GreyLabs AI CEO Aman Goyal : सध्याच्या काळात यशस्वी होणं आणि पैसे कमावणं महत्वाचं आहे, कारण तेव्हाच लोक तुमच्याकडे एक यशस्वी व्यक्ती म्हणून पाहतात. आता अशाच एका कोट्यधीस असणाऱ्या व्यक्तीची सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू आहे. याचं कारणही तसंच आहे. सध्याच्या धावपळीच्या काळात घरचं काम करण्यासाठी वेळ मिळत नसल्यामुळे एका मुंबईतील आयआयटीयन व्यक्तीने स्वत:च्या घरी एका गृह व्यवस्थापकाची नियुक्ती केली आहे. त्यासाठी ते चक्क १ लाख रुपयांचा महिन्याला पगार देतात.

ग्रेलॅब्‍स एआयचे सीईओ अमन गोयल यांनी त्यांना वेळ मिळत नसल्याचं कारण सांगत घर सांभाळण्यासाठी होम मॅनेजरची नियुक्ती केल्याचं सोशल मीडियावरील एका पोस्टद्वारे सांगितलं आहे. ते त्यांच्या होम मॅनेजरला दरमहा १ लाख रुपये देत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. होम मॅनेजर घरकामापासून ते किराणा आणि इतर दैनंदिन काम करत असल्याचं गोयल यांनी सांगितलं. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.

होम मॅनेजरची नियुक्ती केल्यानंतर त्याला घर सांभाळण्यासाठी एवढे पैसे का दिले? याचाही खुलासा सीईओ अमन गोयल यांनी केला आहे. त्यांनी सांगितलं की घरची कामे करण्यासाठी आणि घराची काळजी घेण्यासाठी त्यांच्याकडे एवढा वेळ नाही. त्यामुळे हा निर्णय घेतला आहे आणि होम मॅनेजरची नियुक्ती केल्यामुळे त्यांची खूप डोकेदुखी कमी झाली आणि वेळही वाचला असल्याचं सीईओ अमन गोयल यांचं म्हणणं आहे.

सीईओ अमन गोयल यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटलं की, ते आणि त्यांची पत्नी हर्षिता हे दोघेही व्यावसायिक आहोत. त्यामुळे त्यांच्याकडे घर सांभाळण्यासाठी वेळ नाही. ज्यामध्ये स्वयंपाक, साफसफाई, दुरुस्ती, बिल भरणे, किराणा सामान खरेदी करणे आणि बऱ्याच काही कामांचा समावेश आहे.

दरम्यान, अमन गोयल हे आयआयटी पदवीधर आहेत, तसेच त्यांची पत्नी आयआयटी कानपूरची माजी विद्यार्थीनी आहे. अमन गोयल हे आणि त्यांची पत्नी दोघेही ग्रेलॅब्‍स एआयमध्ये काम करतात. त्यामुळे त्यांच्याकडे मर्यादित वेळ असल्याने त्यांनी घर व्यवस्थापनासाठी एका मॅनेजरची नियुक्ती केली आहे.