एचडीएफसीचे दीपक पारिख यांनी अनिल नाईक यांना श्रीयुत इन्फ्रास्ट्रक्चर असे टोपण नाव दिले आहे. लार्सन अँड टुब्रोचे सर्वेसर्वा ए. एम. अर्थात अनिल नाईक यांची पूर्ण कथा लिहायची तर अनेक पाने कमी पडतील. त्यांच्या आयुष्यातील, कारकीर्दीतील एक मोठा लढा जो बाजाराशी संबंधित होता, तोच केवळ सांगणे येथे पुरेसे ठरावे. या सदरानिमित्त त्याची पुन्हा एकदा आठवण करून द्यावीशी वाटते.

जून ९, १९४२ रोजी जन्माला आलेले अनिल नाईक हे १९६५ मध्ये लार्सन अँड टुब्रोमध्ये नोकरीला लागले. १९९९ ला ते मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक झाले. तर २९ डिसेंबर २००३ ला कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक झाले. २०१२ ते २०१७ एल अँड टी उद्योग समुहाचे ते कार्यकारी अध्यक्ष आणि ऑक्टोबर २०१७ ला अ-कार्यकारी अध्यक्ष बनले. २६ जानेवारी २०१९ ला त्यांना पद्मविभूषण हा नागरी सन्मान मिळाला. नाईक यांची ही दीर्घ कारकीर्द. पण त्यांच्या या काळातील कर्तृत्वात त्यांचा संघर्ष प्रचंड मोठा आहे. बाजारासाठी, भागधारकांसाठी त्यांनी अतीव मोलाची एक गोष्ट केली, ती म्हणजे एल अँड टीला कोणत्याही उद्योग समुहाच्या पंखाखाली जाऊ दिले नाही. राष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची उत्पादने विशेषतः अणुऊर्जा, सागर, अवकाश, संरक्षण अशा वेगवेगळ्या क्षेत्रात या कंपनीने एवढे काम करून ठेवले आहे की, खऱ्या अर्थाने ही कंपनी राष्ट्रीय संपत्ती आहे.

हेही वाचा – अदानींच्या तीन कंपन्यांवर आता बाजारात ‘अतिरिक्त पाळत’; अमेरिकी बाजार निर्देशांकातूनही गच्छंती

मात्र या सर्वांच्या पलीकडे एक मेकॅनिकल इंजिनियर शेअर बाजारातील लढाई कशी जिंकतो, हे उत्सुकतेचे आहे. या घटनाक्रमात भरपूर नाट्य भरलेले आहे. अर्थकारण, राजकारण, वित्तसंस्था, बाजार नियंत्रक, पतमापन करणाऱ्या संस्था अशा कितीतरी संस्थांच्या भूमिकांचा उल्लेख ओघाने येणे क्रमप्राप्तच आहे. एकुणात कोणत्याही परिस्थितीत एल अँड टी मोठ्या उद्योग समुहाच्या ताब्यात जाऊ नये हाच महत्प्रयास. कदाचित जर एल अँड टी गळाला लावण्याचे प्रयत्न त्यावेळी सफल झाले असते, आज ती एक तर आजारी कंपनी बनलेली दिसली असती. परंतु, नियतीचा मनात काही वेगळेच होते. म्हणूनच आज ही कंपनी कर्मचारी, सामान्य भागधारकांच्या ताब्यात असलेली कंपनी म्हणून अस्तित्व टिकवून आहे. किंबहुना पूर्वानुभव पाहता, भविष्यात ही कंपनी कोणीही ताब्यात घेऊ शकणार नाही, अशी नाईक यांनी चोख व्यवस्था करून ठेवली आहे.

नाईक यांनी केलेले सर्व प्रयत्न, अनुभवलेले प्रसंग तसे सर्वांना अवगत आहेत. तरी ते स्तंभानिमित्त थोडक्यात मांडले जायला हवेत. शिकागो येथे कंपनीच्या कामासाठी नाईक गेले होते. १७ नोव्हेंबर २००१ तो दिवस होता. त्यांना फोन आला, निरोप इतकाच – ”अपना मालिक बदल गया.”
नंतर लगेचच अनिल अंबानींचा फोन आला – ”आमच्याकडील शेअर्स आम्ही कुमार मंगलम बिर्ला यांना विकले.” पाठोपाठ कुमार मंगलम बिर्ला यांचा फोन. ते नाईक यांना म्हणाले, “तुम्ही आमच्याकडे यावे अशी आमची इच्छा होती. पण शेवटी आम्हीच तुमच्याकडे आलो.”

