जानेवारी ते जुलै या काळात ‘बीएसई इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी’ निर्देशांक २५ टक्क्यांपेक्षा जास्त घसरला आहे. साहजिकच दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी ‘टेक्नॉलॉजी फंडा’त गुंतवणूक करण्यास ही एक चांगली संधी आहे. एकरकमी गुंतवणुकीऐवजी ‘एसआयपी’ पद्धतीने दीड ते दोन वर्षांसाठी गुंतवणूक करून किंवा ‘एसटीपी’द्वारे नियमित गुंतवणूक करणे शहाणपणाचे ठरेल. येत्या शुक्रवारी २२ ऑगस्ट रोजी ‘फ्रँकलिन इंडिया टेक्नॉलॉजी फंड’ २७ वर्षे पूर्ण करत आहे. भारतातील आणि अमेरिकेतील टेक कंपन्यांत गुंतवणूक करणारा हा फंड आहे. फंडाच्या गुंतवणुकीत अमेरिकेत सूचिबद्ध असलेल्या ‘ॲमेझॉन’, ‘मेटा’ (फेसबुक), ‘ॲपल’, ‘कॉग्निझंट’, ‘मायक्रोसॉफ्ट’, ‘अल्फाबेट’ (गूगल), आणि मेक माय ट्रिप आयएनसी (यूएसए) या कंपन्यांचा समावेश आहे. या फंडाच्या गुंतवणुकीतून अमेरिका आणि भारतातील तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणूक संधींचा लाभ घेता येतो.
टेक्नॉलॉजी क्षेत्रात, एक वर्ष पूर्ण केलेले ९ फंड तर पाच वर्षे पूर्ण झालेले ५ फंड अस्तित्वात आहेत. या पाचपैकी ‘फ्रँकलिन इंडिया टेक्नॉलॉजी फंड’ हा साहसी फंड आहे. तसेच हा फंड अन्य फंडांपेक्षा थोडा वेगळा आहे. जानकीरामन (जे या फंड घराण्याचे मुख्य गुंतवणूक अधिकारी आहेत) आणि वेंकटेश संजीवी हे या फंडाचे देशांतर्गत गुंतवणुकीसाठी निधी व्यवस्थापक आहेत तर संदीप मदन हे परदेशातील गुंतवणुकीचे निधी व्यवस्थापक आहेत. हा फंड पारंपरिक नावांना चिकटून न राहता आयटी निर्देशांकात नसलेल्या मिड आणि स्मॉलकॅप आयटी कंपन्या, फिनटेक कंपन्या, ई-कॉमर्स कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणारा फंड आहे. यामध्ये मीडिया (ओटीटी: ओव्हर द टॉप), डिजिटल पेमेंट्स, ई-कॉमर्स, टेलिमेडिसिन, टेलिकॉम (मोबाइल सेवा प्रदाते, पायाभूत सुविधा, हार्डवेअर उत्पादक, इ.), नव्याने उदयास आलेल्या (फूड, कॅब आणि वित्तीय सेवा) कंपन्यांचा समावेश आहे. अनेक फंडांनी गेल्या काही वर्षांत केवळ सॉफ्टवेअर सेवा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याऐवजी त्यांच्या गुंतवणुकीची व्याप्ती वाढविली आहे. यामुळे इतर आयटी फंड त्यांच्या लार्ज-कॅप कंपन्यांतील अधिक गुंतवणुकीमुळे कमी परतावा मिळवत असताना या फंडाने त्यांना मागे सारले आहे.
हा फंड इतर आयटी थिमॅटिक फंडांच्या तुलनेत सुसंगत कामगिरी करणारा आहे, जो वेगाने वाढतो आणि वेगाने घसरतो. अलीकडच्या परताव्यांतून असे दिसून येते की, फंड भविष्यातील ‘अच्छे दिन’ची तयारी करीत आहे. फंड यापूर्वी आयटी कंपन्यांच्या तेजीत चांगला यशस्वी झाला होता. गेल्या ५ वर्षांच्या कालावधीत तीन वर्षांच्या चलत सरासरीनुसार या फंडाची कामगिरी आदित्य बिर्ला डिजिटल इंडिया किंवा एसबीआय टेक्नॉलॉजी अपॉर्च्युनिटीजसारख्या फंडांना लीलया मागे टाकणार तर टाटा डिजिटल इंडियाशी बरोबरी साधणारा फंड आहे. गेल्या काही वर्षांत, विशेषतः करोना महासाथीनंतरच्या अलीकडच्या वर्षांत, तंत्रज्ञान आणि डिजिटल प्रणालींनी विश्वाला कवेत घेतले असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. फक्त आयटी सेवांव्यतिरिक्त, अनेक क्षेत्रे आता प्रामुख्याने तंत्रज्ञानावर आधारित आहेत. वेळोवेळी फंड सादरीकारणात प्रमुख बाबींवरून भारतीय आयटी, ई-कॉमर्स, मीडिया आणि व्यापक तंत्रज्ञान विभागांचा आवाका स्पष्ट होतो. भारतीय तंत्रज्ञान क्षेत्र ज्यामध्ये देशांतर्गत (४९ अब्ज डॉलर) आणि निर्यात (१७८ अब्ज डॉलर) विभाग आहेत ते आर्थिक वर्ष २०२२ मध्ये २२७ अब्ज डॉलर होते. आर्थिक वर्ष २०२५ पर्यंत हे क्षेत्र ३५० डॉलरपर्यंत वाढणार आहे. देशांतर्गत ई-कॉमर्स बाजारपेठ २०२५ पर्यंत १८८ अब्ज डॉलर आणि २०३० पर्यंत ३५० अब्ज डॉलर होण्याची अपेक्षा आहे. भारताचे ‘ओटीटी’ महसूल २०२२-२७ मध्ये दरवर्षी १४.