महाराष्ट्राची राजधानी आणि देशाचे आर्थिक केंद्र असलेल्या मुंबईची पाटण्याशी बरोबरी करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईचेच महत्त्व कमी केल्याचा आरोप करतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी, मुंबईच्या विकास कामांवरून जुगलबंदी करण्याचे आव्हान मुख्यमंत्र्यांना दिले.
वरळी आणि लालबाग येथे शुक्रवारी झालेल्या जाहीर सभांमध्ये उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले. तसेच काँग्रेसच्या काळात झालेल्या विकासकामांचे श्रेय भाजप लाटत असल्याचा आरोपही त्यांनी केला. काँग्रेसचे सरकार पालिकेच्या कामकाजात ढवळाढवळ करीत नव्हते. मात्र आताचे सरकार पालिकेच्या छोटय़ा कार्यक्रमांवरही लक्ष ठेवून असते, असा टोलाही त्यांनी यावेळी हाणला.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर टीका करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तर केवळ साबणाचे बुडबुडे काढणारे आहेत, असा टोला त्यांनी भाजपला लगावला.अशी चेष्टा व मस्करी पंतप्रधानांना शोभत नाही, असे ते म्हणाले.


पोलिसांवर विश्वास नसल्यानेच मुंबईला पाटण्याची उपाधी मुख्यमंत्री देत असावेत. पारदर्शक कारभार करण्याची आमचीही तयारी आहे.
केंद्र सरकारने आपल्या आर्थिक पाहणी अहवालात मुंबई महापालिकेचा कारभार पारदर्शक असल्याचे स्पष्ट म्हटले आहे, तर राज्यातील भाजप सरकार ते नाकारत आहे. मग नक्की कोणत्या सरकारमध्ये गाढवं बसली आहेत, असा खोचक सवालही त्यांनी केला.
मुख्यमंत्र्यांना आव्हान
सत्याच्या पुढे ‘अ’ लावून असत्य ठरवू नका. मुंबईच्या विकासासाठी महापालिकेने अनेक कामे केली आहेत. शिवसेनेच्या काळात महापालिकेत काही कामे झाली नाहीत असे मुख्यमंत्री वारंवार बोलून दाखवत आहेत. पण माझे त्यांना आव्हान आहे की त्यांनी जुगलबंदीला पुढे यावे. माझी जुगलबंदीला तयारी आहे, असे आव्हानही त्यांनी दिले.मुंबईत सागरी मार्ग बांधण्याचे शिवसेनेचे स्वप्न आहे. पण त्याच्या परवानग्या केंद्रातील भाजप सरकारने अडवून ठेवल्या आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.