सुप्रीम इंडस्ट्रीज लिमिटेड (बीएसई कोड ५०९९३०)

प्रवर्तक: तपारिया समूह
बाजारभाव: रु. ४,३७९ /-
प्रमुख उत्पादन/ व्यवसाय : पॉलिमर, प्लॅस्टिक, रेझीन्स
भरणा झालेले भाग भांडवल: रु. २५.४१ कोटी
शेअर होल्डिंग पॅटर्न (%)
प्रवर्तक ४८.८५

परदेशी गुंतवणूकदार २३.८५
बँकस्/ म्युच्युअल फंड्स/ सरकार १२.५४

इतर/ जनता १४.७६
पुस्तकी मूल्य: रु. ३६३

दर्शनी मूल्य: रु. २/-
गतवर्षीचा लाभांश: १३००%

प्रति समभाग उत्पन्न: रु. ८०.९४
किंमत उत्पन्न गुणोत्तर: ५४

डेट इक्विटी गुणोत्तर: ०.०१
समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: ३६.३

इंट्रेस्ट कवरेज गुणोत्तर: १६०
रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड : २६.८

बीटा: ०.५
बाजार भांडवल: रु. ५५,६३१ कोटी (लार्ज कॅप)

वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: ४,८८८ / २,०५०

वर्ष १९४२ मध्ये स्थापन झालेली सुप्रीम इंडस्ट्रीज लिमिटेड ही भारतातील एक प्रमुख आघाडीची पॉलिमर प्रोसेसिंग आणि प्लास्टिक उत्पादक कंपनी आहे. कंपनीच्या देशभरात २८ उत्पादन सुविधा-प्रकल्प असून प्लास्टिक उत्पादनांची विस्तृत आणि व्यापक श्रेणी उपलब्ध आहे. कंपनीची वार्षिक ५ लाख मेट्रिक टन पॉलिमरची उत्पादन क्षमता आहे. सुप्रीम पेट्रोकेम ही कंपनीची सहयोगी कंपनी असून त्यात सुप्रीम इंडस्ट्रीजचा ३०.७८ टक्के हिस्सा आहे, तर सुप्रीम इंडस्ट्रीज ओव्हरसीज ही उपकंपनी संयुक्त अरब अमिरातीमध्ये आहे.

सुप्रीम विविध उत्पादन श्रेणींमध्ये कार्य करते उदाहरणार्थ, प्लास्टिक पाइपिंग सिस्टीम, क्रॉस लॅमिनेटेड फिल्म्स, संरक्षक पॅकेजिंग उत्पादने, मोल्डेड फर्निचर, स्टोरेज आणि मटेरियल हॅंडलिंग उत्पादने, परफॉर्मन्स पॅकेजिंग फिल्म्सइ. कंपनीची १५००० हून अधिक विविध उत्पादने आहेत. सुप्रीम इंडस्ट्रीजचे प्रमुख उत्पादन विभाग महसूलनिहाय पुढीलप्रमाणे:

प्लास्टिक पाइपिंग (६६ टक्के महसूल)

पाइप्स आणि फिटिंग्जच्या विस्तृत श्रेणीसह प्लास्टिक पाइपिंग उत्पादनांची सुप्रीम भारतातील सर्वात मोठी उत्पादक आहे. कंपनीच्या उत्पादनांमध्ये अनुप्रयोगांची विस्तृत श्रेणी आहे. जसे प्लम्बिंग, बाथ फिटिंग्ज, अग्निसुरक्षा, ड्रेनेज, कचरा प्रक्रिया आणि स्वच्छता, शेती, बोअरवेल, रेन वॉटर हार्वेस्टिंग, पाण्याच्या टाक्या आणि इतर. कंपनीचा संघटित बाजार आणि एकूण पाइपिंग मार्केटमध्ये अनुक्रमे १५ टक्के आणि ११ टक्के बाजार हिस्सा आहे.

पॅकेजिंग उत्पादने (१६ टक्के महसूल)

या विभागांतर्गत, कंपनी विशेष फिल्म्स, संरक्षणात्मक पॅकेजिंग उत्पादने आणि क्रॉस लॅमिनेटेड फिल्म उत्पादनांचा समावेश होतो.

औद्योगिक उत्पादने विभाग (१३ टक्के महसूल)

या विभागामध्ये उपकरणे, ऑटोमोटिव्ह भाग आणि इतर अनुप्रयोगांसाठी औद्योगिक घटक समाविष्ट आहेत. यामध्ये क्रेट, पॅलेट्स, डस्टबिन, सिलपॅक इत्यादी सामग्री हाताळणी उत्पादनांचादेखील समावेश आहे. कंपनीच्या प्रमुख ग्राहकांमध्ये टाटा, पॅनासोनिक, फियाट, ओरिएंट इलेक्ट्रिक, डायकिन, सिम्फनी इ. समावेश आहे.

ग्राहक उत्पादने विभाग (५ टक्के महसूल)

यांत प्रामुख्याने सीटिंग, टेबल, सेट, स्टोरेज, बहुउद्देशीय, स्टूल, बेड इ. फर्निचर उत्पादनांचा समावेश होतो.

तब्बल ५५ हून अधिक देशांत आपली उत्पादने निर्यात करणाऱ्या सुप्रीम इंडस्ट्रीज देशभरात चार हजारहून अधिक वितरक आहेत. तर कंपनीकडे प्लास्टिक पाइपिंग व्यवसायासाठी भारतभर ४१,००० हून अधिक किरकोळ विक्रेत्यांचे जाळे आहे. गेल्या आर्थिक वर्षांत ९,२०२ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ८६४ कोटी रुपयांचा नफा कमावणाऱ्या सुप्रीम इंडस्ट्रीजचे सप्टेंबर २०२३ साठीच्या तिमाहीचे निकाल उत्साहवर्धक आहेत. या दुसऱ्या तिमाहीत कंपनीने गत वर्षीच्या तुलनेत ११ टक्के वाढीसह २,३०९ कोटी रुपयांच्या उलाढालीवर २४३ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या आर्थिक वर्षातील तिंमाहीच्या तुलनेत तो तब्बल १९७ टक्क्यांनी अधिक आहे. वाढते शहरीकरण, बदलत्या जीवनशैलीनुसार विविध उत्पादनांचा वाढता पोर्टफोलियो यामुळे कंपनीने विस्तारीकरणाचा कार्यक्रम राबवला आहे. अत्यल्प कर्ज असलेल्या सुप्रीम इंडस्ट्रीजकडून आगामी कालावधीत उत्तम कामगिरीची अपेक्षा आहे. एक दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून सुप्रीम इंडस्ट्रीजचा जरूर विचार करा.

stocksandwealth@gmail.com

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भागभांडवलाच्या १% पेक्षा कमी आहे. तसेच सुचवलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.

  • लेखात सुचवलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.