एका रविवारी सकाळी-सकाळी माझ्या बहिणीचा मला फोन आला. मुळात तिने फोन करणं आणि तेसुद्धा रविवारी सकाळी हे मला अजिबात अपेक्षित नसल्याने मी लगबगीने फोन घेतला. माझ्या मनात की, काहीतरी नक्कीच महत्त्वाचं असल्याशिवाय ती अशी सकाळी फोन करणार नाही. फोन घेतला तशी पहिली माझी चौकशी केली की, मी बरी आहे ना, घरी ठीक आहे ना, इत्यादी. मला जरा विचित्र वाटलं, कारण, आज माझी एवढी विचारपूस का करतेय. शेवटी न राहवून मीच तिला विचारलं, अगं मुद्द्याचं बोल. तशी ती थोडी चिडक्या आवाजात म्हणाली, ताई २-३ महिन्यांपासून मी बघतेय की, तू माझे पैसे गुंतवत नाहीयेस.
सगळे मुदत ठेवीत गोळा झाले आहेत. मला वाटलं तुझ्याकडे वेळ नाहीये की काय आणि म्हणून तुझं लक्ष माझ्या पोर्टफोलिओवर आणि नियमित गुंतवणुकीवर नाहीये. तसं असेल तर सांग, मी दुसरा पर्याय शोधते. पण असे पैसे ठेवू नकोस माझ्या खात्यात. एकीकडे मला सांगतेस की, मासिक गुंतवणूक झालीच पाहिजे. तर मग हे असे पैसे पडून राहिले तर कसं बरं होईल? एक तर तुला माहिती आहे की, मला पैसे खात्यात दिसले की, माझ्याकडून ते खर्च होतात आणि मग तूच मला ओरडतेस आणि जाब विचारतेस. तिचं बोलणं मध्येच थांबवून मी तिला म्हटलं – तुला नक्की कशाचा त्रास होतोय? पैसे गुंतवले नाही याचा की खात्यात जमा आहेत पण खर्चपण करता येत याचा.
नियमित गुंतवणुकीचा ध्यास जरी असला तरीसुद्धा पैसे नेहमीच बाजारात गुंतवायचे असतात असा नियम थोडेच आहे. गुंतवणुकीमध्ये नियमितता हवी, पण त्याचा अर्थ असा नाही की, खात्यात पडून राहायला नको म्हणून पैसे गुंतवायचे. गुंतवणुकीची शिस्त तर हवीच, पण त्याबरोबरच ती कशामध्ये, किती आणि कधी करायची याबाबतसुद्धा काही नियम असतात. कोणत्या पावसात भिजायचं, कधी छत्री घेऊन बाहेर पडायचं आणि कोणत्या वादळात घरी बसायचं हे प्रत्येक वेळी बघावं लागतंच ना. हे सर्व एकाच वेळी तिला समजणं मला अपेक्षित नव्हतं, परंतु या वेळेपुरतं तरी मी तिला शांत केलं. आता हे झालं माझ्या बहिणीचं, परंतु एक गुंतवणूकदार म्हणून मीसुद्धा याच दडपणातून गेलेले आहे. सतत पैसे कुठे ना कुठे घालत राहायचं एक व्यसन लागतं. पण हे करणं योग्य आहे का आणि याचे काय फायदे-तोटे आहेत हे आजच्या लेखातून समजून घेऊया.
गुंतवणुकीच्या जगात, सातत्याने यशस्वी गुंतवणूकदार होणाऱ्या कमी लोकांमध्ये आणि अनेक पटापट श्रीमंत होण्याची स्वप्न बाळगून फक्त ‘रिस्क है तो इश्क है’सारख्या गुंतवणूकदारांमध्ये एक मोठा फरक असतो आणि तो आहे गुंतवणूक शिस्त. हे उत्कृष्ट ‘स्टॉक-पिकिंग’ किंवा बाजारातील प्रत्येक वळण आणि वळणाचे अचूक वेळेवर नियोजन करण्याबद्दल नाही. उलट, ते दैनंदिन बाजारातील गडबड आणि अस्थिरतेकडे दुर्लक्ष करून तर्कसंगत, दीर्घकालीन आर्थिक संपन्नतेसाठी योग्य पर्यायात आणि योग्य जोखीम घेऊन प्रत्येक पैशाच्या गुंतवणुकीबाबत आहे. ही शिस्त मंदीच्यावेळी ‘पॅनिक’ विक्री किंवा अतार्किक तेजीच्या वेळी चांगल्या शेअरचा पाठलाग करणे यासारख्या भावनिक उलथापालथीपासून लांब राहायला मदत करते. इथे आपण दोन गोष्टींचा थोडा जास्त विचार करूया. पहिली शिस्त आणि दुसरी नियमितता.
गुंतवणुकीची शिस्त म्हणजे नक्की काय? तर या प्रश्नाचे खालील पैलू आहेत.
१) भावनांवर नियंत्रण – गुंतवणूक यशाचा प्राथमिक शत्रू बहुतेकदा गुंतवणूकदार स्वतः असतो. आपलं मन हे चांगल्या गुंतवणूक तत्त्वांविरुद्ध काम करणाऱ्या पूर्वग्रहांनी भरलेले असते.
