अक्षय्य तृतीयेनिमित्त भारतात सोन्याच्या किंमतीत किंचित घसरण झाली असली तरीही येत्या काळात सोन्याच्या किमती पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कमी झालेल्या दराच्या संधीचा फायदा उचलण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातोय.

एक लाखाच्या पार गेलेले सोने आता प्रति १० ग्रॅम ९८ ते ९९ हजारांच्या जवळपास आले आहे. २०२५ च्या वर्षात आतापर्यंत २३ टक्क्यांनी सोन्याची किंमत वाढली आहे. पण गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत घसरण होत आहे. इकोनॉमिक्स टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, एचडीएफसी सिक्युरिटीजचे कमोडिटी आणि करन्सी प्रमुख अनुज गुप्ता या संधीचं सोनं करण्याचं आवाहन केलं आहे. गुंतवणूकदारांना टप्प्याटप्प्याने किंवा सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे खरेदी करण्याचा सल्ला त्यांनी दिलाय. कारण सोन्याच्या किमती पुन्हा १ लाखांच्या पार जाण्याची शक्यता आहे.

गेल्या दहा वर्षांत १४ टक्के परतावा

गेल्या १० वर्षांत अक्षय तृतीयेपर्यंत सरासरी परतावा १४ टक्के राहिला आहे. ७ मे २०१९ ते २६ एप्रिल २०२० दरम्यान सर्वाधिक परतावा ४६ टक्के होता. तर, १० मे २०२४ रोजीच्या अक्षय तृतीयेपासून ३० टक्के परतावा मिळाला आहे, असं अनुज गुप्ता म्हणाले.

ऑगमोंट येथील संशोधन प्रमुख रेनिशा चैनानी यांनी दावा केलाय की साप्ताहिक चार्टमध्ये सोन्याने शूटिंग स्टार कँडलिस्टक पॅटर्न तयार केला आहे. जो त्यांच्या मते संभाव्य अपट्रेंड रिव्हर्सल दर्शवतो. आठवड्यात सोन्याच्या किमतीच्या हालचालीचा एक मनोरंजक तांत्रिक घटक होता. जर या आठवड्यात किंमती ९५ हजार रुपयांपेक्षा कमी राहिल्या तर त्या ५० टक्के घसरून ९३ हजार रुपये आणि ६१.८ टक्के घसरून ९१ हजार ५०० रुपयांपर्यंत पोहोचू शकतात.

मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचे वरिष्ठ विश्लेषक मानव मोदी यांनी देखील सोन्यावरील घसरणीवर खरेदीचा अंदाज कायम ठेवला आहे. ९० हजार ते ९१ हजार रुपयापर्यंत सोनं खरेदी केल्यास त्याचं लाँग टर्म टार्गेट १ लाख ६ हजारापर्यंत जाण्याची शक्यता आहे.