दरवर्षीप्रमाणे गेल्या शनिवारी जागतिक महिला दिन साजरा झाला. ‘व्हॉट्सअॅप’वरील शुभेच्छांचा वर्षाव सकाळीच सुरू झाला होता. घरातील पुरुष मंडळींनीदेखील महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. काही जणींना आरामासाठी सक्तीची सुट्टी, गोड शब्द मिळाले तर काहींना फुलं आणि भेट वस्तू. अनेक ठिकाणी मॉलमध्ये, दुकानांमध्ये महिला दिन विशेष सवलत योजना होत्या. तरुण मुली आणि सधन कुटुंबातील स्त्रियांसाठी चांगलीच चंगळ होती. खादाडी, शॉपिंग, सिनेमा, किट्टी पार्ट्या सगळी धम्माल! परंतु या सगळ्या गोष्टी चालू असताना आपल्यातील अनेक मैत्रिणींचा दिवस नेहमीचाच होता. यातील अनेक जणी एकतर अत्यावश्यक सेवा पुरवतात, असंघटित क्षेत्रात कार्यरत आहेत किंवा स्वत:चं कुटुंब सांभाळत आहेत. उदाहरण घ्यायचं तर नर्सेस, हॉस्पिटलमधील इतर कामं सांभाळणाऱ्या स्त्रिया, ब्यूटिशिअन, फिटनेस एक्स्पर्ट, डाएटिशिअन, मॉल/दुकानांमध्ये काम करणाऱ्या, भाजीवाल्या, खादाडी पुरवणाऱ्या. तसेच जी घरातील स्त्री नोकरीसाठी बाहेर पडते, जिच्या एका दिवसाच्या खाड्यामुळे अख्ख्या कुटुंबाची गैरसोय होते ती घरातील कामं करणारी आणि जेवण बनवणारी बाई आणि स्वत:कडे कर्तृत्व असताना जिने घर सांभाळणं स्वीकरलं ती आई/ताई/आजी. ज्यांनी नाच ग घुमा चित्रपट पाहिला आहे, त्यांना हे सांगायलाच नको. आजचा माझा लेख या अशाच मैत्रिणींसाठी ज्या दुसऱ्याचं आयुष्य सुखकर, निरोगी, सोयीस्कर करण्यात मदत करत आहेत आणि ज्यांच्याकडे कदाचित स्वत:साठी वेळ नसतो.
इथे स्त्रीवाद करायची कोणतीही गरज मला भासत नाही. कारण आर्थिक नियोजन आणि गुंतवणूक या गोष्टीचा स्त्री-पुरुष व इतर असण्याशी कोणताही संबंध नाही. जिथे काम – तिथे कमाई, जिथे जबाबदारी – तिथे नियोजन, जिथे गरज – तिथे गुंतवणूक हे समीकरण सगळीकडे लागू होतं. तेव्हा प्रत्येक कमावत्या स्त्रीने मुळात आपली आर्थिक सुबत्ता आपणच वाढवणं अपेक्षित आहे. लग्नाआधी वडील किंवा मोठा भाऊ आणि लग्नानंतर नवरा आणि पुढे मुलं यांच्यावर विसंबून राहण्यापेक्षा स्वत: शिकून, अनुभव घेऊन पुढे सरकत राहणं गरजेचं झालं आहे. शहरांमध्ये बऱ्यापैकी याबाबत जनजागृती झालेली आहे. परंतु ग्रामीण भागांमध्ये, निमशहरी भागांमध्ये आणि शहरांमध्येसुद्धा अनेक ठिकाणी स्त्रिया अजूनही स्वत:चे आर्थिक निर्णय स्वत: घेत नाहीत. कधी शिक्षणाचा अभाव, तर कधी अनास्था, कधी मानसिक परावलंबन तर कधी उगीचच वाटणारी भीती. कारण कुठलंही असो, ते शोधून ती भीती नाहीशी करणे ही आजच्या काळाची गरज आहे.
