17 November 2017

News Flash

तालासुरांशी गट्टी जमली

सरोदमध्ये मास्टर होण्यासाठी धडपड करणाऱ्या आदित्य आपटेने पहिलीत असताना सरोद हाती घेतली.

मितेश जोशी | Updated: May 13, 2017 12:47 AM

 

नादब्रह्माशी तल्लीन होत रसिकांची तालासुरांशी गट्टी जमवणाऱ्या महाविद्यालयीन वादकांच्या प्रवासाचा घेतलेला हा आढावा.

सरोदच्या तारा छेडताना

सरोदमध्ये मास्टर होण्यासाठी धडपड करणाऱ्या आदित्य आपटेने पहिलीत असताना सरोद हाती घेतली. त्याचे गुरू पं. प्रदीप बरोट यांच्याकडे गेली १६ वर्षे तो रियाज करत आहे. सरोद हे वाद्य सहसा कोणी वाजवत नाही, पण माझी या वाद्याशी ओळख माझ्या वडिलांनी भरवलेल्या वाद्य व त्यांचा इतिहास या प्रदर्शनामध्ये झाली. तेथे मला सरोद या वाद्याचा इतिहास व स्वरूप याची माहिती मिळाली. माहिती वाचून मी सरोदच्या प्रेमातच पडलो असे आदित्य सांगतो. आदित्य लवकरच यूटय़ूब चॅनेलच्या माध्यमातून सरोद या वाद्याचा इतिहास व त्यामधील गमतीजमती दाखवणार आहे. राज्यस्तरीय व राष्ट्रीय पातळीवर सलग तीन वर्षे आदित्यने सुवर्ण पदक पटकावले आहे. तसेच हिृदयेश आर्ट्स पुरस्कार त्याला मिळाला आहे.  जास्तीतजास्त लोकांना गुरुशिष्य परंपरेद्वारे सरोद हे वाद्य शिकवण्याचा आदित्यचा मानस आहे.

गायक ते तबलावादक

डहाणूकर महाविद्यालयात शिक्षण पूर्ण झालेल्या तनय रेगेला वाद्याची आवड लहानपणापासूनच होती. शिशुवर्गात असताना तो खेळण्याऐवजी वाद्यांमध्येच रममाण व्हायचा. त्याच्या या छंदाकडे घरच्यांचे लक्ष गेले तेव्हा त्यांनी त्याला संगीत विद्यालयात प्रवेश घेऊन दिला. पण तेव्हा तनय केवळ दोन वर्षांचा होता. ‘दोन वर्षांचा मुलगा तबला शिकू शकणार नाही; पण त्याला शास्त्रीय संगीत शिकवा’ असा सल्ला गुरूंनी दिला. त्यानुसार तनयने काही काळ शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले, पण पुढे पाचवीपासून तो तबला शिकू लागला. सध्या तो पंजाब घराण्याचे तबला वादक योगेश समसी यांच्याकडे तालीम घेत आहे. तनयला राष्ट्रीय पातळीवर बक्षिसे मिळाली आहेत. तसेच मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवामध्येही त्याने रौप्यपदक पटकावले आहे. सध्या तनय तबल्यामध्ये मास्टर होण्याचे स्वप्न पाहत आहे.

तीन पिढय़ांचा वसा

घरातच शेहनाईची उपासना दोन पिढय़ांनी केली आणि आता तिसरी पिढीही ती करत आहे. साउंड इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत असलेला नीलेश धुमाळ हा एच आर महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. पंडित मनोहर चिमोटे यांच्याकडे नीलेशचे संगीत शिक्षण पूर्ण झाले. नीलेश हा संगीतकार असून त्याने आजवर अनेक अल्बमसाठी शेहनाई वाजवली आहे. त्याच्या या प्रवासामधील गमतीचा किस्सा सांगताना नीलेश सांगतो की, महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया पूर्ण करीत असतानाही तेथील शिक्षक मंडळींसाठी मी खास शेहनाई वाजवली व त्यामुळे माझा खोळंबा झाला नाही, त्यांनी मला लगेच महाविद्यालयात प्रवेश दिला. भारतरत्न शेहनाई वादक बिस्मिला खान यांना मला भेटण्याची संधी मिळाली नाही, याची मला खूप खंत वाटत आहे, असे नीलेश सांगतो. नीलेश लवकरच त्याचा स्वत:चा ‘बँड’ झी युवा या वाहिनीवरील सरगम या कार्यक्रमात प्रकाशझोतात आणणार आहे.