२) भीती: मंदीच्या बाजारादरम्यान, तोटा कमी करण्याची आणि पोर्टफोलिओमधील समभाग विकण्याची प्रवृत्ती जबरदस्त असू शकते. ही प्रेरणा अनेकदा गुंतवणूकदारांना जास्त खरेदी करा आणि कमी विक्री करा, यशस्वी गुंतवणुकीचा उलटा मार्ग दाखवते.
३) लोभ आणि उत्साह: तेजीच्या बाजारात, लोभामुळे अतिआत्मविश्वास, बेपर्वा जोखीम घेणे आणि पुरेशा संशोधनाशिवाय सट्टेबाजीच्या ‘फॅड्स’चा पाठलाग करणे होऊ शकते.
४) कळपाची मानसिकता : इतर गुंतवणूकदारांचे अनुसरण करणे किंवा बहुतेकदा किमती वाढलेल्या असताना खरेदी करणे आणि इतर सर्वजण घाबरलेले असताना विक्री करणे, हे अतिशय सर्रास घडताना आपण बघतो.
५) तोटा टाळणे: तोट्याचे दुःख तेवढ्याच किमतीच्या नफ्याच्या आनंदापेक्षा खूपच तीव्र वाटते, ज्यामुळे परतफेडीच्या आशेने जास्त काळ नुकसानीत असलेली गुंतवणूक ठेवणं यासारखे चुकीचे निर्णय घेतले जातात.
शिस्त या प्राथमिक प्रवृत्तींना मागे टाकण्यासाठी आवश्यक चौकट प्रदान करते. बाजारातील गुंतवणूक हा जुगार नसून ही प्रक्रिया अतिशय पद्धतशीर, सुसंगत आणि दीर्घकालीन सवय लागण्यासाठी मदत करते. तर शिस्तबद्ध गुंतवणूक धोरणाचे आधारस्तंभ कशाला बरं म्हणता येईल? एक शिस्तबद्ध दृष्टिकोन अनेक प्रमुख तत्त्वांवर आधारित असतो, ज्यांचे सातत्याने पालन केल्यास कालांतराने संपत्ती निर्माण होते.
१. स्पष्ट, लिखित ध्येये ठरवा – शिस्तीचा पाया उद्देश आहे. तुमची आर्थिक उद्दिष्टे स्पष्टपणे ठरवा, सुरक्षित निवृत्ती, मुलांचं शिक्षण निधी किंवा घरासाठी ‘डाउन पेमेंट’. तुम्हाला किती गरज आहे, तुमचा कालावधी आणि तुमची जोखीम क्षमता यांचे प्रमाण निश्चित करा. एक लेखी योजना तुमचा ‘रोडमॅप’ म्हणून काम करते, जेव्हा विचलित होतात तेव्हा तुम्हाला मार्गावर राहण्यास मदत करते.
२. सुसंगत गुंतवणूक योजना तयार करा – तुमच्या योजनेने ‘ॲसेट ॲलोकेशन’ची रूपरेषा तयार करावी. शेअर, रोखे, स्थावर मालमत्ता आणि रोखे यांचे मिश्रण जे तुमच्या उद्दिष्टांशी आणि जोखीम क्षमतेशी जुळते. ही योजना प्रत्येकाची वेगळी असून ती भावनानुसार न बनवता संशोधन आणि तर्काने बनवलेली असावी. पुढे या योजनेनुसार कृती होत आहे का आणि अपेक्षित परिणाम मिळत आहेत का, हेसुद्धा तपासायला हवं. गरजेनुसार त्यात बदलसुद्धा करावे.
३. आपली कामं जितकी शिस्तबद्ध करता येतील तितकी बरी – शिस्त लागू करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे गुंतवणूक प्रक्रिया स्वयंचलित करणे. याचा अर्थ म्हणजे आपले गुंतवणुकीचे पैसे हे गुंतवणुकीसाठीच वापरायला पाहिजेत. आजचं उद्या करू असं न करता त्या पैशांची सोय पहिली करून आणि त्यानुसार आपल्या खर्चाच्या खात्यामधून बाजूला करून ठरल्याप्रमाणे गुंतवणूक पर्यायात घालावे. इथे एक लक्षात असू द्या की, लक्ष गुंतवणुकीच्या मासिक योगदानावर आहे आणि ते कशामध्ये गुंतवले पाहिजेत यावरसुद्धा.
४. विविधता आणि पोर्टफोलिओमध्ये संतुलन – वेगवेगळ्या मालमत्ता वर्ग, भौगोलिक विविधीकरण आणल्याने जोखीम कमी होण्यास मदत होते. वेळोवेळी (उदा., वार्षिक किंवा अर्धवार्षिक), तुमच्या पोर्टफोलिओचे पुनरावलोकन करा आणि ते तुमच्या ‘ॲसेट ॲलोकेशन’बरोबर सुसंगत राहते याची खात्री करा. यामध्ये वाढलेल्या काही मालमत्ता विकणे आणि कमी कामगिरी करणाऱ्यांपैकी अधिक खरेदी करणे समाविष्ट आहे. एक शिस्तबद्ध दृष्टिकोन जो तुम्हाला तुमच्या मूळ धोरणाच्या आधारावर विजेत्यांना कमी करण्यास आणि पराभूतांना जोडण्यास भाग पाडतो, भावनांवर नाही.
