लंडन : भू-राजकीय जोखीम आणि त्या परिणामी जागतिक अर्थव्यवस्थेतील अनिश्चिततेत सुरक्षित आश्रयस्थान सोन्याच्या मागणीत सुरू असलेल्या वाढीने शुक्रवारी या मौल्यवान धातूच्या किमतीनी सार्वकालिक विक्रमी शिखर गाठले. शुक्रवारी सत्राच्या सुरुवातीला प्रति औंस २,४००.३५ डॉलरचा विक्रमी उच्चांक त्याने गाठला. सलग चौथ्या सप्ताहात किंमत वाढीचा क्रम सुरू असून, मावळत असलेल्या आठवड्यात सोन्याच्या किमती जवळपास तीन टक्क्यांनी वाढल्या आहेत.

जगभरात मध्यवर्ती बँकांकडून सुरू असलेल्या खरेदीतून सोन्याच्या किमतीत अधिक चढ दिसून येण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे गुंतवणूकदारांमध्ये भू-राजकीय संघर्षांबद्दल वाढत्या चिंतेसह सुरक्षित-आश्रय म्हणून या मालमत्तेची मागणी वाढली आहे, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे. विशेषत: चीनच्या ढासळत असलेल्या अर्थव्यवस्थेचा जागतिक अर्थचित्रावरील विपरीत परिणामाबद्दल गुंतवणूकदारांमध्ये मोठी चिंता आहे.

हेही वाचा…Gold-Silver Price on 12 April 2024: सोने-चांदी महागले, १० ग्रॅम सोन्यासाठी मोजावे लागतायेत ‘एवढे’ पैसे

दरम्यान, व्हिएतनामच्या मध्यवर्ती बँकेने आंतरराष्ट्रीय बाजारात किमतीच्या स्थिरतेसाठी सोन्याचा पुरवठा वाढवत असल्याचे सूचित केले आहे, तर त्या उलट चीनच्या मध्यवर्ती बँकेने मार्चमध्ये त्यांच्या विदेशी गंगाजळीत सोन्याची अधिक भर घातली आहे.

अमेरिकेच्या वायदे बाजारात सोने वायदे प्रति औंस २,४११.७० डॉलरवर सुरू आहेत. तर स्पॉट सिल्व्हर २.३ टक्क्यांनी वाढून प्रति औंस २९.१३ डॉलरवर सुरू आहेत. चांदीने फेब्रुवारी २०२१ नंतर किमतीत दाखवलेली ही सर्वोच्च पातळी आहे. चांदीच्या औद्योगिक मागणी सुरू असलेली लक्षणीय वाढ यामागे आहे.

हेही वाचा…Gold-Silver Price on 11 April 2024: लग्नसराईत सोन्याला झळाळी, तर चांदीही चमकली, जाणून घ्या आजचा भाव

मुंबईतही घाऊक दरही ७३,३१० वर

मुंबईच्या झवेरी बाजारातील घाऊक व्यवहारात २४ कॅरेट शुद्ध सोने शुक्रवारी १० ग्रॅमसाठी ७३,३१० रुपये या अभूतपूर्व पातळीवर व्यवहार करीत होते. जीएसटी आणि अन्य कर जमेस धरल्यास किरकोळ सराफांकडील दर ७४,५०० रुपयांच्या घरात जाणारे आढळून आले. गत १० दिवसांत सोन्याच्या किमतीनी तोळ्यामागे तब्बल २,१५० रुपयांनी, तर गत महिनाभरात जवळपास पाच हजार रुपयांनी उसळी घेतली आहे.