मुंबई : एलपीजी सिलिंडर निर्मिती व वितरणातील अग्रणी नागपूरस्थित कॉन्फिडन्स पेट्रोलियम लिमिटेडने नवी मुंबईतील जवाहरलाल नेहरू बंदरात (जेएनपीटी) लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस अर्थात एलपीजी आयातीसाठी समर्पित टर्मिनल बांधण्याची योजना आखली असून, यासाठी नॉर्वेस्थित बीडब्ल्यू एलपीजी या जागतिक कंपनीबरोबर भागीदारी केली आहे. ६५० कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित करण्यात आलेला हा प्रकल्प आर्थिक वर्ष २०२६ मध्ये कार्यान्वित होणे अपेक्षित आहे.
हेही वाचा >>> ‘निफ्टी’चा विक्रमी उच्चांकाने गुंतवणूकदार मालामाल; बाजाराची सलग पाचव्या दिवशी आगेकूच कायम
भारतात एलपीजीची साठवण क्षमता आणि वितरण क्षमता वाढवण्यासाठी पायाभूत सुविधा विस्तारणे गरजेचे आहे. ‘बीडब्ल्यू कॉन्फिडन्स पेट्रोलियम प्रा. लि.’ या संयुक्त कंपनीचे तब्बल ६२,००० मेट्रिक टन क्षमतेचे प्रस्तावित टर्मिनल ही गरज मोठ्या प्रमाणात पूर्ण करेल, असा विश्वास कॉन्फिडन्स पेट्रोलियमचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक नितीन खरा यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. क्रायोजेेनिक एलपीजी साठवण क्षमता असलेली देशातील ही सर्वात मोठी सुविधा असेल. पुढे नियोजित उरण-चाकण वायूवाहिनीचा या प्रकल्पाकडून वितरणासाठी वापर केला जाईल, असे त्यांनी सांगितले. नियोजित टर्मिनलसाठी भू-संपादन पूर्ण केले गेले असल्याचे ते म्हणाले.
हेही वाचा >>> Gold-Silver Price on 19 February 2024: आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याची उंच उडी, मुंबई-पुण्यात ‘इतक्या’ वाढल्या किमती
दोन हजार कोटींच्या गुंतवणुकीचे नियोजन
बीडब्ल्यू एलपीजीसह संयुक्त भागीदारीतून पुढील तीन वर्षांत विस्तारासाठी २,००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे नियोजन आखण्यात आले आहे. बीडब्ल्यू एलजीपी समूहाने कॉन्फिडन्स पेट्रोलियममध्ये ८ टक्के भागभांडवली हिस्सेदारी सुमारे २५० कोटी रुपयांच्या मोबदल्यात मिळविली आहे. नियोजित गुंतवणुकीतून पुढील तीन वर्षांत एलपीजी बॉटलिंग प्रकल्प सध्याच्या ६८ वरून १०० वर, एलपीजी वाहन इंधन भरणा केंद्र २५० वरून ७५० वर, तर सीएनजी इंधन वितरण केंद्रही ३४ वरून २०० वर नेण्याचे नियोजन कंपनीने आखले आहे, असे खरा म्हणाले.
५० हजार रोजगारनिर्मिती अपेक्षित
एलपीजी, सीएनजी हा स्वच्छ वायू इंधनाचा घरगुती स्वयंपाकासाठी वापरासह, ऊर्जा, औद्योगिक क्षेत्र आणि वाहतूक उद्योगांमध्येही लोकप्रियता वाढत आहे. या क्षेत्रात वाढत्या हिस्सेदारीसह मोठ्या गुंतवणुकीचे नियोजन आखलेल्या कॉन्फिडन्स पेट्रोलियमचे पुढील तीन वर्षांत वितरकांचे जाळे सध्याच्या २,००० वरून ५,००० वर नेण्याचे उद्दिष्ट आहे. यातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या ५०,००० रोजगार तयार होणे अपेक्षित आहे.