AI Competition In Microsoft And Meta: गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेतील टेक कंपन्यांमध्ये एआय टॅलेंटला आपल्या कंपन्यांमध्ये सहभागी करून घेण्यासाठी जोरदार स्पर्धा सुरू आहे. दरम्यान, ही स्पर्धा लवकरच संपण्याची चिन्हे नाहीत, असे चित्र समोर आले आहे. कारण एका ऑनलाइन अहवालात असे सांगण्यात आले आहे की, दिग्गज टेक कंपनी मायक्रोसॉफ्ट मेटाच्या एआय टॅलेंटला आपल्या कंपनीमध्ये सहभागी करून घेण्यासाठी त्यांना आकर्षक ऑफर्स देण्याची योजना आखत आहे.

बिझनेस इनसाइडरने दिलेल्या वृत्तानुसार, मायक्रोसॉफ्टने मेटाच्या मोस्ट-वॉन्टेड एआय इंजिनिअर्स आणि संशोधकांची यादी तयार केली आहे आणि आता त्यांना ऑफर देण्याची प्रक्रिया सुरू करत आहे.

बिझनेस इनसाइडरने पाहिलेल्या अंतर्गत कागदपत्रांनुसार, मेटा त्यांच्या इंजिनिअर्सना देत असलेल्या पगाराइतक्याच ऑफर्स मायक्रोसॉफ्ट त्यांना देण्याचा विचार करत आहे, जेणेकरून त्यांना आकर्षित करता येईल. मायक्रोसॉफ्टने तयार केलेली ही मोस्ट-वॉन्टेड इंजिनिअर्सची यादी कंपनीच्या सुधारित भरती धोरणाचा एक भाग आहे. कंपनीचा एआय क्षमता मजबूत करणे हा यामागचा उद्देश आहे.

या अहवालात असेही दिसून आले आहे की, मायक्रोसॉफ्ट मेटाच्या एलएलएएमए मॉडेल्स, रिअॅलिटी लॅब्ज आणि जनेरेटीव्ह एआय इन्फ्रास्ट्रक्चरवर काम केलेल्या इंजिनिअर्सना प्राधान्य देऊ शकते.

२०२५ मध्ये मेटाने अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. मार्क झुकरबर्ग यांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनीने “निराशाजनक कामगिरी करणाऱ्या” सुमारे ३,६०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. अशात आता मायक्रोसॉफ्ट मेटाच्या सर्वात महत्त्वाकांक्षी एआय प्रकल्पांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लक्ष्य करत आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत असल्याने मेटाची चिंता वाढली आहे.

मायक्रोसॉफ्ट विरुद्ध मेटा: एआय वर्चस्वासाठीची स्पर्धा

मायक्रोसॉफ्ट आणि मेटा यांच्यातील ही स्पर्धा काही नवीन नाही. पण, दोन्ही दिग्गज कंपन्या एआयच्या भविष्यावर वर्चस्व गाजवण्यासाठी सज्ज होत असल्याने ही स्पर्धा आणखी तीव्र झाली आहे. मायक्रोसॉफ्टने ओपनएआयसोबत भागीदारी केली आहे आणि त्यांचा चॅटबॉट चॅटजीपीटी कंपनीच्या उत्पादनांशी एकत्रिकरण केले आहे. दुसरीकडे, मेटाला त्यांच्या एलएलएएम मॉडेल्स आणि एआय स्मार्ट ग्लासेसकडून मोठ्या आशा आहेत. मायक्रोसॉफ्ट आता मेटाच्या टॅलेंट पूलला लक्ष्य करत असल्याने, स्पर्धा आता उत्पादनांच्या पलीकडे गेली आहे.