ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव रोहित कुमार सिंह यांनी आज तूर डाळीचा व्यापार आणि संबंधित समस्यांवर चर्चा करण्यासाठी मोझांबिकचे उच्चायुक्त एरमिंडो ए.पेरेरिया यांच्याबरोबर बैठक घेतली. मोझांबिकमध्ये जुलै २०२३ पासून निर्माण झालेले प्रक्रियात्मक अडथळे आणि त्यामुळे त्या देशातून तूर डाळीच्या निर्यातीला होत असलेला विलंब याबद्दल सिंह यांनी चिंता व्यक्त केली. भारत सरकारने देशाची आयात सुरळीत राहावी आणि त्यामध्ये कोणतेही अडथळे येऊ नयेत, यासाठी आवश्यक धोरणात्मक उपाययोजना केल्या आहेत, त्यामुळे मोझांबिकमधून तूर डाळीची निर्यात सुरळीतपणे व्हावी, यासाठी त्या देशाच्या उच्चायुक्तांनी हस्तक्षेप करावा, अशी त्यांनी विनंती केली.

या संदर्भात मोझांबिकच्या बंदरांवर निर्यातीसाठी मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या तूर डाळीच्या साठ्याबाबत तात्काळ निर्णय घेऊन त्याच्या निर्यातीला त्वरित मंजुरी देण्याची गरज असल्याचे ग्राहक व्यवहार सचिव रोहित कुमार सिंह यांनी एरमिंडो ए पेरेरिया यांना सूचित केले. तूर डाळीच्या व्यापाराबाबतचा द्विपक्षीय सामंजस्य करार कायम ठेवण्यावर यावेळी भर देण्यात आला, कारण तो भारत आणि मोझांबिक येथील उत्पादक आणि ग्राहकांप्रति असलेल्या द्विपक्षीय वचनबद्धतेला मूर्त स्वरूप देतो.

हेही वाचाः Mango Export : एप्रिल ते ऑगस्ट कालावधीत आंब्याच्या निर्यातीत १९ टक्क्यांची वाढ, भारताने अमेरिकेला केली सर्वाधिक निर्यात

मोझांबिकचे उच्चायुक्त एर्मिंडो ए पेरेरिया यांनी मोझांबिकमधील एकंदर कृषी परिसंस्थेच्या दृष्टीने भारत आणि मोझांबिक यांच्यातील व्यापार संबंधांच्या महत्त्वावर भर दिला. तूरडाळीच्या व्यापाराशी संबंधित सध्याच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि मोझांबिकमधून भारतामध्ये तूर डाळीच्या निर्यातीचा मार्ग सुकर व्हावा, यासाठी आवश्यक पावले उचलली जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.

हेही वाचाः दिवाळीपूर्वी पंतप्रधान मोदींचं ५१ हजार जणांना मोठं गिफ्ट, सरकारी नोकऱ्यांसाठी नियुक्तीपत्र देणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ग्राहक व्यवहार सचिव आणि मोझांबिकचे उच्चायुक्त यांच्यातील यावेळची ही बैठक महत्त्वाची आहे, कारण मोझांबिकमधून होणार्‍या सुरळीत आयातीमुळे येत्या काही महिन्यांमध्ये देशात तूर डाळीची उपलब्धता वाढेल आणि भारतीय ग्राहकांना किफायतशीर भावात उपलब्धतेची सुनिश्चिती होणार आहे.