भविष्यात महाराष्ट्रात शिवसेना एकट्यानेच भगवा फडकवेल, या सत्तेत कुणीही वाटेकरी नसेल, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी युती तोडल्यानंतर आता शिवसेना राज्य आणि केंद्र सरकारचा पाठिंबा काढून घेणार का, हा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, तशी परिस्थिती आल्यास सरकार टिकविण्यासाठी भाजप सक्षम असल्याचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले. याशिवाय, शिवसेनेला आमच्याशी युती करायचीच नव्हती, असेही त्यांनी म्हटले. आम्ही शिवसेनेशी शेवपटपर्यंत युती करण्याचा प्रयत्न केला. युतीच्या पहिल्या बैठकीत आम्ही पालिकेतील पारदर्शी कारभारासाठी ठोस कार्यक्रम आखण्याची आणि समन्वय समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यानंतर दुसऱ्या बैठकीतही याच मुद्द्यावर चर्चा झाली. मात्र, त्यावर सेनेने काही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर तिसऱ्या बैठकीत भाजपने सेनेपुढे ११४ जागांचा प्रस्ताव ठेवला. मात्र, या प्रस्तावावर शिवसेनेने काही उत्तर दिले नाही. यावरून शिवसेनेला आमच्याशी युती करायचीच नव्हती, हे सिद्ध होते, असे दानवे यांनी सांगितले. याशिवाय, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी भाजप येत्या २८ तारखेच्या मेळाव्यात आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे आता शिवसेना आणि भाजप सर्व ठिकाणी एकमेकांशी फारकत घेणार का, हे पाहणे औत्स्युकाचे ठरेल.

दरम्यान, या सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नेहमीच्या लौकिकाला जागत एक धुर्त खेळी केला आहे. उद्धव ठाकरे यांनी युती तोडल्याची घोषणा केल्यानंतर शरद पवार यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावेळी पवार यांनी म्हटले की, शिवसेना आणि भाजप यांची युती तुटल्याचे मला अतीव दु:ख झाले आहे. मात्र, शिवसेनेने राज्य सरकारचा पाठिंबा काढला तर  भाजपने चर्चेला यावे, असे पवार यांनी सांगितले. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आल्यापासून शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांचे मैत्रीपूर्ण संबंध नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामध्ये प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने शरद पवार यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर केल्याने अनेकांच्या भुवयाही उंचावल्या होत्या. काही दिवसांपूर्वी झालेल्या सभेत नरेंद्र मोदी यांनी मी शरद पवार यांचे बोट धरून राजकारणात आल्याची जाहीर कबुली दिली होती. त्यामुळे शरद पवार यांना मिळालेला पद्मभूषण पुरस्कार ही गुरूदक्षिणा असल्याची चर्चाही रंगली आहे. उद्धव ठाकरे यांनीदेखील आजच्या भाषणात याचा उल्लेख केला.