वसंत कुलकर्णी

‘ओल्ड वाइन इन न्यू बॉटल’ असा शब्द प्रयोग इंग्रजीत वापरला जातो. अस्तित्वात असलेली एखादी जुनी वस्तू नवीन आवरणात विकली जाणे, अशा अर्थाने हा शब्द प्रयोग केला जातो. नव्याने अस्तित्वात आलेल्या ‘फॅक्टर फंड’ या फंड प्रकारासाठी हाच शब्दप्रयोग वापरणे योग्य ठरेल. स्मार्ट बीटा फंड, क्वांट फंड, लो व्होलॅटीलीटी फंड हे सर्व प्रकारात गुंतवणुकीसाठी निवड कुठल्यातरी विदा अर्थात ‘डेटा’च्या आधारे केली जाते.

वेगवेगळ्या कंपन्यांच्या उपलब्ध आकडेवारीनुसार ‘व्हॅल्यु’, ‘मुमेंटम’, ‘क्वालिटी’ आणि ‘लो व्होलॅटीलीटी’ या व अन्य घटकांचा वापर करून एक प्रणाली (अल्गोरिदम) विकसित केली जाते. या घटकांचा वापर करून निवडलेल्या कंपन्यांतून निवड करण्याची निधी व्यवस्थापकाला काही मुभा देऊन जो पोर्टफोलिओ तयार होतो त्याला ‘फॅक्टर फंड’ असे संबोधले जाते. फ्रँकलीन टेम्पलटन फंड घराण्याने फ्रँकलिन इंडिया मल्टी-फॅक्टर फंडाचा ‘एनएफओ’ १० ते २४ नोव्हेंबरदरम्यान खुला आहे.

‘फॅक्टर फंड’ (मल्टी किंवा सिंगल) ही गुंतवणूक सक्रिय आणि निष्क्रिय दोन्ही रणनीतींचा वापर करून तयार झालेली गुंतवणूक पद्धती आहे. या रणनीतीत गुंतवणुकीसाठी वर उल्लेख केलेल्या विशिष्ट घटकांना पूर्वनिश्चित गुण देऊन निर्देशांकांपेक्षा चांगली कामगिरी करण्यासाठी कंपन्यांची निवड केली जाते. फ्रँकलिन इंडिया मल्टी-फॅक्टर फंडाचा मानदंड ‘बीएसई २०० टीइआर’ असल्याने फंडाच्या गुंतवणुकीचा परीघ या निर्देशांकात समाविष्ट असलेल्या कंपन्यांच्या पुरता मर्यादित असेल.

वर उल्लेख केलेल्या घटकांचा वापर करून ‘बीएसई २०० टीईआर’ निर्देशांकांत समावेश असलेल्या कंपन्यांना चाळणी लावून काही कंपन्या निवडल्या जातील या कंपन्यांतून ३० ते ४० कंपन्यांची निवड केलेल्या निर्देशांकांचा निष्क्रियपणे मागोवा घेतात. भारतीय म्युच्युअल फंडांमध्ये गुणवत्ता, ‘व्हॅल्यु’, ‘मुमेंटम’, ‘क्वालिटी’ आणि ‘लो व्होलॅटीलीटी’ ‘अल्फा’, समान प्रभाव (इक्वल वेट) यांसारख्या प्रमुख गुंतवणूक घटकांना प्रमाण मानून गुंतवणूक करणारे ‘फॅक्टर फंड’ आहेत.

‘मुमेंटम’ आधारित फंड अल्पावधीत चांगली कामगिरी अपेक्षित असणाऱ्या कंपनीचे समभाग भविष्यात कामगिरी अशीच सुरू राहील, या अपेक्षेने खरेदी करतात. या कंपन्या सहा महिन्यांच्या आणि बारा महिन्यांच्या ‘मुमेंटम’ (किंमत परताव्यावरून) मोजलेल्या गतीवर आधारित निवडले जातात.

गुणवत्ता घटक कंपन्या त्यांच्या ‘आरओसी’ आणि आरओई’ (भांडवल आणि समभाग) परतावा, एकूण भांडवलात स्वनिधी आणि कर्जाऊ रक्कम यांच्या गुणोत्तर आणि ‘ईपीएस’ वाढीच्या सुसंगततेवर अवलंबून असते. निधी व्यवस्थापक स्थैर्य आणि वाढ याला प्राधान्य देतात.