३ टक्क्यांनी वाढून २०२७ पर्यंत ३.५ अब्ज डॉलरवर पोहोचेल. इंटरनेट जाहिराती २०२२-२७ च्या तुलनेत १२.३ टक्क्यांनी वाढून ७.९४ अब्ज डॉलरवर पोहोचतील. वर्ष २०२७ पर्यंत माध्यमे आणि मनोरंजन उद्योगाचे उत्पन्न वार्षिक ९.७ टक्क्यांनी वाढून ७३.६ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचेल.डिजिटल परिवर्तन, क्लाउड कॉम्प्युटिंग (म्हणजे इंटरनेटवरून सर्व्हर, स्टोरेज, डेटासेंटर, नेटवर्किंग, सॉफ्टवेअर, ॲनालिटिक्स आणि इंटेलिजन्स यांसारख्या संगणकीय सेवांचे वितरण (क्लाउड). हे वापरकर्त्यांना मागणीनुसार वापरण्याची परवानगी देते. सामान्यत: त्यांच्या स्वतःच्या भौतिक पायाभूत सुविधांची मालकी आणि देखभाल करण्याऐवजी ते जितका वापर तितके पैसे देतात. जागतिक स्तरावर एंटरप्राइझ खर्चाचा मोठा हिस्सा ‘एआय’, ‘डेटा सेंटर’ विदा विश्लेषण आणि ‘ऑटोमेशन’ यांच्याकडे आहे. भारतीय आयटी कंपन्या, त्यांची व्याप्ती आणि क्षमतांसह, या दीर्घकालीन तांत्रिक बदलांचा फायदा घेण्यासाठी सज्ज आहेत. तथापि, अल्पावधीत, कंत्राटदार (अमेरिकेतील कंपन्या) खर्चाबाबत जागरूक झाल्याने कंपन्यांच्या नफ्यातील वाढ मंदावण्याची शक्यता दिसत आहे.
जागतिक समष्टी (मॅक्रो) आर्थिक परिमाणांच्या अनिश्चिततेमुळे कंपन्यांच्या कमाईत फारशी वाढ झालेली नाही. एकूण खर्चाच्या बाजूची सावधता असल्याने, नफ्यातील दृश्यमानता कमी झाली आहे. म्हणूनच जानेवारीपासून टेक कंपन्यांच्या बाजारभावात मोठी घसरण झाली आहे. तंत्रज्ञान फंडांसाठी मध्यम ते दीर्घकालीन दृष्टिकोन सकारात्मक राहिला आहे. एकूणच, अलीकडच्या घसरणीपश्चात, मूल्यांकन अधिक पातळीवर आले आहे, ज्यामुळे अल्पकालीन परताव्यापलीकडे पाहणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी या क्षेत्रातील मूल्यांकन आकर्षक बनले आहे. टेक कंपन्यांचा नफा ६ ते ८ टक्के दराने वाढतो. सध्या टेक कंपन्यांचा वृद्धीदर २-३ टक्के इतका खालावला आहे. नजीकच्या काळात अमेरिकेने भारतावर २५ टक्के आयात कर लादण्याच्या धोरणाचा तोटा तंत्रज्ञान क्षेत्राला मोठ्या प्रमाणात होईल. तरी सध्याची घसरण दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी गुंतवणुकीची आकर्षक संधी देते. सध्याची जागतिक अनिश्चितता लक्षात घेता, एकरकमी गुंतवणुकीऐवजी २४ महिन्यांची ‘एसआयपी’ किंवा २४ महिन्यांच्या ‘एसटीपी’द्वारे टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणे शहाणपणाचे ठरेल. या फंडाला एकूण पोर्टफोलिओमध्ये ५-७ टक्क्यांपेक्षा अधिक स्थान देऊ नये. तसेच परताव्याच्या अपेक्षा १० टक्के दरम्यान असावी. टेक फंड हे ‘कोअर ॲण्ड सॅटेलाइट’ रणनीतीपैकी ‘सॅटेलाइट पोर्टफोलिओ’चा हिस्सा असावा. महत्त्वाचे म्हणजे, बहुतेक लार्जकॅप, मल्टीकॅप, फ्लेक्झीकॅप फंडांनी आधीच तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांत गुंतवणूक केली आहे. विशेषतः लार्जकॅप फंडांच्या माध्यमातून तुम्ही आधीच टेक कंपन्यांत गुंतवणूक केली असेल, तर टेक फंडांत वेगळी गुंतवणूक करण्याची गरज कदाचित भासणार नाही.
गेल्या तिमाहीत आयटी कंपन्यांच्या चांगल्या नफा क्षमतेनंतर, दलाली पेढ्यांना मागणीत किरकोळ घट आणि कमी कंत्राट मूल्यामुळे सर्व मोठ्या आयटी कंपन्यांच्या महसुलात सातत्याने घट होण्याची अपेक्षा आहे. म्युच्युअल फंड गुंतवणुकीत बाजार जोखीम संभवत असल्याने या फंडात गुंतविण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी आपली जोखीम तपासून घ्यावी आणि जोखीमांकास क्षेत्र गुंतवणूक साजेशी असल्यास गुंतवणूक करावी. कृपया लक्षात घ्या की, ‘फ्रँकलिन फंड’ हा या फंड गटात अधिक साहसी म्हणून अस्थिर फंड आहे. गेल्या ४-५ वर्षांत फंड घराणे म्हणून ‘फ्रँकलिन टेम्पलटन’ने रोखे योजनांचा अपवाद वगळता सर्व फंड गटात चांगली कामगिरी केली आहे. म्हणून पाचपैकी या फंडाची निवड केली.