आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमती नरमल्याने वाणिज्य वापराच्या स्वयंपाकाच्या गॅसच्या (एलपीजी) दरात शुक्रवारी १९ किलो सिलिंडरच्या मागे ३९.५० रुपयांनी कपात करण्यात आली. मात्र, घरगुती वापराच्या १४.२ किलोच्या सिलिंडरची किंमत मात्र ९०३ रुपयांवर कायम आहे.

हॉटेल आणि उपाहारगृहांसारख्या विविध आस्थापनांमध्ये वाणिज्य कारणासाठी वापरल्या जाणाऱ्या एलपीजीची किंमत आता मुंबईत १,७१० रुपये असेल. तर नवी दिल्लीमध्ये तो आता १,७९६.५० रुपयांच्या तुलनेत १,७५७ रुपयांना मिळेल, असे तेल कंपन्यांनी दिलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या तेल कंपन्यांनी २० दिवसांपूर्वीच म्हणजेच १ डिसेंबर रोजी वाणिज्य वापराच्या एलपीजीच्या किमतीत २१ रुपयांनी वाढ केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पेट्रोल-डिझेलच्या किमतीत बदल नाहीच!

सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्या मागील महिन्यातील सरासरी आंतरराष्ट्रीय किमतीच्या आधारे प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला एलपीजी आणि अन्य इंधनाच्या किमतीचा आढावा घेऊन, त्यात वाढ-घट जाहीर करतात. उल्लेखनीय म्हणजे तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतीत मोठे चढ-उतार होऊनही पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ विक्री किमतीत सलग २१व्या महिन्यांत कोणतेही बदल झालेले नाहीत. शिवाय सार्वत्रिक निवडणुकाही नजीक येऊन ठेपल्याने आणखी काही महिने तरी त्यात कोणताही बदल संभवत नाही, असे विश्लेषकांचे मत आहे.