लार्सन अँड टुब्रो ही कंपनी अंबानींकडे आली होती. एप्रिल १९८९ला धीरूभाई अंबानी अल्पावधीसाठी लार्सनचे अध्यक्ष बनले होते. राजकारण आणि अर्थकारण या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. राजकारणातले अर्थकारण किंवा अर्थकारणातले राजकारण हा एक मोठा स्वतंत्र विषय आहे. असो.
रिलायन्सच्या लार्सनवरील या आक्रमणकाळात नाईकांनी आपले सर्व कौशल्य पणाला लावून उत्कृष्टपणे भूमिका निभावली. रिलायन्सला लार्सनमधून बाहेर पडावे लागले. लार्सनचा सीमेंट कारखाना हे बिर्ला यांचे मुख्य आकर्षण होते. लार्सनचा एक तुकडा तोडून बिर्लांना दिला गेला. बिर्ला यांच्या अल्ट्राटेक सीमेंटच्या घडणीची ही पूर्वपीठिका आहे. अशा वेळेस अनिल नाईक यांनी एकाच वेळी अनेक आघाड्या यशस्वीपणे सांभाळल्या. शेअर बाजार व्यवस्थितपणे समजावून घेतला. प्रख्यात चार्टर्ड अकाउंटंट एस. गुरुमूर्ती, आर. व्ही. पंडित यांची मदत घेतली. तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, अर्थमंत्री जसवंत सिंग, सेबी, क्रिसिल सर्वांना बरोबर घेऊन सीमेंट व्यवसाय विभाग लार्सन अँड टुब्रोमधून वेगळा करण्यात आला. ग्रासिम, समृद्धी स्वास्तिक ट्रेडिंग यांच्याकडे असलेले एल अँड टीचे शेअर्स हे एल अँड टी एम्प्लॉइज वेल्फेअर फाउंडेशनकडे घेण्यात आले. या सर्व प्रक्रियेत नाईक यांचा व्यक्तिशः स्वार्थ काहीही नव्हता. बाजारातले सर्व बारकावे एक इंजिनिअर पूर्णपणे आत्मसात करू शकतो आणि पुरत्या मुरलेल्या भले-बहाद्दरांचे मनसुबे उद्ध्वस्त करण्याचे कर्तब दाखवू शकतो हे नाईकांनी दाखवून दिले.

हेही वाचा – उदयमान ‘एसएमई बँकिंग’मधील अग्रणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अलीकडे घडलेल्या काही घटनांमुळे नाईक यांचे कर्तृत्व आणखी उजळून दिसते. लार्सन ही कंपनी आणखी मोठी झाली. लार्सन टायर कंपन्यांना लागणारी मशिनरी बनवत होती, पेपर कंपन्यांना लागणारी मशिनरी बनवत होती, त्याचप्रमाणे सीमेंट कंपन्यांना लागणारी मशिनरीसुद्धा बनवत होती. तर मग कागद कारखाना, टायर निर्माती कंपनी, याऐवजी सीमेंट उत्पादनच तिने का सुरू केले, असा प्रश्न पडेल. जॉर्ज फर्नांडिस हे केंद्रातील जनता सरकारमध्ये उद्योगमंत्री असताना त्यांच्या लक्षात आले की, सीमेंटचे उत्पादन वाढावे यासाठी मक्तेदारी उद्योग समूह नियंत्रण कायदा अडथळा ठरत आहे. जर लार्सन सीमेंटचे उत्पादन सुरू करणार असेल तर त्यांना या कायद्याचा अडथळा येणार नाही हा निर्णय जॉर्ज फर्नाडिस यांनी घेतला. लार्सनकडून सीमेंटचा काळा बाजार होणार नाही याची पंतप्रधान आणि उद्योगमंत्र्यांना खात्री होती. म्हणून लार्सन सिंमेट उद्योगात आली. परंतु, त्या व्यवसायामुळेच हे पुढचे रामायण घडले.

(लेखक नाशिकस्थित अर्थ-अभ्यासक व गुंतवणूक सल्लागार)