जगातील सर्वात मोठी कार्यालयीन इमारत म्हणून ओळखल्या जाणार्‍या सूरत डायमंड बोर्स (SDB)मधील फर्म किरण जेम्स यांनी मुंबईत परतण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या SDB च्या उद्घाटनानंतर अवघ्या एका महिन्यातच एका कंपनीने माघार घेतल्याने या प्रकल्पाच्या महत्त्वाकांक्षी भविष्यावर संशय निर्माण झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फ्री प्रेस जनरलने दिलेल्या वृत्तानुसार, “आम्ही बैठकीत वल्लभ काकांना त्यांचा किरण जेम्सच्या माध्यमातून चालवला जाणारा व्यवसाय मुंबईला हलवण्यास सांगितले आणि सूरत डायमंड बोर्स सक्रियपणे चालू झाल्यावर परत या, असाही सल्ला दिला,” असे SDB समितीच्या एका मुख्य सदस्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. “तुम्ही एकट्याने इथे व्यापार करू शकत नाही, वल्लभ काका एकटेच होते, त्यांना कोणीही साथ दिली नाही,” असंही तो म्हणाला.

हेही वाचाः सोने-चांदी महागले, मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय, आता मोजावी लागणार जास्तीची किंमत

वल्लभभाई लखानी यांच्या नेतृत्वाखाली किरण जेम्स ही नोव्हेंबर २०२३ मध्ये SDB त स्थलांतरित होणारी पहिली प्रमुख व्यापारी फर्म होती, त्यांच्या कर्मचार्‍यांसाठी सूरतमध्ये १२०० फ्लॅट बांधण्यात आले होते. SDB च्या मागे असलेल्या लखानींनी त्यांची कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी पहिल्यांदा पुढाकार घेतला आणि इतरांनाही येथे येण्यास आकर्षित केले. परंतु सूरत डायमंड बोर्समधून म्हणावा तसा व्यापाऱ्यांना प्रतिसाद मिळत नसल्याचे वृत्त आहे.

हेही वाचाः विश्लेषण : भारतातील अन्नधान्य चलनवाढीचे जागतिकीकरण कसे रोखणार? आता कोणते घटक निर्णायक ठरणार?

किरण जेम्स मुंबईत परतण्याची अनेकविध कारणे आहेत. सूरतचे कमिशन स्ट्रक्चर स्वीकारण्यास मुंबईतील व्यापाऱ्यांची इच्छा नाही. शहर आणि बोर्सच्या दुर्गम स्थानादरम्यान सार्वजनिक वाहतुकीचा अभाव असल्याचे कारण देत वाढत्या तोट्याबद्दलही व्यापाऱ्यांमध्ये कुजबूज आहे. “कर्मचारी स्थलांतर करण्यास संकोच करत होते आणि सूरतचे कामगारदेखील लांब प्रवासासाठी उत्सुक नव्हते,” असे समिती सदस्याने सांगितले. जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल (GJEPC) चे वरिष्ठ अधिकारी म्हणाले, “किरण जेम्सचे भारत डायमंड बाजारातील कार्यालय बंद करून सूरतला तळ हलवण्याचा हा निर्णयच मुळी चुकीचा होता. लखानी किरण जेम्स मुंबईचे कार्यालय चालवू शकले असते आणि सूरतपर्यंत विस्ताराची घोषणा करू शकले असते.”

सूरत डायमंड बोर्स सुरू होण्यापूर्वी देशाची आर्थिक राजधानी मुंबई हिरे व्यापाऱ्यांच्या केंद्रस्थानी होती. परंतु SDB उघडल्यानंतर सूरतदेखील दागिने आणि हिरे व्यापाराचे एक मोठे केंद्र बनेल, असे त्यांना वाटत होते. मात्र आता या डायमंड बोर्सला मोठा धक्का बसताना दिसत आहे.

गेल्या वर्षी १७ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून गुजरातमध्ये सूरत डायमंड बोर्सचे (SDB) उद्घाटन करण्यात आले होते, परंतु एक महिन्यातच त्यांनी पुन्हा मुंबईत परतण्याचे ठरवले आहे. डायमंड बोर्स सर्वात जगातील मोठी कार्यालयीन इमारत आहे. येथे ४,२०० हून अधिक हिरे व्यापाऱ्यांसाठी कार्यालये आहेत. मात्र, बोर्ससाठी पुढाकार घेणारे प्रसिद्ध हिरे व्यापारी वल्लभभाई लखानी खुद्द आपला व्यवसाय पुन्हा मुंबईला हलवत असल्यानं त्याबाबत चिंता निर्माण झाली आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gujarat kiran james returns to mumbai again surat diamond bourse will lose its luster vrd
First published on: 23-01-2024 at 15:49 IST