BSNL In Profit: देशातील सरकारी मालकीची दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच BSNL तब्बल १७ वर्षांनी पहिल्यांदा नफ्यात आली आहे. डिसेंबर तिमाहीत बीएसएनएलने २६२ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. बीएसएनएलने शेवटचा तिमाही नफा २००७ मध्ये नोंदवला होता. दुसरीकडे नफ्याबरोबरच बीएसएनएलचे ग्राहकही वाढले असून, डिसेंबरमध्ये ग्राहकांची संख्याही ९ कोटींवर पोहोचली आहे, जी जूनमध्ये ८.४ कोटी होती.

१७ वर्षांत प्रथमच तिमाही नफा

पीटीआयच्या वृत्तानुसार, केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी नुकतीच याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले की, “आजचा दिवस भारताच्या दूरसंचार क्षेत्रासाठी खूप महत्त्वाचा आहे. पंतप्रधान मोदींचे स्वप्न आहे की दूरसंचार क्षेत्र भारताच्या डिजिटल भविष्याला चालना देईल. हे लक्ष्य साध्य करण्याच्या दिशेने, बीएसएनएलने २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत १७ वर्षांत प्रथमच तिमाही नफा नोंदवला आहे.”

सिंधिया यांनी पुढे सांगितले की, “या तिमाहीत बीएसएनएलच्या सेल्युलर मोबिलिटीमध्ये १५ टक्के, एफटीटीएचमध्ये १८ टक्के आणि लीज्ड लाईन्समध्ये १४ टक्क्यांनी वाढ झाली. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली, बीएसएनएल नफ्याच्या मार्गावर वाटचाल करत आहे. आम्हाला अपेक्षा आहे की चौथ्या तिमाहीत कंपनीचा महसूल वाढेल.”

बीएसएनएलसाठी महत्त्वाचा टप्पा

याबाबत अधिक माहिती देताना ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले, “या तिमाहीत नफ्यात येणे हा बीएसएनएलसाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. कारण आता बीएसएनएल देशभरातील सर्व ग्राहकांना ४जी सेवा प्रदान करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. १,००,००० टॉवरपैकी सुमारे ७५,००० टॉवर बसवले गेले आहेत, त्यापैकी सुमारे ६०,००० कार्यरत आहेत. आम्हाला आशा आहे की या वर्षी जूनपर्यंत सर्व १,००,००० टॉवर्स कार्यान्वित होतील.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुणवत्तेमुळे ग्राहकांचा विश्वास वाढला

बीएसएनएलचे सीएमडी ए रॉबर्ट जे रवी म्हणाले की, ” बीएसएनएलने आपले खर्च कमी केले आहेत. यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत १८०० कोटी रुपयांपेक्षा जास्त तोटा कमी झाला आहे. ग्राहक सेवांसाठी आम्ही सर्व FTTH ग्राहकांसाठी वायफाय रोमिंग, BITV आणि IFTV सारखे नवीन उपक्रम सादर केले आहेत. गुणवत्तेमुळे आमच्या ग्राहकांचा आमच्यावरील विश्वास वाढला आहे.”