‘सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नही, मेरी कोशिश है ये सूरत बदलनी चाहिये..’
चार महिन्यांपूर्वी रेल्वे खात्याची जबाबदारी स्वीकारणारे रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी हा शेर लोकसभेतील आपल्या सहकाऱ्यांना ऐकविला खरा, पण सव्वा तासाच्या त्यांच्या भाषणाचा प्रवास संथ आणि रटाळच होता. तरीही सभागृहातील सहप्रवासी त्यांचे भाषण शांतपणे ऐकून घेत होते. पण त्यांचे भाषण अंतिम स्थानकावर पोहोचण्यापूर्वीच भाजप, तृणमूल काँग्रेस, बिजू जनता दल तसेच यूपीए सरकारचे बाहेरून समर्थन करीत असलेले समाजवादी पक्ष आणि बसपच्या सदस्यांनी असा काही हंगामा केला ही बन्सल यांनी सुरुवातीला अजाणतेपणाने केलेले भाष्य अखेर खरे ठरले.
बन्सल यांच्या भाषणाची शेवटची सात मिनिटे लोकसभेत नुसताच गदारोळ सुरू होता. अजून बरेच भाषण वाचायचे असताना आपापल्या राज्यांच्या वाटय़ाला रेल्वे अर्थसंकल्पात फारसे काही आलेले नाही, याची कल्पना आल्याने सर्वच सदस्य भडकले. भाजप सदस्यांनी आपल्या आसनावरूनच निषेध नोंदविला, पण अन्य पक्षांच्या सदस्यांनी लोकसभा अध्यक्षांच्या आसनापुढे येऊन घोषणाबाजी करीत बन्सल यांचा निषेध नोंदवायला सुरुवात केली. परिणामी बन्सल यांना आपले भाषण अक्षरश उरकावे लागले. सतरा वर्षांंनंतर रेल्वे अर्थसंकल्प सादर करायची संधी मिळालेल्या काँग्रेस पक्षाला या गोंधळातून विरोधाची कल्पना आली.
मंगळवारी सकाळी आपल्या आपल्या कुटुंबियांसोबत नाश्ता करून पवनकुमार बन्सल संसदेच्या शेजारी असलेल्या रेलभवनमार्गे अकरा वाजता संसदेत पोहोचले आणि प्रश्नोत्तराचा तास संपत आला असताना अर्थसंकल्पाचे भाषण असलेल्या चामडय़ाच्या एका जाडजूड फोल्डरनिशी लोकसभेत त्यांचे आगमन झाले.
पहिलाच अर्थसंकल्प असल्यामुळे काहीसे सावध असलेल्या बन्सल यांनी अर्थसंकल्प मांडण्यासाठी कमलनाथ आणि पी. चिदंबरम यांच्याकडून आवश्यक ती माहिती घेतली. पुढय़ातील माईक पुरेसा ठरत नसल्यामुळे आपल्या कोटाला मायक्रोफोनही लावून घेतला. पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राजकारणात संधी देणारे स्वर्गीय राजीव गांधी यांचे स्मरण करून आणि रेल्वेगाडीविषयीच्या क्रिस्टीन वेदर्ली यांच्या सुरेख ओळी उद्धृत करीत त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. माजी रेल्वे मंत्री लालूप्रसाद यादव बन्सल यांच्याकडे तिरकसपणे बघत होते. बन्सल यांची शेरशायरी चिदंबरम यांच्या डोक्यावरून जात होती. पण कमलनाथ त्यांना त्याचा अर्थ समजावून सांगत होते. दीर्घ भाषण करायचे असूनही बन्सल यांनी आपल्यापाशी पाण्याचा ग्लास ठेवला नव्हता. अधूनमधून खिशातून रुमाल काढत ते ओठ आणि चेहरा पुसून भाषण वाचत होते. त्यांच्या मागे बसलेले रेल्वे राज्यमंत्री अधीर रंजन चौधरी आणि कोटला आणि कोटला जयसूर्य प्रकाश रेड्डी काळजीपूर्वक त्यांच्या भाषणाची प्रत वाचत होते. राज्यसभेच्या गॅलरीत डेरेक ओब्रायन, हुसैन दलवाई आणि एन. के. सिंग यांच्यासह अनेक सदस्य त्यांचे भाषण ऐकण्यासाठी आले होते. लोकसभा अध्यक्षांच्या गॅलरीत बन्सल यांच्या पत्नी, पुत्र, कन्या आणि स्नुषा उपस्थित होते.
रेल्वे मंत्रालयाला भेडसावणाऱ्या आर्थिक अडचणींची कैफियत मांडून रेल्वेचा चेहरामोहरा बदलण्याचा आपला ‘मकसद’ त्यांनी ‘हंगामेवाला’ शेर सुनावून सांगण्याचा प्रयत्न केला, तेव्हा सत्ताधारी आघाडीसोबत अन्य बाकांवरूनही त्यांना प्रतिसाद मिळाला. पण सव्वा तासाच्या भाषणाच्या शेवटी आपली वैयक्तिक निराशा झाल्याचे स्पष्ट होताच अनेक सदस्यांना बन्सल यांचा इरादा लक्षात आला आणि भडकून उठत त्यांनी थेट अध्यक्षांच्या आसनापुढे येऊन असा गोंधळ घातला की शेवटचे स्थानक येण्यापूर्वीच बन्सल यांना भाषणाचा प्रवास संपवावा लागला.