भारतीय वंशाचे अब्जाधीश आता जगभरात नावलौकिक मिळवत आहेत. यापूर्वी लक्ष्मी मित्तल यांनी लंडनमध्ये घर खरेदी करून प्रसिद्धी मिळवली होती. काही वर्षांपूर्वी भारतीय वंशाच्या लक्ष्मी निवास मित्तल यांनी ब्रिटनच्या राजघराण्याकडून राजवाडा विकत घेतल्याच्या बातम्या आल्या होत्या. आता ती बातमी भूतकाळात गेली असली तरी नवी बाब म्हणजे भारतीय वंशाच्या आणखी एका व्यावसायिकाने स्वित्झर्लंडमध्ये विक्रमी किमतीत घर विकत घेतले आहे.

भारतीय वंशाचे अब्जाधीश उद्योगपती पंकज ओसवाल आणि त्यांची पत्नी राधिका ओसवाल यांनी नुकताच स्वित्झर्लंडमध्ये हजारो कोटींचा व्हिला खरेदी केला आहे. रिपोर्टनुसार, ओसवाल कुटुंबाचे हे नवीन घर स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा शहराजवळील गिंगिन्स गावात आहे. हा व्हिला ४.३० लाख स्क्वेअर फूटचा आहे. ‘विला वारी’ असे या व्हिलाचे नाव आहे. विशेष म्हणजे हा व्हिला १०० वर्षांपेक्षा जुना आहे. हा व्हिला पहिल्यांदा १९०२ मध्ये स्वित्झर्लंडमधील एका थोर व्यक्तीने बांधला होता. नंतर ते घर ग्रीक शिपिंग व्यावसायिक अॅरिस्टॉटल ओनासिस यांनी विकत घेतले. त्यानंतर आता ओसवाल यांच्या ते मालकीचे झाले.

त्या घराची किंमत सुमारे २०० दशलक्ष डॉलर्स आहे. म्हणजेच पंकज ओसवाल यांनी हा व्हिला सुमारे १,६५० कोटी रुपयांना विकत घेतला आहे. हे जगातील सर्वात महागड्या घरांपैकी एक असल्याचे बोलले जात आहे. या व्हिलामध्ये १२ बेडरूम, १७ बाथरूम, एक स्विमिंग पूल, एक टेनिस कोर्ट, एक हेलिपॅड, सिनेमा हॉल, वाईन सेलर आणि स्पा आहे. ओसवाल कुटुंबीयांनी त्यांच्या स्वत:च्या शैलीनुसार या व्हिलाचे नूतनीकरण केले आहे.

हेही वाचाः विश्लेषण : टोमॅटो उत्पादक अन् ग्राहक दोघेही चिंतेत; भाव वाढण्याचे कारण काय? 

या व्हिलाचे इंटेरियर प्रसिद्ध डिझायनर जेफ्री विल्कीस यांनी तयार केले असून, या कामावर करोडो रुपये खर्च करण्यात आले आहेत. विल्कीसने यापूर्वी द ओबेरॉय राजविलास, द ओबेरॉय उदयविलास आणि द लीला हॉटेल डिझाइन केले आहे. पंकज ओसवाल हे दिवंगत भारतीय उद्योगपती अभय कुमार ओसवाल यांचे पुत्र आहेत. ज्यांनी ओसवाल अॅग्रो मिल्स आणि ओसवाल ग्रीनटेक यांसारख्या कंपन्या स्थापन केल्या. पंकज ओसवाल सध्या ओसवाल ग्रुप ग्लोबलचा व्यवसाय हाताळत आहेत, ज्यांचा व्यवसाय पेट्रोकेमिकल्स, रिअल इस्टेट, खते आणि खाणकाम यांसारख्या क्षेत्रात आहे. पंकज ओसवाल याआधीही आलिशान घरांमुळे चर्चेत आहेत. तो ऑस्ट्रेलियात एक आलिशान घर बांधत होता, जे कायद्याच्या कचाट्यात अडकले होते. सध्या त्यांची एकूण संपत्ती ३ अब्ज डॉलर्स इतकी आहे.

हेही वाचाः क्रेडिट सुईसच्या टेकओव्हरनंतर यूबीएसची मोठी कर्मचारी कपात

Story img Loader