पोस्ट, बँक , इन्शुरन्स पॉलिसी , सोने यासारख्या गुंतवणुकीच्या पारंपरिक पर्यायापेक्षा शेअर्स तसेच म्युचुअल फंडात दीर्घकालीन गुंतवणूक केल्याने जास्त परतावा मिळत असल्याचे दिसून आल्याने सुशिक्षित मध्यमवर्गीय तसेच श्रीमंत गुंतवणूकदार शेअर्स तसेच म्युचुअल फंडात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत असल्याचे दिसून येत हे व यात सातत्याने वाढच होत आहे. विशेष म्हणजे करोना साथीच्या काळात भारतात मोठ्या प्रमाणावर डी-मॅट खाती उघडली गेली व डी-मॅट खाते उघडण्यात सुद्धा सातत्याने वाढ होत आहे.
शेअर बाजारात गुंतवणूक करताना काही लॉक डे ट्रेडिंग करतात मात्र बहुतांश गुंतवणूकदार यात दीर्घ कालीन उद्देशाने गुंतवणूक करीत असतात. शेअर्स मधील दीर्घ कालीन गुंतवणुकीतून १२ ते १३% इतका परतावा मिळत असल्याचे दिसून येते शिवाय यातील गुंतवणुकीला तरलता (लिक्विडीटी) असल्याने आर्थिक गरजेच्या वेळी आपण कधी घेतलेले शेअर्स बाजारभावाने विकू शकता . मात्र जर आपली तात्पुत्या स्वरूपाची गरज भागविण्यासाठी जर आपल्या कडे असलेल्या चांगल्या कंपन्याचे विकले तर पुन्हा घेणे जमेलच असे नाही आणि म्हणून शेअर्स न विकत ते तारण ठेऊन त्यावर कर्ज घेणे फायदेशीर ठरू शकते. त्यादृष्टीने आज पण शेअर्स तारण ठेऊन मिळणाऱ्या कर्जाबाबतची माहिती घेऊ.
शेअर्स तारण कर्जाची ठळक वैशिष्ट्ये
राष्ट्रीयकृत बँका,खाजगी बँका, मोठ्या सहकारी बँका , बिगर वित्तीय संस्था (एबबीएफसी) यांच्याकडून शेअर्स तारणावर सहजगत्या कर्ज मिळू शकते.
हे कर्ज ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने घेता येते. यासाठी संबंधित बँक अथवा वित्तीय संस्थेचा विहित नमुन्याचा फॉर्म योग्य रित्या भरून ऑनलाईन अथवा ऑफलाईन अशा आपल्याला सोयीच्या पद्धतीने सुपुर्द (सबमिट) करावा लागतो , सोबत आपल्याकडे असलेल्या शेअर्सचे डी-मॅट खात्याचे स्टेटमेंट जोडावे /अपलोड करावे लागते.तसेच केआयसी बाबतची पूर्तता करावी लागते.
आपल्या डी-मॅटखात्यावर असलेल्या शेअर्सच्या प्रचलित बाजारभावाच्या ५०% मात्र जास्तीतजास्त रु.२० लाख कर्ज मिळू शकते. मिळणारे कर्ज दोन स्वरुपात आपल्याला सोयीस्कर असणाऱ्या पद्धतीने घेता येते. पहिल्या पद्धती मध्ये कर्ज ओव्हरड्राफ्ट ( तात्पुर्ती उचल ) स्वरुपात घेता येते व मंजूर कर्ज मर्यादेपर्यंत आपण कधीही यातील रक्कम वापरू शकता तसेच यात रक्कम जमा करुन कर्ज रक्कम कमी करू शकता तसेच परत पाहिजे तेव्हा परत रक्कम काढू शकता मात्र खात्यावरील नावे बाकी मंजूर मर्यादेपर्यंतच ठेवावी लागते. यामुळे आपण जेवढी रक्कम जितके दिवस वापरत असाल त्यावरच व्याज आकारणी केली जाते . या कर्ज खात्याची मुदत एक वर्ष असून पुढे हवे असल्यास कर्ज खात्याचे नूतनीकरण करावे लागते. ही सुविधा तात्पुरत्या व्यवसायिक गरजा भागविण्यासाठी सोयीची ठरू शकते. याउलट दुसऱ्या पद्धतीत आपल्याला एक रकमी कर्जाचे वितरण केले जाते व त्याची परतफेड जास्तीत जास्त ३ वर्षात दरमहा हप्त्याने करावयाची असते. यात भरलेली रक्कम परत काढत येत नाही. याला डिमांड लोन असे म्हणतात. ही सुविधा वैयक्तिक गरज भागविण्याच्या दृष्टीने सोयीचे असते.