बासरी

बासरीत मास्टर करत असलेल्या अवधूत फडकेला बासरी वाजवण्याची आवड तशी लहानपणापासूनच होती. संगीताचे प्रारंभीचे धडे त्याने त्याच्या आईकडे गिरवले. सध्या तो रूपक कुलकर्णी यांच्याकडे तालीम घेतोय. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या संगीत अलंकार या सर्वोच्च परीक्षेत बासरी वादनात संपूर्ण भारतातून प्रथम येण्याचा बहुमान त्याने पटकावला आहे. नुकताच अवधूतने अमेरिकेत सुमारे ८४ दिवस ५६ विविध शहरांमध्ये ६४ कार्यक्रम करण्याचा रेकॉर्ड केला आहे. अमेरिकन लोकांमध्ये भारताविषयी असलेले प्रेम तसेच भारतीय संगीताविषयी असलेला आदर मी जवळून अनुभवला आहे असे अवधूत सांगतो. अवधूतकडे जगातील वेगवेगळ्या वीस ते बावीस बासऱ्यांचा संग्रह आहे. मला यापुढे बासरीतच करिअर करायचे आहे व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करायचे आहे असे अवधूत आवर्जून सांगतो.

झेम्बेची मोहिनी

रुपारेल महाविद्यालयात फिजिक्स या विषयात दुसऱ्या वर्षांचे शिक्षण घेत असलेल्या संचित म्हात्रेला लहानपणापासूनच वाद्यात रस होता. वयाच्या सहाव्या वर्षी त्याने संगीत विद्यालयात प्रवेश घेऊन तबल्याचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. नंतर तौफिक कुरेशी यांच्याकडून नववीत असल्यापासून झेम्बे शिकण्यास सुरुवात केली. दोन वर्षांपूर्वी दादर व बोरीवली येथे पंचामृत आर्ट्स या नावाने संचितने संगीत विद्यालयाची सुरुवात केली. आज त्याच्या या विद्यालयात अनेक विद्यार्थी  संगीताचे अध्ययन करत आहेत. झेम्बेबरोबरच संचित कहोन हे वाद्यदेखील शिकत आहे. तसेच तो उत्तम ड्रमदेखील वाजवतो. कलर्स हिंदी या वाहिनीवरील छोटे मियां या कार्यक्रमामध्ये तो वाद्यांची साथ देतो. मला माझ करिअर संगीतात करायचे आहे असे संचित सांगतो.

संवादिनीशी विशेष संवाद

डहाणूकर महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या ओमकार अग्निहोत्रीचे संगीत शिक्षण त्याच्या आजोबांकडे सूरमणी ‘पं. उत्तमराव अग्निहोत्री’ यांच्याकडे झाले. सध्या ओमकार ‘विश्वनाथ कान्हेरे’ गुरुजींकडे गेली ७ वर्षे हार्मोनियमचे प्रशिक्षण घेत आहे. हार्मोनियमसोबतच पियानो, कीबोर्ड, ऑर्गन ही वाद्येदेखील ओमकार उत्तम वाजवतो. ऑल इंडिया की बोर्ड फेस्टिव्हलमध्ये ओमकार त्याच्या गुरूंबरोबर फ्यूजन वाजवणार आहे. हार्मोनियम हे वाद्य केवळ संगीतकाराला त्याच्या संगीतामध्ये साथ देत ते एकल वाजवले जात नाही ही दृष्टी आम्हा गुरुशिष्यांना नाहीशी करायची आहे.  त्यासाठी आम्ही सर्वच जण अपार मेहनत व धडपड करत आहोत असे ओमकार सांगतो.

First Published on May 13, 2017 12:47 am

Web Title: article on collage instrumentalist