन ठाकरे हे शिवसेना कार्यकर्त्यांना अधिक आक्रमक होण्याचे व निवडणुकीचे रणशिंग फुंकत भावनिक आवाहन करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. भाजपला अधिक जागा देण्याची शिवसेनेची तयारी नसली तरी युतीसाठी सकारात्मक असल्याचे तुणतुणे वाजवत रहात स्वबळावर लढण्याची तयारी करुन उमेदवार याद्या टप्प्याटप्प्याने घोषित केल्या जातील, अशी रणनीती आहे. भाजपच्या गोटातही मध्यरात्रीपर्यंत खलबते व स्वबळाची तयारी सुरु असून युतीच्या तुटीचा ठपका येऊ नये, यासाठी शिवसेनेकडून घोषणा होण्याची वाट पाहिली जात आहे. पुणे, िपपरी-चिंचवड, अकोला, नाशिक आदी ठिकाणच्या नेत्यांनीही भाजपशी युती न करण्याची मागणी ठाकरे यांच्याकडे बुधवारी झालेल्या बैठकीत केली.

युतीच्या चर्चेबाबत गेले काही दिवस राजकीय गोटांमधून अनेक वावडय़ा उठत असल्या तरी युतीची चर्चा सुरु होण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. केवळ ६० जागा देण्याची तयारी दाखवून भाजपची तेवढीच ताकद आहे, अशी खिल्ली उडविल्याने भाजप नेतेही संतापले असून शिवसेनेची महापालिकेतील सत्ता हिसकावून घेऊन अद्दल घडविण्यासाठी भाजप तयारी करीत आहे. शिवसेनेच्या सुधारित प्रस्तावाची भाजपला प्रतीक्षा असून राज्यातील सरकार टिकविण्यासाठी व फारसे यश न मिळाल्यास पंचाईत नको, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवसेनेशी युती व्हावी, म्हणून प्रयत्न करीत आहेत. पण शिवसेनेकडून पुरेशा जागा मिळत नसल्याने आणि स्वबळावर लढण्यासाठी भाजप नेत्यांचा व कार्यकर्त्यांचा दबाव असल्याने त्यांची कोंडी होत आहे. शिवसेनेच्या प्रभाग प्रमुखांच्या गुरुवारच्या मेळाव्यात युतीबाबत भाष्य करणार असल्याचे ठाकरे यांनी जाहीर केले असले तरी तुटीची थेट घोषणा करण्यापेक्षा सावध पवित्रा घेण्याची शक्यता आहे. शिवसेना कार्यकर्त्यांनी असा दणदणीत विजय मिळवावा की कोणाच्याही मदतीची गरज राहणार नाही, असे आवाहन करीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मरण करुन भावनिक सादही घातली जाणार आहे.

नोटाबंदी, शरद पवार यांना पद्मविभूषण पुरस्कार, पारदर्शी कारभार व साधनसुचितेचा दावा करणाऱ्या भाजपमध्ये गुंडाचा व भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांचा होत असलेला प्रवेश आदी मुद्दय़ांवरुन ठाकरे हे मोदी व भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या भ्रष्टाचाराविरोधात रान उठवून आणि भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगात डांबण्याच्या घोषणा करुन सत्ता मिळविल्यानंतर मोदी व भाजपच्या नेत्यांची पवार यांच्याशी जवळीक वाढत आहे. त्यांना पुरस्कार दिला जात आहे. मात्र ७८ हजार कोटी रुपयांच्या सिंचन गैरव्यवहाराबाबत आवाज उठवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार व अन्य नेत्यांवर मात्र भाजप कारवाई करीत नाही, हा मुद्दाही ठाकरे उपस्थित करणार असल्याचे समजते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फडणवीस यांनी नवी दिल्लीत मंगळवारी भेट घेतली आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीही अध्यक्ष अमित शहा व अन्य नेत्यांची भेट घेऊन चर्चा केली. युतीबाबतच्या निर्णयाचे सर्वाधिकार मुख्यमंत्री फडणवीस यांना देण्यात आले आहेत. विधानसभेच्या वेळी युतीच्या तुटीची घोषणा भाजपकडून झाली व त्याविरोधात शिवसेनेने प्रचार केला. मुंबईत शिवसेनेची ताकद आहे आणि भाजपने खंजीर खुपसून युती तोडली, असा संदेश जनतेमध्ये जाऊ नये, यासाठी यावेळी भाजपकडून कोणतीही घाई केली जाणार नसून शिवसेनेकडून स्वबळाची किंवा युतीच्या तुटीची घोषणा होण्याची वाट पाहिली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांचीही स्वबळावर तयारी

भाजपनेही रिपब्लिकन पक्षासाठी किरकोळ जागा देण्याची तयारी ठेवून स्वबळावर लढण्याची तयारी सुरु ठेवली आहे. दोन-तीन दिवसांत जाहीरनामा आणि मेळावा घेण्याचेही नियोजन करण्यात येत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘वर्षां’ निवासस्थानी मुंबई अध्यक्ष आशिष शेलार व मोजक्या नेत्यांशी बुधवारी पहाटे साडेतीन वाजेपर्यंत प्रदीर्घ चर्चा केली. त्यात निवडणूक तयारीच्या अनेक बाबींचा आढावा घेतला व रणनीती ठरविण्यात आली. शिवसेनेकडून युतीच्या तुटीची स्पष्ट घोषणा होईपर्यंत शेलार व खासदार किरीट सोमय्या यांना शांत राहण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या आहेत.