यावर आकारले जाणारे व्याज १०% ते १२% च्या दरम्यान असू शकते व ते बँकेनुसार कमी अधिक असू शकते. कर्ज रकमेचा विनियोग बाबत काही बंधनं असत नाही. मात्र आपण जर कर्ज रकमेतून आयपीओसाठी गुंतवणूक करणार असाल तर जास्तीतजास्त रु.१०लाख इतकीच करता येते.
आपल्या डी-मॅट खात्यात असणाऱ्या कोणत्या शेअर्स वर कर्ज मंजूर करावयाचे याचा अधिकार कर्ज देऊ करणाऱ्या बँकेस असतो व ज्या शेअर्सच्या तारणावर कर्ज मंजूर केले जाते त्या शेअर्स वर आपल्या डी-मॅट खात्यात कर्ज देणाऱ्या बँकेचे /वित्त संस्थेचे लीन (प्लेज ) नोंदविले जाते व जोपर्यंत आपण कर्ज रक्कम परतफेड करत नाही तोपर्यंत तेव्हढ्या शेअर्सवर प्लेज आपल्या खात्यावर ठेवलेले असते. आपल्या ज्या शेअर्स वर लोन मंजूर झाले आहे त्या शेअर्सवर डी-मॅट खात्यात प्लेज दिसून येते उर्वरित शेअर्सवर बेनिफ़िशियरी असे दिसून येते.
आपण तारण म्हणून दिलेल्या शेअर्सची बाजारभावानुसार ड्रॉईंग पॉवर (उचल मर्यादा ) काढली जाते व आपले खात्यावर असलेले कर्ज नेहमी या ड्रॉईंग पॉवरच्या आत असणे आवश्यक असते. उदा: आपण रु.३० लाख बाजार भाव असणाऱ्या शेअर्सवर रु.१५ लाख इतकी कर्ज ओव्हरड्राफ्ट स्वरूपाचे काही दिवसांपूर्वी घेतले आहे व आज आपल्या कर्जखात्यावरील नावे बाकी रु. १४.२० लाख इतकी आहे मात्र आपण तारण म्हणून दिलेल्या शेअर्सची बाजारातील पडझडीमुळे आजची किंमत रु.२७ लाख इतकीच आहे त्यामुळे ५०% मार्जीन विचारात घेता ड्रॉईंग पॉवर रु.१३.५० लाख इतकी येत आहे अशा वेळी आपल्याला दोन पर्याय असतात एक आपल्या डी-मॅट खात्यातील उर्वरित (बेनिफिसियरी) शेअर किमान रु. २ लाख बाजार भाव असणारे वाढीव तारण म्हणून देणे त्या शेअर्स वर बँकेस प्लेज करण्यासाठी लीन नोंदवून देणे जेणे करून कर्ज रक्कम ड्रॉईंग पॉवरच्या आत असेल. जर आपल्या डी-मॅट खात्यात बेनिफिसियरी शेअर्स शिल्लक नसतील किंवा अपुरे असतील तर आपल्या कर्ज खात्यात रु. एक लाख जमा करून खाते ड्रॉईंग पॉवर आणावे लागते.
