वृत्तसंस्था, नवी दिल्ली : जागतिक पातळीवरील आर्थिक घसरणीचे चटके भारताच्या माहिती-तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्राला मोठ्या प्रमाणात बसत आहेत. त्यामुळे मागील आर्थिक वर्षात आयटी कंपन्यांकडून नवीन मनुष्यबळाच्या भरतीत लक्षणीय उतार दिसून आला. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस), इन्फोसिस आणि एचसीएल टेक या देशातील आघाडीच्या तीन आयटी कंपन्यांच्या भरतीत मागील आर्थिक वर्षात तब्बल ६५ टक्के घट नोंदवली गेली.
आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये टीसीएस, इन्फोसिस आणि एचसीएल टेक या कंपन्यांनी ६८,८८६ कर्मचाऱ्यांची भरती केली. त्या आधीच्या वर्षात नव्या भरतीची संख्या १,९७,००० इतकी होती. म्हणजे ती वर्षागणिक ६५ टक्के घटली आहे. आयटी कंपन्यांचे सरलेल्या तिमाहीचे निकाल निराशाजनक आहेत. नजीकच्या काळात परिस्थिती सुधारेल, याबाबत या कंपन्या आशावादी नाहीत. अमेरिका आणि युरोपमधील बँकिंग संकटाचा हा परिणाम आहे.
कंपन्यांकडून मनुष्यबळात होणारी वाढ ही त्यांच्या नवीन कामाच्या मागणीची निदर्शक असते. मागील आर्थिक वर्षातील चौथ्या तिमाहीत कंपन्यांवरील दबाव सुस्पष्टपणे समोर आला आहे. चौथ्या तिमाहीत या कंपन्यांनी मनुष्यबळात केलेली वाढ त्याआधीच्या वर्षातील चौथ्या तिमाहीच्या तुलनेत ९८.७ टक्क्यांनी कमी आहे. टीसीएस, एचसीएल टेक आणि इन्फोसिसकडून चौथ्या तिमाहीत मनुष्यबळात झालेली वाढ जानेवारी-मार्च २०२२ मधील ६८,२५७ च्या तुलनेत, २०२३ मध्ये अवघी ८८४ इतकी होती.
टीसीएसने आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये १,०३,५४६ कर्मचाऱ्यांची भरती केली. ही संख्या आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये केवळ २२,६०० इतकी आहे. इन्फोसिसने मागील आर्थिक वर्षात २९,२१९ कर्मचाऱ्यांची भरती केली. त्या आधीच्या आर्थिक वर्षात ही संख्या ५४,३९६ होती. एचसीएल टेकने मागील आर्थिक वर्षात १७,०६७ कर्मचाऱ्यांची भरती केली. त्याआधीच्या आर्थिक वर्षात ही संख्या ३९,९०० होती.