विजय आणि त्याच्या बाबांचं सकाळी सकाळी भांडण झालं. आता भांडण कोणत्या बाप-मुलाचं होत नाही असं आपण म्हणू शकतो. पण आजचा विषय खास होता. विजयचे बाबा अतिशय हुशार होते. नोकरी करता करता स्वतःचा पोर्टफोलिओ त्यांनी छान तयार केला होता. अनेक वर्षे थोडे थोडे पैसे घालून चांगल्या कंपन्यांचे शेअर गोळा केले होते. कधी कधी नुकसानपण झालं. पण त्यातूनही आपली चूक कुठे झाली हे समजून पुढील गुंतवणूक केली. त्यामुळे रिटायर होईस्तोवर २५-३० कंपन्यांचा छान मजबूत पोर्टफोलिओ तयार झाला होता. पण पुढे एक प्रॉब्लेम तयार!

रिटायर झाल्यावर त्यांनी ट्रेडिंग करायला सुरुवात केली. आणि मूळ स्वभाव शेअर विकत घेऊन ठेवून देण्याचा असल्यामुळे ट्रेडिंग नीट करता येत नव्हतं. घेतलेले शेअर का विकायचे, कधी विकायचे हे गणित न जमल्यामुळे पोर्टफोलिओमध्ये शंभरच्या वर कंपन्या जमा झाल्या होत्या. जोवर मार्केट चांगलं चालत होतं तोवर ठीक होतं, फायदा दिसत होता आणि बाबा खूश होते. पण मार्केटने मोर्चा खालच्या दिशेने वळवला त्याबरोबर फायदा गायब आणि अनेक शेअर नुकसानीत दिसू लागले. आधी काही दिवस काही वाटलं नाही. पण २-३ आठवड्यांनी बाबा जरा बेचैन झाले. मग ते विजयच्या मागे लागले की ‘तूच काय ते बघ.’ पण विजय जेव्हा जेव्हा त्यांना सांगायचा की, ठरावीक काही शेअर विका, तर बाबा ते करायला तयार नसायचे. कारण तोटा होतोय हे त्यांना पटत नव्हतं.

विजयने दोन-तीन वेळा सांगूनसुद्धा जेव्हा ते ऐकले नाही तेव्हा तो रागावून त्यांना म्हणाला – ‘कशाला एवढा पसारा गोळा केला आहे, नीट आवरायचा नसेल तर माझा वेळ का वाया घालवताय?’

हे ऐकून बाबा चिडले आणि म्हणाले – ‘कधी नव्हे ते तुझी मदत मागितली तर हे ऐकायला मिळालं. काही उपयोग आहे का तुझा मला?’ अशी बाचाबाची सुरू झाली आणि मग त्याचं रूपांतर मोठ्या भांडणात झालं!

विजय आणि त्याच्या बाबांचं भांडण जरा बाजूला ठेवून, मुळात पोर्टफोलिओ व्यवस्थापनाच्या पद्धतीवर लक्ष देऊया. बाबांची आधीची पद्धत निष्क्रिय व्यवस्थापन असल्यामुळे एकदा घेतलं की, विकायचं नाही हे धोरण. जेव्हा ठरावीक चांगल्या कंपन्यांचे शेअर चढत्या मार्केटमध्ये घेतले जातात तेव्हा ही पद्धत फायद्याची ठरते. इथे एक अजून गोष्ट महत्त्वाची असते. मुळात पोर्टफोलिओमधून मोठे पैसे काढले जात नाहीत. म्हणून वर्षानुवर्षे जमा केलेली गुंतवणूक छान वाढते आणि चांगले परतावे देते. मार्केट वर-खाली होत राहतं, पण गुतंवणूक सुरूच असते. म्युच्युअल फंडातील ‘एसआयपी’सुद्धा याच पद्धतीत काम करतात.

निष्क्रिय व्यवस्थापन म्हणजे दीर्घ पल्ल्याचा हळूहळू सुरू ठेवलेला प्रवास. एकदा का जोखीम क्षमता तपासली आणि गुतंवणूक धोरण तयार केलं की मग त्यात सतत ढवळाढवळ करायची नसते. जसजसे एखाद्या उद्दिष्टाचे पैसे जमा होतात तसतसे ते काढायचे आणि पुढील गुंतवणूक चालू ठेवायची. प्रत्येक वर्षी करमुक्त नफा काढत राहायचा म्हणजे पुढे कर नियम बदलले तरी वाईट वाटत नाही. बाजारातील मोठ्या पडझडीनुसार पोर्टफोलिओमध्ये बदल करायचे आणि परत पुढचा प्रवास सुरू करायचा. या पद्धतीने हाताळलेल्या पोर्टफोलिओचे खर्च कमी असतात. परंतु योग्य वेळी बदल न केल्यास तोट्यात असलेली गुंतवणूक अनेक वर्षे तशीच राहते. शिवाय अशा पोर्टफोलिओमध्ये सेक्टर किंवा विशिष्ट प्रकारच्या गुंतवणुकीमध्ये पैसे ठेवता येत नाहीत. कारण त्यांचं गुंतवणूकचक्र दीर्घ काळासाठी उपयोगी नसतं. म्हणून असे पोर्टफोलिओ बांधताना नीट विचार करून गुंतवणूक पर्याय ठरवावे लागतात. हे पोर्टफोलिओ माफक जोखीम घेऊन रास्त परतावे देऊ शकतात आणि ते अशांसाठी उपयोगी आहेत ज्यांच्याकडे सतत लक्ष द्यायला, घ्या-विका करायला वेळ आणि ज्ञान दोन्ही कमी आहे.