आता सॉफ्टवेअर मुळे कर्ज खात्यातील नावे बाकी ड्रॉईंग पॉवर पेक्षा कमी झाल्यास लगेचच तशी सूचना खातेदारास एसएमएस/मेल द्वारा दिली जाते .
अशी परिस्थिती सर्वसाधारणपणे ओव्हर ड्राफ्ट खात्यास येऊ शकते डिमांड लोन स्वरूपाच्या खात्यात दरमहा परतफेड होत असल्याने आणि परतफेड नियमित असल्यास अशी वेळ सहसा येत नाही.
जर खाते ड्रॉईंग पॉवरमध्ये आणले गेले नाही तर बँक प्लेज असलेले शेअर्स बाजार भावाने विकून संपूर्ण कर्ज रक्कम वसूल करून शिल्लक राहिलेल्या शेअर्स वरील प्लेज रद्द करून खाते बंद वसूल करू शकते. विशेष म्हणजे जरी शेअर्स बँकेस प्लेज असले तरी कर्जाच्या कालावधीत सबंधित शेअर्सवर मिळणारे बोनस /राईट/ लाभांश हे कर्जदारालाच मिळतात.प्रत्यक्ष कर्ज रक्कम अदा करण्यापूर्वी कर्जदारास कर्ज रकमेची प्रॉमीसरी नोट व प्लेज अॅग्रीमेंट करून द्यावे लागते.
शेअर्स तारण कर्ज घेण्याचे फायदे
-लोन अगदी सहजगत्या मिळू शकते व अन्य कर्जांच्या तुलनेने व्याज दर कमी असतो.
-कर्जास जामीन द्यावा लागत नाही शिवाय कर्ज रक्कम अप्लायला हव्या त्या कारणासाठी वापरता येते. ताळेबंद किंवा अन्य आर्थिक माहिती द्यावी लागत नाही.
-ओव्हर ड्राफ्ट पद्धतीने घेतल्यास शेअर्सची बाजारातील किंमत वाढल्यास कर्ज मर्यादा वाढवून मिळू शकते.
-शेअर्स न विकता कर्ज घेतल्याने शेअर्स वर मिळणारा लाभांश/बोनस/राईट अबाधित राहतात तसेच शेअर्सचे भाव वाढल्यास भांडवली नफाही होत असतो.
-अशा प्रकारचे कर्ज इक्विटी म्युचुअल फंडाच्या युनिट्सच्या तारणावर सुद्धा मिळू शकते व त्यासाठीचे नियम सुद्धा बहुतांशी सारखेच आहेत.
थोडक्यात असे म्हणता येईल की आपल्याकडे शेअर्स असतील तर आपल्या आर्थिक अडचणीच्या वेळी त्यावर सहजगत्या कर्ज मिळू शकते व शेअर्स विकण्या पेक्षा हा निश्चितच चंगला पर्याय आहे. आता बहुतेक सर्व प्रमुख बँका शेअर्स तारण कर्ज ऑन लाईन पद्धतीने सुद्धा देतात यामुळे प्रत्यक्ष बँकेत न जाता कर्ज मिळू शकते. तसेच काही अनपेक्षित गरजांसाठी ओव्हर ड्राफ्ट सुविधा मंजूर करून घेतल्यास ऐनवेळी धावपळ होणार नाही आणि वेळीच रक्कम उपलब्ध असल्याने होणारे नुकसान टाळता येऊ शकेल. मात्र इथे एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे कि बँकेस मान्य असतील अशाच शेअर्सवर कर्ज मिळते तसेच यावरील व्याजाचा दर बँकेनुसार कमी अधिक असतो त्या दृष्टीने कर्ज घेण्यापूर्वी बँकाचे व्याज दर पाहून कमीतकमी व्याज आकारणाऱ्या बँकेकडून कर्ज घ्यावे.