५. दीर्घकालीन दृष्टिकोनावर लक्ष केंद्रित करा – गुंतवणूक ही एक मॅरेथॉन आहे, धावणे नाही. बाजार नफा, तोटा आणि अस्थिरतेचे अपरिहार्य चक्र अनुभवतो. एक शिस्तबद्ध गुंतवणूकदार समजतो की, अल्पकालीन चढउतार कोणते आहेत, कधी काहीच करायचं नसतं तर कधी हावरटपणा करायचा नसतो. मोठा पैसा खरेदी आणि विक्रीमध्ये नाही तर वाट पाहण्यात आहे. पण नक्की कसली वाट पाहतोय? बाजार वर जायची की खाली जायची हे माहीत असायला हवं.
नियमित गुंतवणूक म्हणजे एकाच पर्यायात गुंतवणूक करणं असं अजिबात नाहीये. आपल्या आर्थिक ध्येयानुसार, बाजारातील परिस्थितीनुसार योग्य पर्याय निवडणं आणि कधी कधी कुठेच न गुंतवता योग्य संधीची वाट बघणंसुद्धा आहे. परतावे तेव्हाच मिळतात जेव्हा किंमत योग्य असते आणि गुंतवणूक काळ त्यानुसार असतो. दीर्घकाळासाठी म्हणून डोळे झाकून केलेली गुंतवणूक म्हणजे ‘लॉटरी’ म्हणावी लागेल. लागली तर ठीक, नाहीतर गेले पैसे. येत्या येत्या काळामध्ये अनेक गुंतवणूकदारांच्या हे लक्षात येईल की, शेअर बाजार फक्त वर जातो असे नाही. शिस्त आणि नियमितता राखणे आव्हानात्मक आहे, परंतु अनेक धोरणे मदत करू शकतात.
तुमच्या नियमित गुंतवणूक वेळापत्रकानुसार राहणे अधिक प्रभावी आहे. खळबळजनक आर्थिक वृत्त आणि समाजमाध्यमांवरील भाष्य मर्यादित करा, जे अनेकदा भावनिक प्रतिक्रिया वाढवतात. विश्वसनीय आणि पडताळलेल्या माहितीवर अवलंबून राहा. स्वतः अभ्यास करा. तुमच्या पोर्टफोलिओमध्ये कोणतेही महत्त्वपूर्ण बदल करण्यापूर्वी, तुमची कारणे लिहा. हे तुम्हाला निर्णय ठोस मूलभूत गोष्टींवर आधारित आहे की, क्षणभंगुर भावनांवर आधारित आहे याचे नीट विश्लेषण करा. चुकांमधून शिका. तोट्यांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी, वर्तनात्मक नमुने किंवा ज्ञानातील अंतर ओळखण्यासाठी त्यांचे वस्तुनिष्ठपणे विश्लेषण करा. व्यावसायिक मार्गदर्शन मिळवा. एक आर्थिक सल्लागार एक त्रयस्थ दृष्टिकोन प्रदान करू शकतो आणि विशेषतः अशांत काळात तुमच्या दीर्घकालीन योजनेनुसार वागायला जबाबदार राहण्यास मदत करू शकतो.
गुंतवणूक शिस्तीचे दीर्घकालीन फायदे लक्षणीय आहेत. चांगला वेळ, योग्य गुंतवणूक पर्याय आणि ‘ॲसेट ॲलोकेशन’ची त्रिसूत्री एकत्र झाली की, तुमचे गुंतवलेले पैसे कालांतराने चांगली संपत्ती निर्मिती करू शकतात. परंतु हे परिणाम दिसायला वेळ आणि सातत्य आवश्यक आहे. इतिहासाने दाखवून दिले आहे की, जे गुंतवणूकदार विविध पोर्टफोलिओसह बाजारचक्रात गुंतवणूक करत राहतात, त्यांना सकारात्मक परतावा मिळण्याची सर्वाधिक शक्यता असते. भावनिक निर्णयांचे नुकसान कमी करून आणि ‘पॅनिक सेलिंग’सारख्या महागड्या चुका टाळून, शिस्तबद्ध गुंतवणूकदार बहुतेकदा बाजारातील चढ-उतारांना सतत प्रतिसाद देणाऱ्यांपेक्षा जास्त कामगिरी करतात. तेव्हा डोळे झाकून नियमित गुंतवणूक न करता शिस्तबद्ध आणि डोळसपणे योग्य जोखमीची गुंतवणूक करावी. गरज असेल तिथेच आणि तेवढीच जोखीम घ्या आणि नुकसानीपासून स्वतःच्या पोर्टफोलिओला वाचावा.
