मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शुक्रवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेतील बंडखोरी उफाळून आली. इतर पक्षांच्या तुलनेत शिवसेनेत सर्वाधिक बंडखोरी झाली. बंडखोरांनी शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांना आव्हान दिल्याने शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे. उमेदवारी अर्ज माघार घेण्याची तारीख ७ फेब्रुवारी आहे. तोपर्यंत बंडखोरांना थंड करण्यात मातोश्रीला यश येत का ?, याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

गुरुवारी शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक नाना अंबोले, दिनेश पांचाळ, माजी सभागृह नेता प्रभाकर शिंदे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये प्रवेश केला असताना, शुक्रवारी शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या प्रभादेवी व माहिममध्येही बंडाळी समोर आली आहे. शिवसेनेचे माजी शाखाप्रमुख अभिषेक सावंत यांच्या पत्नी आदिती सावंत वॉर्ड क्र. २०० मधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत. तर माहिम येथील वॉर्ड क्रमांक १९० मधून उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या महिला शाखासंघटक रोहिता ठाकूर यांनीही बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे.

प्रभादेवीतील शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकर यांना उमेदवारी दिल्याने शिवसेनेच्या महेश सावंत यांनी बंड पुकारले आहे. महेश सावंत हे प्रभादेवी वॉर्ड १९४ मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहेत. गुरुवारी रात्री उशीरापर्यंत ‘मातोश्री’वर सरवणकर आणि महेश सावंत यांच्यात वाटाघाटी सुरु होत्या. अखेर मातोश्रीने समाधान सरवणकर यांच्या बाजूने कौल दिल्याने शिवसेनेच्या महेश सावंत यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. माहिममधील वॉर्ड क्रमांक १९० मधून वैशाली पाटणकर यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेल्या महिला शाखाप्रमुख रोहिता ठाकूर यांनी अपक्ष उमेदवार अर्ज भरून बंडखोरी केली आहे. माजी महापौर श्रध्दा जाधव यांच्या विरोधात तीन शिवसैनिकांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला तर वॉर्ड क्रमांक 77 मधून बाळा नर यांच्या विरोधातही चौघांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.

विद्यमान नगरसेविका किशोरी पेडणेकर यांना शिवसैनिकांची बंडाळी मोडून वॉर्ड क्रमांक १९९ मधून उमेदवारी जाहीर झाली आहे. पेडणेकर यांना उमेदवारी देण्यास स्थानिक शिवसैनिक, शाखाप्रमुखांचा विरोध होता. शिवसेना नेते राजेश कुसळे यांच्या पत्नी रुपाली कुसळे यांना उमेदवारी देण्याचा आग्रह शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी धरला होता. परंतु शिवसैनिक आणि शाखाप्रमुखांचा विरोध डावलून वॉर्ड क्रमांक १९९ (सातरस्ता-डिलाईलरोड-ऑर्थर) रोड इथून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वॉर्डात बंडखोरी झाली नसली तरीसुद्धा शिवसैनिकांमध्ये नाराजी कायम आहे. त्याचा फटका पेडणेकर यांना बसण्याची शक्यता आहे. दादर, माहिम, प्रभादेवी हे शिवसेनेचे बालेकिल्ले मानले जातात. पण आता या भागातच शिवसैनिक एकमेकांविरुद्ध उभे ठाकणार आहेत. त्यामुळे बालेकिल्ल्यात शिवसेनेपुढे बंडखोर शिवसैनिकांचे आव्हान उभे ठाकले आहे.