म्युच्युअल फंड घराण्यांकडून त्यांच्या व्यवसाय विस्तारासाठी कायमच वेगवेगळ्या रणनीती आखल्या जातात. त्यातील एक म्हणजे नवीन फंड योजना (एनएफओ) बाजारात आणणे होय. प्रत्येक फंड घराण्याचा अंतिम उद्देश गुंतवणूकदारांकडून पैसे जमा करून ते यशस्वीरीत्या गुंतवून गुंतवणूकदारांना उत्तम परतावा देणे हाच असतो. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या पसंतीस उतरतील अशा नवनवीन फंड योजना बाजारात आणण्याकडे फंड घराण्यांचा कल असतो. नवीन फंड योजना बाजारात आली तर त्यात आपण पैसे गुंतवायचे का नाही? हा निर्णय घेताना पुढील मुद्द्यांचा विचार केला गेला पाहिजे.
फंड योजनेचे उद्दिष्ट समजून घ्या. एखादी नवीन फंड योजना समजा ‘डायव्हर्सिफाइड इक्विटी’ या प्रकारातील असेल तर नवीन फंड योजनेच्या माहिती पत्रकामध्ये गुंतवणूकविषयक रणनीती लिहिलेली असते ती सावधगिरीने वाचा. तुमचे फंडातील पैसे ठेवण्याचे उद्दिष्ट पैसे सुरक्षित ठेवणे आणि एक-दोन वर्षांत गरज भासल्यास ते वापरणे, हे असेल तर वरील फंड तुमच्यासाठी अधिक जोखमीचा आहे. यामुळे नवीन फंड आला म्हणून आपण पैसे गुंतवले पाहिजे असे करू नका.
दहा रुपयांत युनिट मिळतात म्हणजे आपला त्यात फायदा आहे, हा गैरसमज टाळा. बऱ्याच वेळा नवीन काय, अगदी अनेक वर्षे गुंतवणूक केलेले गुंतवणूकदारसुद्धा या समजाला भुलतात. नवीन फंड योजनेत युनिट दहा रुपयाला मिळत असले तरी भविष्यात तो फंड जसा चांगला परतावा देईल तसे एनएव्हीचे मूल्य वाढत जाते. त्यात स्वस्त आणि महाग हा मुद्दा नसतो. एक उदाहरण घेऊ या. एका गुंतवणूकदाराने दहा वर्षे जुन्या फंड योजनेत दहा हजार रुपये गुंतवले व त्याची एनएव्ही समजा २०० रुपये असेल तर त्याला १०००० / २०० = ५० एवढे युनिट मिळतील. त्याच वेळी दुसऱ्या गुंतवणूकदाराने एनएफओमध्ये दहा हजार रुपये गुंतवले तर त्याला १०००० / १० = १००० एवढे युनिट मिळतील. पण एक वर्षात दोन्ही फंड योजनांनी १० टक्के परतावा दिला तर पहिल्याची एनएव्ही २२० रुपये होईल आणि नवीन फंड योजनेची एनएव्ही ११ रुपये होईल. त्याने परताव्यावर काहीच परिणाम होत नाही.
पोर्टफोलिओत असलेले फंड पुन्हा विकत घेताय का?
नवीन फंड योजना बाजारात आली आणि ती आकर्षक वाटली म्हणून त्यात थोडे पैसे गुंतवले जातात, असे बऱ्याचदा दिसून येते. दोन महिन्यांनंतर दुसऱ्या फंड घराण्याकडून एक योजना बाजारात आली तर त्यातही गुंतवणूकदार पैसे गुंतवतात. असे होता होता पाच-दहा वर्षांनंतर एका गुंतवणूकदाराच्या नावावर मिडकॅप प्रकारचे सात-आठ फंड, लार्ज कॅप प्रकारचे पाच-सहा फंड अशी मोठी यादीच तयार होते. एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की, पोर्टफोलिओ जितक्या कमी फंड योजनांचा असेल तेवढाच तो सांभाळण्यासाठी सुलभ असतो. त्यामुळे नवीन फंड योजना आली की गुंतवणूक करण्याचा मोह टाळा.
तुमची गुंतवणूक ध्येय नवीन फंड योजनेशी जुळतात का?
प्रत्येक गुंतवणूकदार वय, जोखीम, वेळ आणि उपलब्ध पैसे यांच्या अनुसार आपली गुंतवणूकविषयक रणनीती आखत असतो. ज्यांचे वय कमी असेल आणि जोखीम घेण्याची क्षमता जास्त असेल त्यांनी बाजारात एनएफओ आला आहे आणि तो हायब्रिड डेट फंडाचा आहे तर त्यात पैसे गुंतवणे योग्य नाही. तुमच्या पोर्टफोलिओतील किती टक्के भाग इक्विटी आणि किती टक्के भाग डेट (रोखे) हवा हे ठरवले की अनावश्यक फंडांची गर्दी टाळता येते.
बाजार जेव्हा दीर्घकालीन तेजीच्या टप्प्यात असतात, त्या वेळी जवळपास सगळेच फंड चालतात. मात्र फंड घराण्याच्या निधी व्यवस्थापकांची खरी कसोटी लागते ती अस्थिरतेच्या काळात. त्यामुळेच फंडाची पाच ते दहा वर्षांतील कामगिरी लक्षात घेऊन त्यात गुंतवणूक केली तर आपल्याकडे निदान निधी व्यवस्थापनाचा जुना अनुभव तरी असतो. याउलट नवीन फंड योजनेत पैसे गुंतवताना भविष्यात हा फंड कसा चालेल हे आपल्याला जोखता येणार नाही.