मुंबई महापालिका निवडणुकीत उमेदवार उभे न करता मनसेने जर बिनशर्त पाठिंबा दिला, तर त्यांचा हेतू प्रामाणिक आणि भाजपला मदत न करण्याचा असू शकतो, अशा आशयाच्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे प्रसिद्धिप्रमुख हर्षल प्रधान यांच्या समाज माध्यमांवरील पोस्टमुळे वादंग निर्माण झाला आहे. शिवसेनेची अधिकृत भूमिका मीच जाहीर करतो आणि शिवसेनेच्या मध्यवर्ती साइटवरून प्रसारित होते, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

मनसेने युतीचा प्रस्ताव दिल्यानंतर ठाकरे यांनी कोणाशीही युती करणार नाही व आपल्यापर्यंत प्रस्ताव आलाच नाही, असे ठाकरे यांनी सांगितले होते; पण त्यानंतर प्रधान यांनी मनसेबाबत पोस्ट प्रसारित केली. ही शिवसेनेची अधिकृत भूमिकाच आहे, असा समज गेल्याने त्यावरून वादंग उठला आणि ठाकरे यांना ही शिवसेनेची भूमिका नसल्याचा खुलासा करण्याची वेळ आली. ही पोस्ट माझी भूमिका नव्हती, अन्य कोणी तरी पाठविलेला मजकूर प्रसारित केला, असे प्रधान यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेत प्रवेश दिल्याने गाडीच्या काचा फोडल्या

भाजप व शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्याचे पडसाद मात्र उमटण्यास सुरुवात झाली. भाजपमधील नेते मंगल भानुशाली यांना शिवसेनेत प्रवेश दिल्याने घाटकोपर येथे तीव्र पडसाद उमटले आणि सोमवारी रात्री त्यांच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या. भानुशाली यांच्यासह काही नेत्यांचा शिवसेना प्रवेश हा भाजपचे नेते व मंत्री प्रकाश मेहता यांना धक्का आहे. त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळण्यावरही शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.