मुंबई : शेअर बाजारात नशीब अजमावणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत असून अलीकडच्या काही महिन्यांतील बाजार तेजीने लक्षणीय प्रमाणात किरकोळ गुंतवणूकदारांना आकर्षित केले आहे. सरलेल्या आर्थिक वर्षात म्हणजेच मार्च २०२३ ते एप्रिल २०२४ दरम्यान ३.७ कोटी डिमॅट खात्यांची भर पडली आहे. ही आतापर्यंतची एका आर्थिक वर्षात पडलेली सर्वात मोठी वाढ आहे.

सरासरी दर महिन्याला ३० लाख नवीन डिमॅट खाती उघडली गेली आहेत. गुंतवणुकीची प्रक्रिया कागदरहित हाताळली जाण्यासह, समभाग वा रोख्यांच्या इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील जतनासाठी डिमॅट खाती उपयुक्त आहेत. भारतात सध्या कार्यरत असलेल्या नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी (एनएसडीएल) आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (सीडीएसएल) या दोन डिपॉझिटरी संस्था आहेत, ज्यांच्याकडे गुंतवणूकदारांना डिमॅट खाते उघडता येते.

हेही वाचा : Sensex Today: बाजार उघडताच सेन्सेक्सची उसळी; गाठला ऐतिहासिक उच्चांक!

सरलेल्या आर्थिक वर्षात या दोन डिपॉझिटरीसह उघडलेल्या डिमॅट खात्यांची संख्या ११.४५ कोटींवरून १५.१४ कोटींवर पोहोचली असून त्यात वार्षिक ११.९ टक्के वाढ झाली आहे. सरलेल्या वर्षात सेन्सेक्स आणि निफ्टी या प्रमुख निर्देशांकांनी अनुक्रमे २४.८५ टक्के आणि २८.६१ टक्के वाढ साधली, तर व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांनी उल्लेखनीय अशी ६३.४4 टक्के आणि ६० टक्के तेजी दर्शवली. परिणामी, भांडवली बाजारातील तेजीकडे मोठ्या संख्येने गुंतवणूकदार आकर्षित झाले. शिवाय पारंपरिक शेअर ब्रोकरबरोबरच ‘ग्रो’, ‘झिरोधा’, ‘एंजलवन’ यांसारख्या डिस्काऊंट ब्रोकरमुळे भांडवली बाजारात नव्याने आलेल्या गुंतवणूकदारांची संख्या तेजीने वाढली.

हेही वाचा :Gold-Silver Price on 8 April 2024: सोने-चांदीत विक्रमी तेजी; किमती पुन्हा गगनाला भिडल्या, जाणून घ्या आजचा भाव 

जोपर्यंत बाजारात मोठी घसरण होत नाही तोपर्यंत डिमॅट खात्यांची जोडणी सध्याच्या गतीने सुरू राहण्याची शक्यता आहे. शिवाय बाजारात अस्थिर निर्माण झाली आणि नंतर पुन्हा त्याने तेजीचा वरचा मार्ग निवडला, तर या संधीचा फायदा घेण्यासाठी आणखी डिमॅट खात्यांची जोडणी शक्य आहे. तसेच भारतीय भांडवली बाजाराने गेल्या ५ ते १० वर्षांत जागतिक आणि उदयोन्मुख बाजारांना परताव्याच्या तुलनेत सातत्याने मागे टाकले आहे, परिणामी सर्व स्तरांतील गुंतवणूकदारांचे स्वारस्य वाढले आहे, असे मत जीडीएफसी सिक्युरिटीजचे संशोधन प्रमुख दीपक जसानी व्यक्त केले.