सीएफडी म्हणजे कंपनी फिक्स्ड डिपॉझिट. ही एक प्रकारची मुदत ठेव असते जी बँकेऐवजी एखाद्या कंपनीकडे ठेवली जाते. थोडक्यात एखादी व्यवसायिक कंपनी तुमच्याकडून ठेव रक्कम ठराविक कालावधीसाठी बिनतारणी कर्ज म्हणून घेत असते. या कर्जावर म्हणजे ठेव रकमेवर या कालावधीसाठी ठराविक व्याजदराने व्याज देत असते व मुदती नंतर आपण गुंतवलेली ठेव रक्कम परत करीत असते.

कंपनी एफडीची ठळक वैशिष्ट्ये

बँकेच्या एफडीपेक्षा अधिक व्याजदर:
कंपन्या सामान्यतः बँकांपेक्षा जास्त व्याज देतात (साधारणपणे १ ते २% जास्त )

जोखीम किती?

बँक एफडीपेक्षा यामध्ये जोखीम जास्त असते कारण ही ठेवी बिनतारणी असतात व त्यांना बँक ठेवी प्रमाणे रु. ५ लाखापर्यंतचे डीआयसीजीसी कव्हर असत नाही. कंपनी जर दिवाळखोरीत गेली, तर तुमचे पैसे अडकू शकतात किंवा बुडू शकतात.

क्रेडिट रेटिंग

अशा पद्धतीने ठेवी गोळा करण्यासाठी संबंधित कंपनीला या ठेवीसाठीचे क्रेडिट रेटिंग करणे बंधनकारक असते. हे रेटिंग क्रिसीएल/केअर/इक्रा यासारख्या रेटिंग एजन्सीज मार्फत केले जाते. एएए/एए किंवा तत्सम रेटिंग असेलल्या ठेवी सुरक्षित मानल्या जातात.मात्र रेटिंग एजन्सी खात्री देत नसते हे लक्षात घेणे गरजेचे आहे.

कालावधी

साधारणपणे १ ते ५ वर्षे इतका असू शकतो. ३ वर्षे कालावधीच्या ठेवी प्रामुख्याने दिसून येतात.

करआकारणी

ठेवीवर मिळणारे व्याज पूर्णपणे करपात्र असते व ते इतर उत्पन्नात समाविष्ट केले जाते.

तरलता(लिक्विडीटी)

कंपनी ठेवीची तरलता बँक ठेवींच्या तुलनेने खूपच कमी असते.

गुंतवणूक कशी करता येते?

आपल्याला बँकेसारखी हवी तेव्हा गुंतवणूक करता येत नाही तर जेव्हा संबंधित कंपनीचा एफडी इश्यू बाजारात चालू असेल त्या कालावधीतच गुंतवणूक करता येते. इश्यू कालावधी संपल्यावर गुंतवणूक करता येत नाही.

गुंतवणूक करण्यापूर्वी काय दक्षता घ्यावी?
१)कंपनीचं क्रेडिट रेटिंग शक्यतो एएए/एए रेटिंग असणाऱ्या ठेवीतच गुंतवणूक करावी २)व्याजदर आणि अटी तपासून घ्याव्यात

प्रश्न१: कंपनी मुदत ठेव (सीएफडी)म्हणजे काय ?

बँका व्यतिरिक्त संस्था उदा: एनबीएफसी , गृह वित्त संस्था , वित्तीय संस्था तसेच सेवा तसेच उत्पादक कंपन्या भांडवल उभारण्यासाठी गुंतवणूकदारांकडून मुदतीच्या ठेवी स्वीकारतात अशा ठेवींना कोणतेही तारण नसते (विनातारणी) , या मुदत ठेवीं मासिक/ तिमाही/ सहामाही व्याज अथवा क्युमिलेटीव्ह पद्धतीच्या असतात.

प्रश्न२: अशा ठेवीत गुंतवणूक करावी का ?

अशा ठेवींवर बँकांपेक्षा जास्त व्याज दिले जात असल्याने ठेवी स्वीकारत असलेल्या कंपनीचे क्रेडिट रेटिंग पाहून ठेवीत गुंतवणूक करावी. साधारणपणे किमान ए रेटिंग असणाऱ्या कंपनीच्या ठेवीत गुंतवणूक करावी. एएए/एए असल्यास उत्तमच. जितके रेटिंग जास्त तितकी गुंतवणूक जास्त सुरक्षित असू शकते. त्यामुळे जास्त रेटिंग असणाऱ्या कंपन्या तुलनेने कमी व्याज देऊ करतात . थोडक्यात आपली जोखीम घेण्याची क्षमता विचारात घेऊनच गुंतवणूक करावी. केवळ जास्त व्याज मिळतेय म्हून गुंतवणूक करू नये.

प्रश्न ३: कंपनीचे रेटिंग (पतमानांकन) कसे समजते?

ठेवी स्वीकारणाऱ्या कंपनीस संबंधित ठेवीचा इश्यू बाजारात आणताना त्यासाठीचे रेटिंग करून घेणे बंधनकारक आहे व त्या रेटिगचा माहितीपत्रकात स्पष्टपणे उल्लेख असणे बंधनकारक आहे. असे रेटिंग प्रामुख्याने क्रिसील, केअर किंवा आयक्रा यापैकी एका रेटिंग एजन्सीने केलेले असते.

प्रश्न ४: कंपनी मुदत ठेवीतील (सीएफडी) रक्कम मुदतीपूर्वी गरज पडल्यास काढता येते का?

होय गरज पडल्यास ठेवीची रक्कम मुदत पूर्व काढता येते व असे करताना पेनल्टी द्यावी लागते व ही पेनल्टी मिळणाऱ्या व्याज दारात कपात किंवा काही ठरविक रक्कम कमी दिली जाते. याबाबतचा उल्लेख माहितीपत्रकात केलेला असतो. मात्र अशा ठेवींच्या तारणावर बँकेकडून अथवा अन्य वित्त संस्थेकडून कर्ज मिळत नाही.

प्रश्न ५:या ठेवींवर मिळणाऱ्या व्याजावर कर आकारणी कशी होते?

मिळणाऱ्या व्याजावर बँक ठेवीवर मिळणाऱ्या व्याजाप्रमाणेच कर आकारणी होत असते.