TCS CEO’s Salary: टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस अर्थात टीसीएसने चालू आर्थिक वर्षात आपल्या एकूण जागतिक मनुष्यबळापैकी दोन टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. ही संख्या जवळपास १२ हजारांच्या पुढे आहे. टीसीएसच्या या घोषणेनंतर आयटी क्षेत्रात एकच खळबळ उडाली. AI तंत्रज्ञानामुळे ही नोकरकपात होत असल्याचीही चर्चा पुढे आली होती. मात्र टीसीएसने यावर ठोस काही प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान नोकरकपातीची चर्चा असताना आता टीसीएसच्या सीईओंच्या पगाराचीही चर्चा रंगली आहे.
टीसीएस नोकरकपात नव्या तंत्रज्ञानाला गवसणी घालण्याचा निर्णय घेत असताना कंपनीचे सीईओ आणि एमडी के. कृतिवासन यांच्या मोठ्या पॅकेजवर टीका केली जात आहे.
सीईओ कृतिवासन यांचा पगार चर्चेत
टीसीएसकडून हजारो कर्मचाऱ्यांना नारळ देण्याची घोषणा झाल्यानंतर सीईओ कृतिवासन यांच्या कोट्यवधीच्या पॅकेजवर टीका होत आहे. हजारो कर्मचारी कंपनीतून काढले जात असताना कंपनीतील उच्चपदस्थ अधिकारी इतके मोठे पॅकेज कसे घेतात? अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.
सीएनबीसीवरील वृत्तानुसार, कृतिवासन यांना २०२५ या आर्थिक वर्षासाठी २६.५२ कोटी रुपयांचे पॅकेज मिळाले आहे. यामध्ये १.३९ कोटी रुपये बेसिक वेतन, २.१२ कोटी रुपये अन्य लाभ आणि भत्ते आणि २३ कोटी रुपये कमिशन आहे.
सामान्य कर्मचारी आणि उच्चपदस्थांच्या वेतनात असलेली ही दरी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. विशेष करून जेव्हा हजारो कर्मचाऱ्यांना कंपनीने कामावरून काढण्याचा निर्णय घेतला आहे.
सोशल मीडियावर कंपनीचे ट्रोलिंग
सोशल मीडियावर प्रवीण चक्रवर्ती नावाच्या एका इसमाने लिहिले की, तीन कोटी वेतन घेणाऱ्या व्यक्तीने अडीच कोटी रुपये वेतन घेतले तरी त्यांच्या आयुष्यात फार काही मोठा परिणाम होणार नाही. पण जर १२ हजार कर्मचाऱ्यांना वार्षिक १५ लाखाच्या पॅकेजच्या तुलनेत जर शून्य वेतन मिळणार असेल तर त्यांच्या आयुष्यात मात्र मोठ्या अडचणी निर्माण होतील.
आणखी एका युजरने लिहिले की, एखाद्या कंपनीच्या अध्यक्षाने वार्षिक १५० कोटी रुपये वेतन घेणे योग्य आहे का? दुसऱ्या बाजूला हजारो लोकांना कामावरून कमी केले जात आहे.
काही लोकांनी कंपनीचीही बाजू घेतली आहे. एका युजरने लिहिले की, ती खासगी कंपनी आहे. धर्मदाय संस्था नाही.