मुंबई : कॅनडास्थित फेअरफॅक्स समूहाची गुंतवणूक असलेल्या डिजिटल विम्याच्या क्षेत्रातील ‘गो डिजिट जनरल इन्शुरन्स लिमिटेड’ची प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ) येत्या १५ मे ते १७ मे या दरम्यान होत असून, या माध्यमातून कंपनीचा २,६१५ कोटी रुपये उभारण्याचा मानस आहे. गुंतवणूकदारांना कंपनीच्या समभागांसाठी प्रत्येकी २५८ ते २७२ रुपयांदरम्यान बोली लावता येईल.

‘गो डिजिट’ या आयपीओच्या माध्यमातून सुमारे १,१२५ कोटी रुपये मूल्याच्या नवीन समभागांची विक्री करणार आहे, तर ‘गो डिजिट इन्फोवर्क सर्व्हिसेस’चे प्रवर्तक आणि विद्यमान भागधारक आंशिक समभाग विक्रीद्वारे (ओएफएस) त्यांच्याकडील सुमारे १,४९० कोटी रुपये मूल्याचे समभाग विक्रीला काढतील. आयपीओच्या माध्यमातून विक्री करण्यात येणाऱ्या समभागांपैकी सुमारे ७५ टक्के पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी, १५ टक्के बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी आणि उर्वरित १० टक्के समभाग वैयक्तिक किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. वैयक्तिक गुंतवणूकदार किमान ५५ समभाग आणि पुढे त्या पटीत या आयपीओसाठी अर्ज करू शकतील.

हेही वाचा >>>देशातील सर्वात मोठ्या स्टेट बँकेचा तिमाही नफा २१,३८४ कोटींवर; भागधारकांना  प्रति समभाग १३.७० रुपयांचा लाभांश घोषित 

नवीन समभागांच्या विक्रीतून मिळणारा निधी भांडवली पाया भक्कम करण्यासाठी आणि सॉल्व्हन्सी मात्रा अर्थात विमा कंपनीच्या आर्थिक सुदृढतेचे मूल्यांकन करणारे गुणोत्तर सुधारण्यासाठी वापरण्यात येईल. ‘गो डिजिट’ वाहन, आरोग्य, प्रवास, मालमत्ता, सागरी, दायित्व यासंबंधित विमा सेवा पुरविते. मुख्यतः ऑनलाइन माध्यमातून विमा विक्री करणारी ही आघाडीची कंपनी आहे.

विराट कोहलीला बहुप्रसवा परतावा

क्रिकेटपटू विराट कोहली आणि त्यांची पत्नी आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हे ‘गो डिजिट’चे गुंतवणूकदार आहेत. त्यांनी फेब्रुवारी २०२० मध्ये कंपनीत एकंदर २.५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. विराटने प्रत्येकी ७५ रुपये याप्रमाणे २.६६ लाख समभाग, तर अनुष्काने सुमारे ६६ हजार समभाग खरेदी केले आहेत. आता ‘आयपीओ’च्या माध्यमातून प्रत्येकी २७२ रुपये किमतीला समभाग विक्री होणार आहे. त्यामुळे या दाम्पत्याकडील २.५ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे मूल्य ९.०६ कोटींवर पोहोचणार आहे. दोघेही त्यांच्याकडील समभागांची विक्री करणार नसले तरी त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य जवळपास चार वर्षांत २६३ टक्क्यांनी वधारले आहे.