मुंबई : भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ने इंडसइंड बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक सुमंत कथपालिया यांच्यासह चार जणांवर भांडवली बाजारात व्यवहार करण्यास बंदी घातली आहे. सेबीच्या पुढील आदेशापर्यंत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कोणत्याही प्रकारे समभाग खरेदी, विक्री किंवा व्यवहार करण्यापासून प्रतिबंधित करण्यात आले आहे. बँकेचे माजी मुख्याधिकारी व सह-मुख्याधिकारी यांनी ‘इनसायडर ट्रेडिंग’च्या नियमांचे उल्लंघन केले असल्याचे आरोप आहेत.

तसेच, सेबीने दिलेल्या अंतरिम आदेशानुसार, नियामकाने पाच व्यक्तींकडून एकत्रितपणे १९.७८ कोटी रुपये जप्त केले आहेत. सेबीने प्रतिबंधित केलेले इतर अधिकाऱ्यांमध्ये बँकेचे कार्यकारी संचालक आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण खुराणा; ट्रेझरी विभागाचे प्रमुख सुशांत सौरव, रोहन जठन्ना आणि ग्राहक बँकिंग विभागाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी अनिल मार्को राव यांचा समावेश आहे. या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर समभागाशी संबंधित किंमत-संवेदनशील माहितीचा (यूपीएसआय) गैरवापर करून फायदा करून घेतल्याचा आरोप आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हिशेबातील त्रुटींचा उलगडा झाल्याने अडचणीत सापडलेल्या या बँकेने तिच्या काही अधिकारी-कर्मचाऱ्यांनी या फसवणुकीत मोठी भूमिका बजावल्याची आणि त्याचाच बँकेच्या आर्थिक कामगिरीवर विपरित परिणाम झाल्याची कबुली दिली. तर बँक स्थापनेनंतरच्या १८ वर्षांत पहिल्यांदाच बँकेने २,३२८.९२ कोटी रुपयांचा निव्वळ तिमाही तोटा नोंदविला.