12 December 2017

News Flash

‘मंडळा’ची मंडळी

सर्वप्रथम वेगवेगळ्या शैक्षणिक आणि सामाजिक मंडळांची (क्लब) स्थापना होण्यास प्रारंभ झाला आहे.

लोकसत्ता टीम | Updated: June 24, 2017 1:30 AM

 

महाविद्यालये सुरू होऊन पंधरवडा झाला आहे. येत्या काळात महोत्सवांची लगबग महाविद्यालयांमध्ये सुरू होणार असली तरी सर्वप्रथम वेगवेगळ्या शैक्षणिक आणि सामाजिक मंडळांची (क्लब) स्थापना होण्यास प्रारंभ झाला आहे. नेहमीच्या वाङ्मय मंडळ, राष्ट्रीय स्वयंसेवक मंडळ, विद्यार्थी प्रतिनिधी मंडळ अशा मंडळांना बगल देत विद्यार्थ्यांचा सर्वतोपरी विकास समोर ठेवून वेगवेगळ्या आणि सद्य:स्थितीत विकासाला पोषक असणाऱ्या मंडळाची स्थापना महाविद्यालयांमध्ये होण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना सामाजिक जाणिवेबरोबरच त्यांना भविष्यात व्यावसायिक दृष्टीने सक्षम करण्यासाठीचे प्रयत्न या मंडळांद्वारे होत आहेत.

सोमय्या महाविद्यालय

नेचरक्लब

एस के सोमय्या महाविद्यालयातील ‘नेचर क्लब’तर्फे शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणास अनुकूल असणाऱ्या उपक्रमांचे आयोजन केले जाते. यामधून जैवविविधता, मातीची झीज, प्रदूषण या पर्यावरणीय संकल्पनांचे ज्ञान विद्यार्थ्यांना दिले जाते. शिवाय पावसाळ्यात खास मान्सून सफरीचा आनंद ही विद्यार्थी लुटतात. तसेच वर्षभरात पर्यावरणाशी निगडित तज्ज्ञ व्यक्तींच्या व्याख्यानांचे आयोजन केले जाते. याचा उपयोग विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणासंबंधी जागरूकता निर्माण करण्यासाठी होतो आणि त्यांना नैसर्गिक सुंदरताही अनुभवायला मिळते.

स्मॅक

‘सोमय्या मूव्ही अ‍ॅप्रिसिएशन क्लब’ हा चित्रपटप्रेमी व त्यात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी स्थापन करण्यात आला आहे. या क्लबतर्फे वर्षभर सिनेसृष्टीतील दिग्गज व्यक्तींची व्याख्याने आयोजित करण्यात येतात तसेच बॉलीवूड व हॉलीवूड चित्रपटांचे सादरीकरण केले जाते. शिवाय त्यामधील अभिनयाचा भाग तसेच तांत्रिक गोष्टी यांबाबत चर्चासत्रे आयोजित केली जातात. भारतीय चित्रपट तथा चित्रपटनिर्मिती अशा अनेक विषयांवर याद्वारे संवाद साधला जातो. यामुळे विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त चित्रपटाबद्दल माहिती मिळते, नवीन संकल्पनांची ओळख होते आणि त्यांचा चित्रपट क्षेत्रात काम करण्यासाठीचा प्राथमिक पाया भक्कम होतो.

रिडर्स क्लब

वाचनाची आवड तसेच कविता करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाने ‘रिडर्स क्लब’ची स्थापना केली आहे. या क्लबअंतर्गत साहित्याशी निगडित विविध स्पर्धा व व्याख्याने आयोजित करण्यात येतात. तसेच रिडर्स क्लब दरवर्षी ‘लुमिनिसेन्स’ स्पर्धेचे आयोजन करते. यामध्ये कवितापठण, रोल प्ले, सामूहिक चर्चा आणि लेख विश्लेषण यांचा समावेश आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्यातील कला सादर करण्याची संधी मिळते.

अथर्व महाविद्यालय

एनईएन

‘नॅशनल इंटरप्रेनरशिप नेटवर्क’अंतर्गत अथर्व महाविद्यालयाचे ई-सेल आहे. याद्वारे विद्यार्थ्यांना उद्योजकतेसाठी प्रोत्साहित केले जाते. विद्यार्थ्यांच्या कल्पनांना वाव मिळावा यासाठी कार्यशाळा, तज्ज्ञ व्यक्तींचे सत्र यांसारखे  विविध उपक्रम आयोजिले जातात. यामुळे त्यांच्यातील नेतृत्वकौशल्य वाढवण्यास आणि स्वप्नांना वास्तवरूपात आणण्यास मदत होते. ‘इंटरप्रेनरशिप ड्राइव्ह’चे सभासद वर्गावर्गात तसेच रस्त्यावर जाऊन लोकांमध्ये उद्योजकतेचे महत्त्व व गरज समजून देण्यास मदत करते. तसेच सेलमधील सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते ज्याचा उपयोग त्यांना भविष्यात होतो.

स्पोर्टस् क्लब

स्पोर्ट्स क्लबमध्ये फुटबॉल, क्रिकेट, कबड्डी, बेसबॉल, बास्केटबॉल, सॉफ्टबॉल, व्हॉलीबॉल इत्यादी आऊटडोअर खेळ व कॅरम, चेस यांसारखे इनडोअर खेळ खेळले जातात. वर्षभरात होणाऱ्या स्पर्धामध्ये विद्यार्थी मोठय़ा प्रमाणात सहभागी होतात. शिवाय दरवर्षी महाविद्यालयात ‘स्पोर्ट्स वीक’ साजरा केला जातो.

आयईईई अथर्व

आयईईई अथर्व ‘स्टुडंट चॅप्टर इलेक्ट्रॉनिक्स’ व ‘इलेक्ट्रिक इंजिनीअर्स’ संस्थेच्या अंतर्गत आहे. अथर्व महाविद्यालयातील आयईईई स्टुडंट चॅप्टर दरवर्षी मार्च महिन्यात ‘आयईईई ओमेगा’ नावाचा उत्सव साजरा करते. यामध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी व महाविद्यालयातील स्वयंसेवकांनी बनवलेले तांत्रिक प्रकल्प दाखवले जातात. विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी तसेच त्यांना आयईईई सदस्यतेचे महत्त्व कळावे यासाठी या उत्सवाचे आयोजन केले जाते. याव्यतिरिक्त सभासदांसाठी करिअर समुपदेशन, गेट सेमिनार, उद्योग क्षेत्रात इलेक्ट्रॉनिक्सची गरज अशा विविध विषयांवर सेमिनार व कार्यक्रम आयोजित केले जातात.

एसआयईएस महाविद्यालय, सायन

व्हॅल्यू लॅब

प्रामाणिकपणा, नैतिक मूल्य यांसारख्या मूल्यांचे महत्त्व विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी एसआयईएस महाविद्यालयात हा वेगळा उपक्रम राबवण्यात आला आहे. महाविद्यालयाच्या तत्त्वज्ञान विभागाने या उपक्रमाला सुरुवात केली. याअंतर्गत प्रत्येक महिन्यात एक विषय निवडला जातो आणि त्यावर वादविवाद स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा तसेच तज्ज्ञ व्यक्तीचे व्याख्यान आयोजित केले जाते. नैतिकतेचे विविध पैलू विद्यार्थ्यांना समजावे व त्यांचा मूल्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा म्हणून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

First Published on June 24, 2017 1:30 am

Web Title: college festivals in mumbai 4