तर अशा मैत्रिणींना मी तीन प्रकारांमध्ये विभागते – संपूर्ण आर्थिक स्वातंत्र्य असलेल्या कमावत्या स्त्रिया, अर्धवेळ काम करणाऱ्या स्त्रिया, दुसऱ्यावर आर्थिकरीत्या पूर्णपणे अवलंबून असणाऱ्या स्त्रिया. असं करण्यामागे कारण एकच, ते म्हणजे प्रत्येकीची गरज वेगळी आहे. तेव्हा आर्थिक नियोजनसुद्धा वेगळंच असावं लागणार. काही गोष्टी तर सर्वांनाच लागू पडतात. बँकेचे व्यवहार सांभाळता येणं, ऑनलाइन व्यवहार करताना खबरदारी घेणं, गुंतवणुकीबाबत माहिती असणं, निरनिराळे विमा पर्याय समजणं इत्यादी. वारसाहक्क कायदे तर सर्वच महिलांनी समजून घेतले पाहिजेत.
आर्थिक स्वातंत्र्य असणारी कमावती स्त्री ही अनेकदा कुटुंबाच्या आर्थिक प्रगतीमध्ये महत्त्वाची भागीदार असते. तेव्हा सर्वात प्रथम तिचा योग्य मुदत विमा घेण्याची गरज असते. नोकरी असो किंवा व्यवसाय, मिळकतीनुसार आणि जबाबदारीनुसार मुदत विमा कवच हे घ्यायलाच हवं. शिवाय आरोग्य विमा, गंभीर आरोग्य विमा आणि त्याव्यतिरिक्त काही रक्कम (विम्याबाहेरील खर्चांसाठी). आधी पन्नाशीनंतर सुरू होणाऱ्या आरोग्याच्या तक्रारी आज विशी-तिशीतच होत आहेत. राहणीमानाचे खर्चसुद्धा वाढत आहेत. तेव्हा नोकरी/व्यवसायासोबत गुंतवणूकसुद्धा सुरू ठेवणे आवश्यक आहे. स्वत:च्या निवृत्तीवर तिने वेळीच लक्ष देणं महत्वाचं आहे. तिने कोणतीही गुंतवणूक दुसऱ्याच्या नावाने करू नये. भावनेच्या आहारी जाऊन गुंतवणूक पर्यायांपासून लांब राहण्यासाठी मुळात वाचन करणं, माहिती पडताळून पाहणं हे आलंच. कोणत्याही कागदावर सही करण्याआधी तो कागद नीट वाचावा. दुसऱ्याच्या कर्जासाठी हमीदार राहताना खबरदारी बाळगावी. अनेकदा काही ना काही कारणांमुळे जेव्हा कमाईमध्ये व्यत्यय येतो, तेव्हा स्वत:च्या खर्चाची तरतूद कशी होईल यावर आधीच विचार केलेला बरा. मुळात पालकत्व स्वीकारण्याच्या आधी मानसिक, आर्थिक तयारी करून त्यानुसार ज्या काही सोयी लागणार आहेत, त्यांची तरतूद करावी. कुटुंबातील इतर सदस्य आणि मुळात म्हणजे जोडीदार, यांच्याकडून जेवढी मदत होईल, तेवढं कुटुंबासाठीच चांगलं असेल. ‘आमच्या वेळी असं नव्हतं’, ‘आम्ही पण सगळं सांभाळून नोकरी केली’, इत्यादी गोष्टी बाजूला ठेवून जर त्या स्त्रीला भावनिक पाठिंबा दिला तर सोन्याहून पिवळं नाही का? आज एकाच्या कमाईत भागत नाही, हे अनेकांना जाणवत आहे. तर मग थोडा मोकळा विचार केला तर त्या स्त्रीचं, कुटुंबातील सर्वांचं आरोग्य पण चांगलं राहील आणि आर्थिक प्रगतीसुद्धा होईल.
