Global in e commerce sector Company job cuts Amazon ysh 95 | Loksatta

नोकरकपात पुढील वर्षांत अधिक गतिमान -अ‍ॅमेझॉन

ई-व्यापार क्षेत्रातील जागतिक महाकाय कंपनी अ‍ॅमेझॉनकडून वरिष्ठ श्रेणीतील नोकरकपात टप्प्याटप्प्याने राबवत, पुढील वर्षांत अधिक गतिमान केली जाईल, असा गुरुवारी अधिकृतपणे इशारा देण्यात आला.

नोकरकपात पुढील वर्षांत अधिक गतिमान -अ‍ॅमेझॉन

पीटीआय, न्यूयॉर्क : ई-व्यापार क्षेत्रातील जागतिक महाकाय कंपनी अ‍ॅमेझॉनकडून वरिष्ठ श्रेणीतील नोकरकपात टप्प्याटप्प्याने राबवत, पुढील वर्षांत अधिक गतिमान केली जाईल, असा गुरुवारी अधिकृतपणे इशारा देण्यात आला. कंपनीने बुधवारी त्यांच्या उपकरणे आणि प्रकाशन विभागातील नोकरकपातीबद्दल खुलासेवार माहिती दिली. शिवाय काही कर्मचाऱ्यांना ऐच्छिक निवृत्तीचा पर्यायदेखील देऊ केल्याची माहिती अ‍ॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँडी जॅसी यांनी दिली. कर्मचाऱ्यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात, मुख्याधिकारीपदाची जबाबदारी घेतल्यापासून दीड वर्षांच्या कार्यकाळात आणि विशेषत: करोना साथीच्या काळात अनेक कठोर निर्णय घ्यावे लागले, असे जॅसी यांनी नमूद केले आहे. 

कंपनीने गेल्या काही महिन्यांत आपल्या व्यवसायाच्या विविध क्षेत्रांमध्ये खर्चात कपात केली. या व्यतिरिक्त आणखी कुठे बचत केली जाऊ शकते अशा विविध पर्यायांचा शोध घेतला जात आहे. जागतिक पातळीवरील प्रतिकूल वातावरण आणि गेल्या काही वर्षांमध्ये कंपनीने केलेल्या आक्रमक भरतीमुळे चालू वर्षांत परिस्थितीच्या पुनरावलोकनाची ही वेळ ओढवली आहे.

मंगळवारी, अ‍ॅमेझॉनने राज्यातील विविध कार्यलयांतील सुमारे २६०  कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. मात्र आठवडाभरात कंपनीने एकूण किती कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे, हे अधिकृतपणे उघड करण्यात आलेले नाही. कंपनी सध्या वार्षिक पुनरावलोकन प्रक्रियेतून जात असल्याने येत्या काळातदेखील नोकरकपात सुरू राहण्याची शक्यता आहे. शिवाय अजून किती नोकऱ्यांवर गदा येईल याबाबतदेखील सध्या निश्चित सांगता येणार नाही. कंपनी सध्या तिच्या आगामी वाटचालीबद्दल विचार करत असून कंपनीच्या स्थिरतेला सर्वाधिक प्राधान्य असेल, असे जॅसी यांनी सांगितले.

मराठीतील सर्व अर्थभान ( Business ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-11-2022 at 00:02 IST
Next Story
‘आनंदा’चे डोही आनंदतरंग फ्रँकलिन इंडिया फ्लेक्झीकॅप फंड