भारताने आगामी काही वर्षांत पाच लाख कोटी (ट्रिलियन) अमेरिकी डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याच्या महत्त्वाकांक्षी लक्ष्याच्या दिशेने आगेकूच सुरू ठेवली असताना, देशातीलच नव्हे तर आशियातील सर्वात जुना भांडवली बाजार असलेल्या मुंबई शेअर बाजाराने हे लक्ष्य मंगळवारीच गाठले.

मुंबई शेअर बाजार अर्थात ‘बीएसई’वर सूचिबद्ध कंपन्यांचे एकत्रित बाजार भांडवलाने मंगळवारच्या सत्रात पाच ट्रिलियन डॉलरचा टप्पा गाठणारी कामगिरी केली, असे बाजाराकडून प्राप्त आकडेवारीने स्पष्ट केले. शेअर बाजारांमध्ये निरंतर सुरू असलेल्या तेजीमुळे हा पराक्रम गाठण्यास मदत झाली. बाजार भांडवल हे कंपनीच्या समभागाचे एकूण मूल्य असते, जे समभागाच्या किमतीचे कंपनीच्या व्यवहारासाठी खुल्या असणाऱ्या समभागांच्या संख्येशी गुणाकार करून मिळवले जाते. याचप्रमाणे मुंबई शेअर बाजारातील सर्व सूचिबद्ध कंपन्यांच्या बाजार भांडवलाच्या एकत्रित बेरजेने केलेली ही कामगिरी आहे.

हेही वाचा : एसबीआय म्युच्युअल फंडाकडून ‘ऑटोमोटिव्ह अपॉर्च्युनिटीज फंडा’ची घोषणा

काहीशी अस्थिरता वगळता, प्रमुख शेअर निर्देशांक अर्थात सेन्सेक्स आणि निफ्टी हे गेल्या काही सत्रांमध्ये फार मोठ्या हालचालीविना स्थिर राहिले आहेत. देशात लोकसभा निवडणुकीचे पाच टप्पे पार पडले असून, केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार तिसऱ्यांदा सत्तास्थानी येईल, अशी बहुतांश गुंतवणूकदारांची अपेक्षा आहे. यामुळे जरी विदेशी गुंतवणूकदार संस्थांकडून जरी विक्री सुरू असली तरी देशी संस्था आणि गुंतवणूकदारांकडून निवडक स्वरूपात खरेदीचा जोम कायम राहिला आहे.

एप्रिलमध्ये अपेक्षेपेक्षा नरमलेली अमेरिकेतील किरकोळ चलनवाढीची आकडेवारी आणि भारतातील चलनवाढीमध्ये सातत्यपूर्ण घट आणि नैऋत्य मोसमी पावसाचे भारतात नेहमीपेक्षा लवकर होऊ घातलेले आगमन, बरोबरीने केंद्रात राजकीय स्थिरतेसंबंधी अनुमान हे अलीकडे प्रामुख्याने भारतीय भांडवली बाजारात तेजीला उपकारक महत्त्वाचे घटक आहेत.

हेही वाचा : चांदीची भांडवली बाजाराच्या परताव्यालाही मात; मे महिन्यातील भावात ११.२९ टक्क्यांची तेजी

‘सेन्सेक्स’मध्ये मात्र माफक घसरण

मुंबईतील लोकसभा निवडणुकीसाठी मतदान असल्याने शेअर बाजारातील सोमवारी व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. त्या आधीच्या आठवड्यात अस्थिरतेतून सावरत, ‘सेन्सेक्स’ने सुमारे २,००० अंशांची उसळी घेतली होती. मंगळवारी मात्र, शुक्रवारच्या बंदच्या तुलनेत सेन्सेक्स ५२.६३ अंश (०.०७ टक्के) घसरणीसह ७३,९५३.३१ अंशांवर बंद झाला. दुसरीकडे निफ्टी निर्देशांकही २७.०५ अंश (०.१२ टक्के) नुकसानीसह २२,५२९.०५ वर मंगळवारी स्थिरावला. निफ्टीतील ५० पैकी तब्बल २७ समभाग घसरले तर २३ वाढीसह बंद झाले.

हेही वाचा : बुडालेले जहाज (भाग २)

दीड महिन्यांत ट्रिलियन डॉलरची भर

एप्रिलच्या सुरुवातीस, मुंबई शेअर बाजाराचे एकत्रित बाजार भांडवलाने चार ट्रिलियन डॉलरचा टप्पा गाठला होता आणि आणखी ट्रिलियन डॉलरची भर बाजाराने अवघ्या दीड महिन्यांत गाठला. परदेशी गुंतवणूकदारांचे विक्री करून माघारी परतणे आणि पहिल्या दोन टप्प्यांत मतटक्का घसरत असल्याने दोलायमान बनलेली बाजार स्थितीने मधल्या काळात भांडवली बाजाराला अस्थिरतेचे ग्रहण लागले होते. एप्रिल महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांनी एकत्रितपणे ८,६७१ कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली आहे, तर मे महिन्यात आतापर्यंत त्यांनी २८,२४२ कोटी रुपये मूल्याचे समभाग विकले आहेत, असे ‘एनएसडीएल’ची आकडेवारी सांगते. मात्र देशी गुंतवणूकदारांकडून सुरू असलेल्या खरेदीने बाजाराने तग धरला असल्याचे दिसून येते.