पीटीआय, नवी दिल्ली

म्युच्युअल फंड हा अलिकडच्या काळातील गुंतवणुकीसाठी वाढती पसंती मिळत असलेला पर्याय याची प्रचीती म्हणजे, छोट्या वैयक्तिक गुंतवणूकारांच्या विविध फंडांमधील मालमत्तेत वार्षिक ९.३ टक्क्यांची वाढ होऊन तिचे मूल्य जानेवारीअखेर वाढून २३.४ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

म्युच्युअल फंड उद्योगाची शिखर संघटना ‘ॲम्फी’च्या आकडेवारीनुसार, मागील वर्षातील जानेवारी महिन्यात छोट्या गुंतवणूकदारांच्या म्युच्युअल फंडांतील गुंतवणुकीचे एकूण मूल्य २१.४० लाख कोटी रुपये होते. ते यंदाच्या जानेवारीअखेरपर्यंत २३.४ लाख कोटी रुपयांवर गेले, म्हणजे ९.३ टक्क्यांनी वाढले आहे. उल्लेखनीय म्हणजे याच कालावधीत संस्थात्मक गुंतवणूकदारांची हिस्सेदारी मात्र कमी झाली आहे. मागील वर्षी जानेवारी महिन्यात त्यांच्या मालमत्तेचे मूल्य १७.४९ लाख कोटी रूपये होते, जे चालू वर्षी जानेवारी महिन्यात १७.४२ लाख कोटी रुपयांवर उतरले आहे.

म्युच्युअल फंडांच्या व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्तेत किरकोळ गुंतवणूकदारांचा वाटा वाढून ५७.३ टक्क्यांवर पोहोचला आहे. मागील वर्षी याच कालावधीत तो ५५ टक्के होता. जानेवारी महिन्यात संस्थात्मक गुंतवणूकदारांचा वाटा ४२.७ टक्क्यांपर्यंंत संकोचला आहे.

नियोजनबद्ध गुंतवणूक पद्धती अर्थात ‘एसआयपी’द्वारे सर्वसामान्यांच्या गुंतवणुकीत निरंतर वाढ होत आहे. जानेवारीमध्ये सलग चौथ्या महिन्यात ‘एसआयपी’च्या माध्यमातून मासिक सरासरी १३ हजार कोटी रुपयांपर्यंत नवीन गुंतवणूक आली. म्युच्युअल फंडांबाबत किरकोळ गुंतवणूकदारांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचे मोठे काम ‘ॲम्फी’ने हाती घेतले आणि त्याचे फलित आता दिसून येत आहे. ‘एसआयपी’च्या माध्यमातून डिसेंबर २०२२ मध्ये १३ हजार ५७३ कोटी रुपये होती. यंदा जानेवारी महिन्यात ती १३ हजार ८५६ कोटी रूपयांवर पोहोचली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकूण मालमत्ता ४०.८ लाख कोटींवर

‘ॲम्फी’च्या आकडेवारीनुसार, म्युच्युअल फंडांच्या व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्तेत वाढ होऊन जानेवारी महिन्यात ती ४०.८ लाख कोटी रुपयांवर पोहोचली. मागील वर्षी जानेवारी महिन्यात हा आकडा ३८.८९ कोटी रुपये होता. आता त्यात ४.९३ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.