लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबई : मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स समूहाच्या मालकीच्या जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसचे बाजारभांडवलाने पहिल्यांदा २ लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला. विद्यमान वर्षातील पहिल्या दोन महिन्यात आजपावेतो समभागाने ३५ टक्क्यांची वाढ नोंदवली. सलग पाचव्या सत्रात शेअरने दौड कायम राखली असून, या कालावधीत बाजारभांडवल १७ टक्के वाढीसह २,१२,१६७ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. दिवसअखेर समभाग १०.२७ टक्क्यांनी वधारून ३३३.९५ रुपयांवर स्थिरावला.
समूहातील प्रमुख कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागाने देखील २,९९५.१० या ५२ आठवड्यातील सर्वोच्च पातळीला स्पर्श केला. सध्या, भांडवली बाजारात ३९ कंपन्यांचे बाजारभांडवल २ लाख कोटी रुपयांच्या पुढे आहे. यात रिलायन्स इंडस्ट्रीज २०.०५ लाख कोटी रुपयांच्या बाजारभांडवलासह आघाडीवर आहे, त्यानंतर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि एचडीएफसी बँक अनुक्रमे १४.७८ लाख कोटी आणि १०.७८ लाख कोटी रुपये आहे.