सक्रिय व्यवस्थापन करताना मुळात वेळ आणि कौशल्य दोन्ही हवं. कोणता शेअर, कुठलं सेक्टर, कधी घ्यावं, पैसे किती गुंतवावे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कधी विकावं या सर्वांचा विचार प्रत्येक वेळी करावा लागतो. मुळात पोर्टफोलिओची ही पद्धत बाजारात कमी काळात पैसे कमावण्यासाठी उपयुक्त, असा सर्वसाधारण समज आहे. परंतु अशा प्रकारे गुंतवणूक व्यवस्थापन करायलादेखील खूप मेहनत, अभ्यास, शिस्त लागते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एखादी गुंतवणूक हवी तशी वागत नसेल तर त्यातून लगेच बाहेर पडता आलं पाहिजे. ‘स्टॉप लॉस’चा पुरेपूर वापर करून मुळात तोटा कमी करता आला पाहिजे आणि अति हावरटपणा न करता आपल्या ठरवलेल्या ध्येयानुसार विकतासुद्धा आलं पाहिजे. हे करताना बाजाराकडे पूर्णवेळ लक्ष ठेवावं लागतं. सतत घे-वीक केल्यामुळे दलालीचा आणि कर दोन्ही खर्च लागू होतात. असे पोर्टफोलिओ बनवताना जोखीम व्यवस्थापन चोख ठेवायला हवं. आपण काय घेणार/विकणार हे स्वतःच ठरवून त्यानुसार पैसे गुंतवावे लागतात. दुसऱ्याच्या सांगण्यावरून किंवा कधीतरी काहीतरी टीप ऐकून बनवलेले पोर्टफोलिओ मनाजोगे परतावे देत नाहीत. तेव्हा असे पोर्टफोलिओ बनवताना आपल्याकडे वेळ, पैसे, कौशल्य किती आहे आणि हे सर्व करून आपलं ध्येय साध्य झालं तर ठीक. नाहीतर एक तर गुंतवणुकीत तोटा किंवा डोक्याला ताप होऊ शकतो.

वरील दोन्ही पद्धती उपयुक्त आहेत. गुंतवणूकदाराचं ध्येय, त्याची जोखीम क्षमता, गुंतवणूक कालावधी आणि आयुष्यातील व बाजाराची परिस्थिती – या सर्व गोष्टींचा विचार करून आपल्याला साजेलशी पद्धत स्वीकारलेली जास्त फायद्याची ठरू शकते. जिथे वेळ, कौशल्य आणि शिस्त असेल तिथे सक्रिय पद्धत उपयुक्त आहे. जिथे वेळ आणि कौशल्य दोन्ही कमी असेल तिथे निष्क्रिय पद्धत चालू शकेल. कधी कधी या दोन्ही पद्धतींचा वापर एकाच गुंतवणूकदारालासुद्धा करता येऊ शकतो. मूळ मोठा पोर्टफोलिओ निष्क्रिय ठेवून, स्वतःचा वेगळा सक्रिय पोर्टफोलिओसुद्धा सांभाळता येऊ शकतो. परंतु एकाच गुंतवणूकदाराला हे दोन रोल एकाच वेळी करण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने स्वतःला तयार करावं लागतं. एखादा पर्याय निष्क्रिय गुंतवणुकीसाठी एखाद्या वेळी उपयोगी असेल, पण त्याच वेळी सक्रिय गुंतवणुकीसाठी योग्य नसेल. तेव्हा अशा प्रकारचे पोर्टफोलिओ सांभाळायला एका वेगळ्या पातळीवर काम करावं लागतं. दोन्ही प्रकारच्या गुंतवणुकीचे परतावे वेगवेगळे असू शकतात. पडत्या बाजारात सक्रिय पद्धत ही निष्क्रिय पद्धतीपेक्षा चांगले परतावे देऊ शकते. आणि वाढत्या बाजारात निष्क्रिय पद्धत जास्त उपयोगी पडू शकते.

आपण परत एकदा विजय आणि त्याच्या बाबांकडे वळूया. बाबांची खरी मानसिकता दीर्घकालीन असून पद्धत निष्क्रिय आहे. तेव्हा त्यांनी ट्रेडिंग करू नये. आणि जर ट्रेडिंग करायची असेल तर योग्य सल्ला घेऊन त्यानुसार घेणं आणि विकणं दोन्ही करावं. घेऊन नुसतं ठेवल्याने नुकसान होऊ शकतं. सल्लागार कोण आहे आणि त्यांनी दिलेला सल्ला कितपत योग्य आहे हे चाचपडून मग त्याचं ऐकायचं की नाही हे ठरवावं. अशा पोर्टफोलिओसंदर्भातील निर्णय फटाफट घेता आले पाहिजेत. ‘स्टॉप लॉस’ लागला की विकायचंच. नुकसानाची मर्यादा ठरवून मग यात शिरायचं. त्यांचा जुना पोर्टफोलिओ मात्र निष्क्रिय पद्धतीने चालवावा. परंतु तिथेसुद्धा वेळोवेळी जोखीम वाढतेय का यावर लक्ष ठेवावं. मार्केटमध्ये होणाऱ्या मोठ्या बदलानुसार पोर्टफोलिओमध्ये बदल करावे. आणि सध्या झालेल्या पोर्टफोलिओतील खिचडीतून बाहेर पडून दोन वेगळ्या पद्धती वापरून व्यवस्थापन सुरू ठेवावं. या वेळी मुलाचं ऐकल्याने बाबांना फायदा होऊ शकेल! – तृप्ती राणे

trupti_vrane@yahoo.com

(प्रकटन : हा लेख फक्त मार्गदर्शनपर आहे. इथे लेखिका कोणतीही जाहिरात करत नाही.)