कौस्तुभ जोशी

नॉन बँकिंग फायनान्स कंपनी असलेल्या पिरामल एंटरप्रायजेस या कंपनीने गुंतवणूकदारांसाठी एक आकर्षक योजना बाजारात आणली आहे. पिरामल इंटरप्रायजेसतर्फे बाजारात आणली गेलेली ही पहिलीच योजना ठरणार आहे. १९ ऑक्टोबर पासून या योजनेमधील गुंतवणूक खुली झाली आहे. गुंतवणूकदारांना गुंतवणुकीचे विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

काय आहे ही योजना ?

पिरामल इंटरप्राईजने नॉन कॉन्व्हर्टेबल डिबेंचर अर्थात ‘एनसीडी’ बाजारात आणले आहेत. सोप्या भाषेत कर्जरोखे. या कर्जरोख्यांवर किती व्याजदर देणार हे कंपनीने आधीच जाहीर केलेले असते. त्यामुळे ज्यांना शेअर बाजारातील चढउताराची जोखीम कमी करायची असेल अशा गुंतवणूकदारांसाठी हा पर्याय महत्त्वाचा असतो. व्याजाचे दर तुम्ही केलेल्या गुंतवणुकीच्या पर्यायानुसार थोडेफार बदलतात. या एनसीडी इश्यूद्वारे कंपनी १००० कोटी रुपये बाजारातून उचलणार आहे. गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला तर आणखी आठशे कोटी रुपये बाजारातून उचलण्याचे कंपनीचे नियोजन आहे.

हेही वाचा >>>Money Mantra : सोन्याचा भाव कसा ठरवला जातो? त्याचा इतिहास जाणून घ्या

इश्यू किती तारखेपर्यंत उपलब्ध आहे ?

२ नोव्हेंबर २०२३ पर्यंत गुंतवणूकदारांसाठी ही योजना सुरू आहे. अर्थातच जेवढे पैसे कंपनीला उभारायचे आहेत तेवढे उभारून झाले की कंपनी आपला पब्लिक इश्यू बंद करू शकते किंवा गरज पडल्यास तारीख वाढू सुद्धा शकते.

हेतू कोणता ?

पिरामल एंटरप्राइजला आपल्या उद्योगाच्या व्यवसायासाठी निधीची आवश्यकता आहे. या एनसीडी इश्यू मार्फत उभारलेल्या पैशातील ७५ टक्के निधी कर्जपुरवठा मुख्य व्यवसाय आणि सध्याच्या घेतलेल्या कर्जाचे परतफेडीचे नियोजन यासाठी वापरला जाणार आहे आणि उरलेला २५ टक्के निधी कंपनीच्या नियमित कामासाठी वापरला जाईल.

गुंतवणूकीचा कालावधी किती ?

या एनसीडीमध्ये गुंतवणुकीसाठी एकूण चार पर्याय देण्यात आले आहेत. दोन वर्षे, तीन वर्षे, पाच वर्षे किंवा दहा वर्षे असे पर्याय उपलब्ध आहेत. आपल्याला अल्पकालीन का दीर्घकालीन गुंतवणूक करायची आहे हा निर्णय व्याजदर पाहून घेऊ शकतील

व्याजदर किती ?

डिमॅट अकाउंट आवश्यक

कंपनीतर्फे बाजारात आणले गेलेले एनसीडी डिमॅट अकाउंटद्वारे खरेदी करावे लागतील. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज वर एनसीडी लिस्टेड असतील.

हेही वाचा >>>Money Mantra : बँक खाते ऑनलाइन पद्धतीनं न जोडताही ५ लाखांपर्यंत रुपये पाठवता येणार, जाणून घ्या IMPSचा नवा नियम

कमीत कमी गुंतवणूक किती ?

  • एका गुंतवणूकदाराला एका फॉर्मद्वारे कमीत कमी दहा हजार रुपयाची गुंतवणूक करावी लागेल. एक एनसीडी एक हजार रुपये ‘फेस व्हॅल्यू’चा असतो व एका वेळी कमीत कमी दहा एनसीडी साठी अर्ज करावा लागेल. एनसीडी मध्ये गुंतवणूक करताना हे कायम लक्षात ठेवा
  •  यामध्ये व्याजाचे दर ठरलेले असले तरीही कंपनीच्या आर्थिक स्थितीवर व्याज वेळेवर मिळणे आणि न मिळणे अवलंबून आहे.
  • कंपनीने व्याज देण्याची हमी दिलेली नाही, आश्वासन दिलेले आहे.
  • एनसीडी मध्ये बँकेतले फिक्स डिपॉझिट आणि शेअर्स यासारखे ताबडतोब विकण्याचे पर्याय उपलब्ध नसतात. एनसीडी स्टॉक एक्सचेंजवर लिस्टेड असतात मात्र तिथे त्याची विक्री व खरेदी होईल याची हमी कंपनी घेत नाही.
  • त्यामुळे मुदतीच्या अगोदरच आयत्यावेळी एनसीडी विकून झटकन पैसे मिळतील अशी शक्यता कठीण आहे. तुम्ही कोणत्या टॅक्स ब्रॅकेट मध्ये आहात / मर्यादेत आहात त्यानुसार एनसीडीवर मिळालेले व्याज करपात्र आहे हे लक्षात ठेवा.

सदर पर्यायात गुंतवणूक करताना गुंतवणूकदारांनी  जोखीमविषयक दस्तऐवज वाचून, समजून मगच  गुंतवणूक करावी