Zomato CEO Deepinder Goyal on Trump Tariff: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के आयातशुल्क लादण्याची घोषणा केल्यानंतर भारतात सर्वच स्तरातून त्यावर प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक उद्योजक, व्यावसायिकांनी ट्रम्प यांच्या निर्णयावर संताप व्यक्त केला आहे. फूड डिलिव्हरी करणाऱ्या झोमॅटो कंपनीचे सीईओ दीपिंदर गोयल यांनीही यावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. एक्सवर एक पोस्ट शेअर करत गोयल म्हणाले, “जोपर्यंत आपल्या देशाचे नशीब आपण स्वतः बदलत नाही, तोपर्यंत जागितक शक्ती आपल्याला धमकावत राहिल.”
दीपिंदर गोयल यांच्या एक्सवरील पोस्टला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेकांनी त्यांच्या बेधडक मताचे स्वागत केले आहे. तसेच त्यांना पाठिंबा दर्शविला आहे. दीपिंदर गोयल पोस्टमध्ये म्हणाले, दर काही वर्षांनी जग आपल्याला आपली जागा दाखवून देते. तिथे धोका आहे, तिथे टॅरिफ आहे, अशी कारणे दिली जातात. पण यातला गर्भित इशारा हाच असतो की, तुम्ही (भारत) तुमच्या चौकटीत राहा.
भारताने निर्दयी महासत्ता व्हावे
“जोपर्यंत आपले नशीब आपण आपल्या हाती घेत नाही, तोपर्यंत जागतिक शक्ती आपल्याला धमकावत राहिल. यातून मार्ग काढायचा असेल तर आपण सर्वांनी एकत्रितपणे जगातील निर्दयी महासत्ता होण्याचा निर्णय घेतला पाहिजे. अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, संरक्षण आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे महत्त्वाकांक्षा बाळगायला हवी. दुसरा कोणताही मार्ग नाही”, असेही दीपिंदर गोयल आपल्या पोस्टमध्ये म्हणाले.
अमेरिकेने ५० टक्के आयातशुल्क लादल्यामुळे काहीसा तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर गोयल यांची ही प्रतिक्रिया आली आहे. भारताने रशियाकडून खनिज तेल आयात करणे बंद करावे, यासाठी अमेरिकेकडून दबाव टाकण्यात येत आहे.
गोयल यांच्या पोस्टखाली काही युजर्सनी कमेंट करत भारताने सशक्त व्हावे, अशी भावना व्यक्त केली आहे. एका युजरने म्हटले की, आपण खूप काळ विनम्र राहिलो, आता नेतृत्व करण्याची वेळ आली आहे. गोयल यांनी भारताला महत्त्वाकांक्षा वाढविण्यास सांगितल्याबद्दल अनेक युजर्सनी या पोस्टचे कौतुक केले आहे.