आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यासाठी मोठी बातमी आहे. त्यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या उपकंपनीचे मूल्यांकन आता ८ लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे, तर रिलायन्स इंडस्ट्रीज आधीच देशातील सर्वात मूल्यवान कंपनी बनली आहे. या वाढीव मूल्यांकनाच्या आधारे रिलायन्स समूहाच्या आरआरव्हीएल कंपनीमध्ये केकेआर ही कंपनी २०६९.५० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने सोमवारी याबाबत शेअर बाजाराला माहिती दिली. कंपनीने म्हटले आहे की, जागतिक गुंतवणूक कंपनी KKR (Kohlberg Kravis Roberts) ‘रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड’ (RRVL) मध्ये २०६९.५० कोटी रुपयांची गुंतवणूक करेल, जी त्याच्या किरकोळ व्यवसायाची देखरेख करणारी उपकंपनी आहे. यानंतर रिलायन्स रिटेल व्हेंचर्समधील KKR ची हिस्सेदारी १.१७ टक्क्यांवरून १.४२ टक्क्यांपर्यंत वाढेल.
मूल्यांकन ८ लाख कोटींच्या पुढे
KKR ने ही गुंतवणूक रिलायन्स रिटेलमध्ये ८.३६ लाख कोटी (सुमारे १०१ अब्ज डॉलर) मूल्यांकनात केली आहे. २०२० मधील त्याच्या शेवटच्या गुंतवणुकीच्या वेळी हे मूल्यांकन जवळजवळ दुप्पट आहे. या मूल्यांकनानंतर शेअर मूल्याच्या बाबतीत ती देशातील चौथी सर्वात मोठी कंपनी बनली आहे. वर्ष २०२० मध्ये KKR ने रिलायन्स रिटेलमध्ये ५५५० कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती आणि कंपनीमध्ये १.१७ टक्के हिस्सेदारी घेतली होती. त्यानंतर कंपनीचे मूल्यांकन ४.२१ लाख कोटी रुपये निश्चित करण्यात आले. त्यावेळी रिलायन्स रिटेलने जगभरातील विविध गुंतवणूकदारांकडून ४७,२६५ कोटी रुपये जमा केले होते.
गेल्या आठवड्यात ८,२७८ कोटी रुपये जमा झाले
रिलायन्स रिटेल आपला व्यवसाय झपाट्याने वाढवत आहे. सध्या ही देशातील सर्वात मोठी रिटेल कंपनी आहे. मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी ही कंपनी चालवते. कंपनीची देशभरात १८००० हून अधिक रिटेल स्टोअर्स आहेत. गेल्या आठवड्यातच कतारच्या सरकारी गुंतवणूक निधी QIA ने देखील या रिलायन्स कंपनीत ८,२७८ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्या बदल्यात त्यांना कंपनीत सुमारे एक टक्का हिस्सा मिळाला.
हेही वाचाः शेअर बाजारात नवा विक्रम, गुंतवणूकदारांनी ६ तासांत ३.३१ लाख कोटींची केली कमाई
रिलायन्सचा रिटेल क्षेत्रातील टॉप ४ कंपन्यांमध्ये समावेश
दोन्ही कंपन्यांनी दिलेल्या संयुक्त निवेदनात असे म्हटले आहे की, ही गुंतवणूक ८.३६१ लाख कोटी रुपयांच्या (१००.८७ अब्ज डॉलर) मूल्यावर करण्यात आली आहे. या मूल्यांकनानंतर रिलायन्स रिटेल देशातील पहिल्या चार कंपन्यांमध्ये सामील झाली आहे.
रिलायन्स रिटेलचा व्यवसाय
रिलायन्स रिटेल ही देशातील सर्वात मोठ्या रिटेल चेनपैकी एक आहे. कंपनीची १८,५०० पेक्षा जास्त स्टोअर्स आहेत. कंपनी इलेक्ट्रॉनिक्स, किराणा, फॅशन आणि फार्मा इत्यादी किरकोळ क्षेत्रात सक्रिय आहे.