मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी शुक्रवारी जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीचा फटका माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी गटनेत्या राखी जाधव, माजी सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव, भाजपचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे, काँग्रेसचे माजी नगरसेवक आसिफ झकेरिया यांना बसला आहे. या सर्वांचे प्रभाग आरक्षित झाले असून आगामी निवडणूक लढविण्यासाठी या मंडळींना आसपासच्या प्रभागात चाचपणी करावी लागणार आहे.

गेली चार वर्षे मुंबई महानगरपालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषविणारे माजी नगरसेवक यशवंत जाधव मागील निवडणुकीत प्रभाग क्रमांक २१७ मधून विजयी झाले होते. त्यांचा हा प्रभाग ओबीसी महिलांसाठी आरक्षित झाला आहे. मागील निवडणुकीत खुल्या प्र‌वर्गातील प्रभाग क्रमांक १३० मधून राखी जाधव विजयी झाल्या होत्या. यावेळी हा प्रभाग ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या २०१७ मध्ये पार पडलेल्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १८५ मधून विजयी झालेल्या तृष्णा विश्वासराव यांच्याकडे सभागृह नेतेपदाची धूरा देण्यात आली होती. मात्र २०१९ मधील निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे पडघम; २३६ प्रभाग आरक्षण जाहीर

आगामी निवडणुकीसाठी शुक्रवारी पार पडलेल्या सोडतीत विश्वासराव यांचा प्रभाग ओबीसी महिलांसाठी आरक्षित झाला. मागील निवडणुकीत हा प्रभागात सर्वसाधारण प्रवर्गाचे आरक्षण होते. शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करीत भाजपमध्ये दाखल झालेले प्रभाकर शिंदे मागील निवडणुकीत प्रभाग क्रमांक १०९ मधून विजयी झाले होते. हा प्रभाग सोडतीमध्ये महिलांसाठी आरक्षित झाला आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये स्थायी समितीच्या बैठकीत निरनिराळ्या प्रश्नांवर आवाज उठविणारे काँग्रेसचे माजी नगरसेवक आसिफ झकेरिया यांनाही सोडतीत फटका बसला आहे. मागील निवडणुकीत ते प्रभाग क्रमांक १०४ मधून विजयी झाले होते. मात्र यावेळी हा प्रभाग सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाला आहे. या दिग्गज मंडळींना आता अन्यत्र प्रभागातून निवडणूक लढवावी लागणार आहे.

माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांचा प्रभाग क्रमांक १८२ सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे. यापूर्वी ३१ मे रोजी काढण्यात आलेल्या प्रभाग आरक्षण सोडतीतही हा प्रभाग आरक्षित झाला होता. परिणामी, पुन्हा काढण्यात आलेल्या सोडतीमध्ये त्यांना दिलासा मिळू शकला नाही.