आशिया खंडातील अन्य अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारताची अर्थव्यवस्था उजवी आहे याचा आणखी एक दाखला रिझर्व बँकेच्या आलेल्या एका अहवालाने दिला आहे. परदेशी व्यापार आणि गुंतवणूक यामुळे अर्थव्यवस्थेला नवी उभारी मिळतेच, त्या तुलनेत देशांतर्गत व्यवसाय व्यापार आणि उद्योग यांचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर अधिक मोठा परिणाम दिसून येतो हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

भारतामध्ये कृषी क्षेत्र अत्यंत प्रभावशाली आहे. देशातील मोठी क्रयशक्ती याच क्षेत्रातून येते. जून महिन्यापासून सुरू झालेला शेतीचा कालावधी सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत संपतो. याला खरिपाची पिके असे म्हणतात. ग्रामीण अर्थव्यवस्था या कृषी क्षेत्राच्या पैशांवर अवलंबून आहे. याच सुमारास ऑगस्ट सप्टेंबर महिन्यापासून अगदी थेट डिसेंबर महिना अखेरीपर्यंत भारताच्या विविध भागात सुरूच राहणारे सण-उत्सव यामुळे खरेदीला जोरदार प्रेरणा मिळते. अर्थातच याचा परिणाम बाजारावर जाणवतो.

यावर्षीच्या सणासुदीच्या काळात गाड्या, टेलिव्हिजन संच, मोबाईल फोन, वस्त्र प्रावरणे, मद्य, सौंदर्यप्रसाधने, सोन्या चांदीचे दागिने या वस्तूंना चांगलीच मागणी निर्माण झाली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या सणासुदीच्या काळात ही मागणी वाढल्यामुळे विक्रीचे आकडे वरच्या दिशेला जाणार हे निश्चितच.

हेही वाचा : NPS द्वारे तुम्हाला निवृत्तीनंतर १ लाख मासिक पेन्शन मिळणार अन् करोडपती बनण्याची संधी, गणित समजून घ्या

मागच्या एका लेखात म्हटल्याप्रमाणे ऑनलाइन माध्यमातून होणाऱ्या सणासुदीच्या विक्रीमध्ये होऊ घातलेली वाट पाहता वाढ व्यापारी वर्गाने आधीच साठा करून ठेवायला सुरुवात केली आहे. यावर्षीच्या ऑनलाईन व्यवसायामध्ये ३० टक्के इतकी घसघशीत वाढ होणे अपेक्षित आहे.

सप्टेंबरचा कन्झ्युमर कॉन्फीडंन्स सर्व्हे अनुकूल

रिझर्व बँक ऑफ इंडिया आपल्या कन्झ्युमर कॉन्फीडंन्स सर्व्हे मधून याबद्दलची आकडेवारी जाहीर करत असते. कन्झ्युमर कॉन्फीडंन्स याचा थोडक्यात अर्थ भारतातील बाजारातील ग्राहकांचा उत्साह कसा आहे ? लोकांची खरेदी क्षमता कशी आहे ? महागाई दराच्या तुलनेत लोकांचे उत्पन्न आणि खर्च यामध्ये कसा बदल झाला आहे ? हे यामध्ये दिसून येते.

भारतातील मध्यम वर्गाचा विचार करता साधारणपणे दोन गटांमध्ये याची विभागणी झालेली दिसते. ज्यांच्याकडे वरकड उत्पन्न आहे असा मध्यमवर्गीय आणि ज्याच्याकडे बेतास बेत असे उत्पन्न आहे असा मध्यमवर्गीय. या दोघांच्या खरेदी क्षमतेवर महागाईचा वेगवेगळा परिणाम होतो. यामुळेच भारतात वैयक्तिक कर्ज (Personal Loan) घेणाऱ्याचे प्रमाण वाढत चालले आहे. याचा बँकांना आणि एनबीएफसी कंपन्यांना फायदा तर होतोच. त्याच बरोबर अधिकाधिक गृहपयोगी उपकरणे मासिक हप्त्यांवर खरेदी केल्यामुळे व्यवसायाला सुद्धा चालना मिळते.

हेही वाचा : Money Mantra : एयू स्मॉल फायनान्स बँकेतर्फे अनोखी गुंतवणूक योजना; गुंतवणूकदारांबरोबरच पर्यावरणासाठी ठरणार फायदेशीर

चीनच्या अर्थव्यवस्थेमध्ये मागणी वाढल्यामुळे भारतातील मेटल कंपन्या तेजीत

भारतातून कोळसा, बॉक्साइट, ॲल्युमिनियम, लोहपोलाद अशा धातूंचे विविध उत्पादन प्रकार चीनला निर्यात करण्यात येतात. गेल्या वर्षभरापासून चीनच्या अर्थव्यवस्थेमध्ये मंदी दिसून येत आहे व ही दूर करण्यासाठी तेथील सरकारने एक ट्रिलियन युवान इतकी महाकाय रक्कम खर्च करायचे ठरवले आहे. अर्थव्यवस्थेत नवी ऊर्जा फुंकण्यासाठीच मोठाले प्रकल्प हातात घेतले जातील असे या निमित्ताने म्हटले जात आहे. याचा थेट परिणाम भारतातील धातू व धातू निर्मित उत्पादने बनवणाऱ्या कंपन्यांवर होणार आहे.

भारतीय शेअर बाजारातील हिंडाल्को, जिंदाल स्टील, नॅशनल ॲल्युमिनियम, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, टाटा स्टील, नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट, जेएसडब्ल्यू स्टील, वेदांता या कंपन्या चीनमधील अर्थव्यवस्थेच्या वाढीच्या लाभार्थी ठरतील अशी अपेक्षा आहे. या अपेक्षेमुळे गेल्या काही दिवसापासून बीएससी मेटल इंडेक्स तेजीत दिसतो आहे. वर उल्लेख केलेल्या कंपन्यांचे शेअर्स दोन ते तीन टक्के एवढ्या दराने वाढताना दिसत आहेत.

हेही वाचा : Money Mantra: Post Retirement Income: रिटायरमेंटनंतरचं उत्पन्न करपात्र की करमुक्त?

गेल्या आठवड्यात एक आशादायक आकडेवारी समोर आली ती म्हणजे २० आणि २३ ऑक्टोबर या दिवशी परदेशी गुंतवणूकदारांनी एकूण अडीच हजार कोटी रुपये एवढ्या किमतीची खरेदी नोंदवली. तर देशांतर्गत गुंतवणूकदारांनी नेहमीप्रमाणेच पडत्या मार्केटचा लाभ घेऊन २५ ऑक्टोबर रोजी साडेतीन हजार कोटी रुपयांची खरेदी नोंदवली. या आठवड्याच्या मध्यावर बाजारात निरुत्साह कायम आहे. निफ्टी १९००० ही पातळी गाठेल अशी अपेक्षा असली तरीही जागतिक अस्थिरता हा मुद्दा अजूनही बाजारांसाठी प्रतिकूलच दिसतो आहे.