वृत्तसंस्था, नवी दिल्ली

ॲनी टेक्नॉलॉजीजची ऑनलाइन टॅक्सी सेवा उपकंपनी ओला कॅब्सने १० टक्के नोकरकपातीचे नियोजन आखले आहे, तथापि त्यापूर्वीच कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत बक्षी यांनी त्यांच्या पदाचा सोमवारी राजीनामा दिला. पदभार स्वीकारल्यानंतर चारच महिन्यांत ते पायउतार झाले आहेत.
बक्षी हे जानेवारी महिन्यात मुख्य कार्यकारी अधिकारी कंपनीत म्हणून रूजू झाले होते. त्यांचा राजीनामा तात्काळ प्रभावाने स्वीकारण्यात आला आहे. कंपनीच्या मनुष्यबळाची पुनर्रचना करण्यात येणार असून, सुमारे १० टक्के नोकर-कपातीचे नियोजन आहे.

परिणामी जवळपास ५००  कर्मचाऱ्यांना  नोकऱ्या गमवाव्या लागण्याची शक्यता आहे. या आधी जानेवारीतही कंपनीने सुमारे २०० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. तथापि या संबंधाने चर्चा सुरू असताना बक्षी यांनी हे राजीनाम्याचे पाऊल उचलले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमंत बक्षी नवीन संधीच्या शोधात कंपनीतून बाहेर पडले आहेत. आता कंपनीचे दैनंदिन कामकाज भावेश अगरवाल हे पाहतील. नवीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती लवकरच केली जाणार आहे.

हेही वाचा >>>Gold-Silver Price on 29 April 2024: खरेदीची संधी सोडू नका! सोन्याचे भाव घसरले, १० ग्रॅमचा दर पाहून होईल आनंद!

ओला कॅब्सने काही आठवड्यांपूर्वी प्रारंभिक समभाग विक्रीबाबत गुंतवणूकदारांसोबत प्राथमिक चर्चा सुरू केली होती. गेल्याच महिन्यात कंपनीने मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून कार्तिक गुप्ता आणि मुख्य व्यवसाय अधिकारी म्हणून सिद्धार्थ शाकधर यांची नियुक्ती केली. दरम्यान ओला कॅब्सची संलग्न कंपनी ओला इलेक्ट्रिकने प्रारंभिक समभाग विक्रीसाठी बाजार नियामकांकडे प्रस्ताव दाखल केला आहे.