भारतात अर्थसंकल्पाचा एक मोठा इतिहास आहे. पहिल्यांदा अर्थसंकल्प कधी सादर करण्यात आला? कोणी आणि कशाप्रकारे तो सादर केला? अशा अनेक लक्षवेधी गोष्टी आहेत ज्या ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. जाणून घेऊया भारतीय अर्थसंकल्पाशी निगडीत अशाच काही गोष्टी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ब्रिटिशकालीन भारताचा पहिला अर्थसंकल्प आणि जेम्स विल्सन
स्वातंत्र्यपूर्व भारतातील पहिला अर्थसंकल्प १८ फेब्रुवारी १८६९ मध्ये सादर करण्यात आला. जेम्स विल्सन यांनी तो सादर केला. जेम्स इंडियन काऊन्सिलचे (स्वातंत्र्यपूर्व) वित्तीय सदस्य होते. व्हॉइसरॉयला आर्थिक बाबींविषयी सल्ला देणे हे त्यांचे काम होते. अर्थशास्त्राचा अभ्यास करण्यापूर्वी ते आपल्या कौटुंबिक व्यवसायात मदत करत असत. त्यांच्या कुटुंबियांचा टोपी बनविण्याचा व्यवसाय होता.

स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जॉन मथाई हे दुसरे अर्थमंत्री बनले. १९४९-५० आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प त्यांनी सादर केला होता. संसदेत हल्ली अर्थमंत्री जवळजवळ दोन तासांचे लांबलचक भाषण वाचन करतात. त्याकाळात मथाई यांनी संपूर्ण अर्थसंकल्पाचे वाचन न करता अर्थसंकल्पातील काही खास मुद्द्यांचेच संसदेत वाचन केले होते. या अर्थसंकल्पात पहिल्यांदाच योजना आयोग आणि पंचवार्षिक योजनांचादेखील उल्लेख करण्यात आला मथाई यांनी संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पाची ही विशेष बाब होती.

गव्हर्नरपदी असताना सादर केला अर्थसंकल्प
सी. डी. देशमुख अर्थसंकल्प सादर करणारे एकमात्र असे ‘रिझर्व बँक गव्हर्नर’ होते ज्यांनी रिझर्व बँकेच्या गव्हर्नरपदी असताना अर्थसंकल्प सादर केला होता. १९५१-५२ चा अंतरिम अर्थसंकल्प त्यांनी सादर केला होता. त्यावेळी सरकारला पैशांची आवश्यकता होती त्यासाठी कराच्या दरात वाढ करणे गरजेचे होते. यासाठी देशमुख यांनी अनोख्या मार्गाचा अवलंब करत जनतेला साद घातली होती. भारताच्या ग्रामीण भागातून आपल्याला एक पत्र आल्याचा उल्लेख देशमुख यांनी केला होता. पत्रात त्यांनी एका व्यक्तीचा उल्लेख केला होता. ज्याच्या गावातील कोणीच कर देत नसल्याचे त्याने पत्रात म्हटले होते. परंतु, त्याने करस्वरुपात दरवर्षी पाच रुपये भरून देशाच्या विकासात योगदान देण्याचे वचन दिले होते. कर भरण्यासाठी देशातील जनता उत्साहित व्हावी, यासाठी देशमुखांनी हे उदाहरण दिले होते.

पहिल्यांदा विदेशी संबंधाबाबत उल्लेख
सर्वसाधारणपणे अर्थसंकल्पात विदेशी संबंधांबाबत चर्चा अथवा उल्लेख करण्यात येत नाही. परंतु, सुरुवातीच्या अर्थसंकल्पात, विदेश संबंधावरदेखील प्रकाशझोत टाकला जात असे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर यूके, यूएसए, यूएसएसआर (आता रशिया) सारख्या देशांकडून देशाच्या विकासासाठी भारताने आर्थिक सहाय घेतले होते. त्यामुळेच १९५० च्या अर्थसंकल्पामध्ये रशियासोबत देशाच्या संबंधाबाबतची माहिती समाविष्ट करण्यात आला होता. त्यावेळी देशाच्या खजिनाच्या मुख्य स्रोत असलेल्या विदेशी फंडाचादेखील त्यात उल्लेख होता. जवळजवळ १९५९ पर्यंत हे सुरु होते.

Web Title: History of the indian budget
First published on: 19-12-2016 at 14:01 IST