‘मल्टी फॅक्टर फंड’ गुंतवणुकीच्या मर्यादा

मल्टी फॅक्टर फंड गुंतवणुकीत जोखीम अधिक असते. सर्वात लक्षणीय कमतरता म्हणजे बाजार आवर्तने. प्रत्येक घटक दीर्घकाळ नकारात्मक कामगिरीचा अनुभव घेतो. उदाहरणार्थ, वर्ष २०१७ ते २०२१ पर्यंत ‘व्हॅल्यू’ गुंतवणुकीला सुगीचे दिवस नव्हते. तर २०२२ मध्ये निधी व्यवस्थापक फक्त ‘व्हॅल्यू’ गुंतवणुकीचा मागोवा घेत होते. तर वर्ष २०२१ मध्ये ‘मुमेंटम’ला पसंती मिळाली, परंतु पुढच्या वर्षी ‘मुमेंटम’ कंपन्या थंड पडल्या.

वर्ष २०२२ मध्ये ‘अल्फा’ला कोणी पसंत केले नाही. परंतु वर्ष २०२४ मध्ये पुन्हा अल्फा रणनीतीचे पुनरागमन झाले. ही आवर्तने गुंतवणूकदारांच्या शिस्तीचा कस तपासतात. टेम्पलटनच्या सादरीकरणानुसार ते भविष्यवेधी’ विदेचा (‘फॉरवर्ड लुकिंग डेटाचा) अवलंब करीत असले तरी, संगणक प्रणालीमध्ये प्रत्येक घटकाचे वजन-कमी अधिक करणार नाहीत. ज्यामुळे पोर्टफोलिओ अस्थिरता अधिक असणारे उद्योग क्षेत्र किंवा गुंतवणूक शैली पूर्वग्रहदूषित असण्याची शक्यता नाकारू शकत नाही.

बहु-घटक (मल्टी फॅक्टर) गुंतवणुकीचे फायदे

बहु-घटक गुंतवणूक एकाच पोर्टफोलिओमध्ये अनेक घटक एकत्र करून या सर्व मर्यादांना न्याय दिल्याचे टेम्पलटनच्या सादरीकरणात सांगितले आहे. त्यामुळे ही संगणक प्रणाली, अधिक वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ तयार करते. हा दृष्टिकोन विविध घटकांमधील कमी सहसंबंधाचा फायदा घेत विविधीकरण फायदे प्रदान करतो.

सध्या, म्युच्युअल फंड घराण्यांनी एकल घटक किंवा द्वि-घटक धोरणांवर आधारित फंड उपलब्ध करून दिले आहेत. गेल्या वर्षभरात पाच फंड घराण्यांनी ‘मल्टी फॅक्टर’फंड उपलब्ध करून दिले (सुंदरम, बडोदा बीएनपी, बंधन सक्रिय व्यवस्थापित) तर मिरे आणि आयसीआयसीआय निष्क्रिय व्यवस्थापित फंड उपलब्ध आहेत.

तथापि, मल्टी-फॅक्टर गुंतवणुकीत अनेक त्रुटी (ट्रॅकिंग एरर) आहेत. त्यात जटिल घटक संयोजनांचा समावेश आहे आणि गुंतवणूक निर्णय मोठ्या प्रमाणात मागील विदेवरून चाचणी केलेल्या प्रारुपांवर अवलंबून असतात, जे भविष्यात टिकू शकतीलच याची खात्री देता येत नाही. हे सर्व फंड नव्याने आलेले असून आणि त्यांची ऐतिहासिक कामगिरी उपलब्ध नाही. ज्यामुळे वेगवेगळ्या बाजार आवर्तांमध्ये त्यांच्या सुसंगततेचे मूल्यांकन करणे आव्हानात्मक बनते. गुंतवणूक निर्णय घेण्यापूर्वी हे फंड विविध बाजार परिस्थितीत कसे कामगिरी करतात, हे गुंतवणूकदारांनी थोडे पाहण्याची आवश्यकता आहे.

व्यक्ती तितक्या प्रकृती हे तर सत्यच आहे. एखाद्या हॉटेलमध्ये वीस- तीस वर्ष जेवणारे आहेत. तर कोणी रोज नव्या हॉटेलात जेवणे पसंत करतात. गुंतवणुकीतील यश हे शिस्तबद्ध गुंतवणुकीचे फलित आहे. रोज नव्या हॉटेलात जेवायचे की मोजक्या हॉटेलात आलटून पालटून जायचे हा ज्याचा त्याचा निर्णय असला, तरी गुंतवणुकीतील सातत्य आणि शिस्त यश मिळवून देते. या फंडात गुंतवणूक टाळायची की करून पाहू कसा परतावा मिळतो ते यापैकी कशाची निवड करायची हे वाचकांनी ठरवायचे आहे.