आता वळूया अर्धवेळ नोकरी करणाऱ्या स्त्रियांकडे. इथे जोडीदारावर अवलंबित्व असल्यामुळे एकटीचं आर्थिक नियोजन करून चालत नाही. शिवाय अनेकदा अशा स्त्रियांकडे मिळकत नियमित नसल्याने खर्चाचा ताळमेळ बसवणं थोडं कठीण असतं. म्हणून अशा जणींना आपत्कालीन निधी (इमर्जन्सी फंड) थोडा जास्त ठेवावा लागतो. स्वत:चा विमा तर महत्त्वाचा आहे, पण त्याहीपेक्षा तिने आपल्या जोडीदाराचा काढून घ्यावा ज्याच्यात ती किंवा त्यांची मुलं नॉमिनी असतील. विवाहित महिला मालमत्ता कायद्यातील तरतुदी समजून हे करून घ्यावं. जोडीदाराच्या गुंतवणुकींवरसुद्धा लक्ष ठेवावं. जर त्याच्याकडून चांगली गुंतवणूक होत नसेल, तर त्याच्याकडून मासिक पैसे घेऊन गुंतवणूक करावी. आपल्या कुटुंबाची गुंतवणूक कुठे आहे, कोणती कर्जे आहेत, विमा पॉलिसी कुठे आहेत? हा सर्व तपशील एक ठिकाणी नमूद करून ठेवावा. जर कधी दुर्दैवाने घटस्फोट झाला, तर त्यावेळी योग्य दावा करण्यासाठी सगळी माहिती गरजेची असते.
आता वळू या त्या स्त्रियांकडे ज्या आर्थिकरीत्या दुसऱ्यावर अवलंबून आहेत. त्यांनी मुळात कुटुंबाच्या आर्थिक व्यवहारांमध्ये लक्ष घालणं जास्त महत्त्वाचं आहे. शिवाय बँकेतील प्रत्येक खात्यावर त्यांचं नाव, गुंतवणुकीवर नामनिर्देशन असायलाच हवं. नवऱ्याचा आयुर्विमा, आरोग्यविमा, इतर विमा पॉलिसी कुठे आहेत आणि त्यात नामनिर्देशन कोणाचं आहे हे बघावं. आपला जोडीदार कसा आहे हे ओळखून त्यानुसार गुंतवणूक स्वत: करायची की त्याच्यावर विसंबून राहायचं हे ठरवावं. जर जोडीदाराकडून हवा तसा प्रतिसाद मिळत नसेल, तर स्वत: काय करता येईल जेणेकरून काहीतरी मिळकत स्वत:साठी होईल आणि त्यातून गुंतवणूक करता येईल याकडे लक्ष द्यावं. एक जबाबदारीचं काम इथे मी मुलींच्या आई आणि वडिलांवर टाकते. तुमच्या मुलीला तिचे पैसे स्वत: सांभाळायला शिकवा. गुंतवणूक करायला शिकवा. मुलांप्रमाणे आज मुलीसुद्धा शिकायला आणि नोकरीसाठी लांब राहत आहेत. तेव्हा स्वत:ची आर्थिक जबाबदारी त्यांनी घेतलीच पाहिजे. त्यांची कमाई त्यांना उपभोगता आली पाहिजे आणि पुढे त्यांचं कोणी आर्थिक शोषण करू नये तर त्यांना आर्थिक स्वातंत्र्य हे घरीच मिळालं पाहिजे.
स्वत:चं आयुष्य पणाला लावून इतरांसाठी झुरणं ही मनोवृत्ती बदलून आपल्यालासुद्धा आनंदाने आणि स्वाभिमानाने कसं जगता येईल यावर वेळीच लक्ष द्यावं. शेवटी एक स्त्री ही कुटुंबाच्या प्रगतीमध्ये मोठा हातभार लावते. ती कमावती असो किंवा नसो. तेव्हा तिने तिचं मानसिक, भावनिक आणि शारीरिक आरोग्य सांभाळून आर्थिक सक्षमीकरणसुद्धा करावं. घरातील इतर मंडळींनी केवळ एक महिला दिवस साजरा न करता घरातील स्त्रीला वर्षभर प्रोत्साहित करावं ही वाचकांकडून अपेक्षा.
लेखिका सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार
trupti_ vrane@yahoo. com