‘स्मार्ट सिटी’ म्हणजे निव्वळ झगमगाट किंवा गुळगुळीत डांबरी सडक नव्हे तर माणसाला जीवन सुसह्य़ करणारी एक विकसित जीवन पद्धती म्हणता येईल. माणसाचे आरोग्य, शिक्षण, रोजगार, निवास या सर्व गोष्टींचा अभाव किंवा उपलब्धता त्याचे जीवन प्रभावित करीत असते. त्याला त्याच्या जगण्याचा हक्क स्मार्ट सिटीमध्ये अधिकाधिक सन्मानाने उपभोगता यावा, हे खरे तर स्मार्ट सिटीचे मूळ आहे. ती केवळ मूठभरांना दिलासा देणारी नव्हे तर सर्वानाच कवेत घेणारी हवी. मग त्यासाठी या स्मार्ट सिटीत काय काय असावे, त्यासाठी काय करावे, याचा विचार वेगवेगळ्या पातळ्यांवर, वेगवेगळ्या वयोगटात करावा लागेल. या स्मार्ट सिटीत शाळा, कॉलेजमध्ये वावरणारा विद्यार्थी फार महत्त्वाचा घटक आहे. त्यालाही स्मार्टसिटीकडून काही अपेक्षा असणारच! विद्यार्थ्यांच्या नजरेतील स्मार्टसिटी कशी असेल? शिवाय त्यावरील प्रकल्प सादर करताना तो त्यांच्या अभ्यासक्रमाचाच भाग असेल या दोन्ही गोष्टी एकत्र करून खरे तर महाविद्यालयाने एक दूरदृष्टी ठेवून हे प्रकल्प प्रदर्शन भरवले होते आणि ते यशस्वी झाले. खरी स्मार्ट सिटी कशी असावी, हे विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रात्याक्षिकातून दाखवून दिले.
हल्ली केवळ अन्न, वस्त्र आणि निवारा या तीनच मानवाच्या मूलभूत गरजा राहिलेल्या नाहीत. त्याला वाहतुकीची चांगली साधणे हवीत, चोवीस तास पाणी हवे, सिंचनाच्या सोयी हव्यात, महिला किंवा मुलींसाठी सुरक्षेची साधने हवीत, मनोरंजनाची आणि बुद्धिला खाद्या पुरवणारी वैचारिक साधने हवीत वगैरे वगैरे. अशा अनेक गोष्टींचा विचार विद्यार्थ्यांनी या प्रोजेक्ट कम प्रदर्शनानिमित्त केला होता, हे विशेष. एवढेच नव्हे तर बीड, लातूरमधील जो भयाण दुष्काळ पडला त्यातून बोध म्हणून जमिनीत पाणी मुरवल्यामुळेच पाण्याची पातळी वाढून आपल्या हँडपंप, विहिरींना पाणी मिळू शकेल, असा भविष्यकालीन वेधही त्यांनी यानिमित्त घेतला, हे महत्त्वाचे. आश्चर्य म्हणजे वकील किंवा पोलिसांना भारतीय दंड संहितेतील वेगवेगळी कलमे आणि ती नेमकी कशासाठी आहेत, याची माहिती सांगणारे अ‍ॅपही स्मार्ट सिटीत उपयोगी पडू शकते, ही कल्पनाही विद्यार्थ्यांचीच!
अभियांत्रिकीच्या सिव्हिल, इलेक्ट्रिकल्स, इलेक्ट्रॉनिक्स, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी आणि मॅकेनिकल पाच शाखांच्या अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकीच्या तोपर्यंतच्या शिक्षणात मिळवलेले ज्ञान प्रदर्शनात पणाला लावल्याचे दिसून आले. अगदी साधी गोष्ट म्हणजे पाणी जमिनीत मुरले तरच जमिनीतील पाण्याची पातळी वाढून ते साधे तत्त्वज्ञान वर्षांनुवर्षे पाजळले जाते. त्याचे थेट प्रात्यक्षिक दाखवून विद्यार्थ्यांनी तोही स्मार्ट सिटीचाच एक भाग असल्याचेही स्पष्ट केले. त्यासाठी पेव्हर ब्लॉक विकसित केले. पाणी फिल्टर होऊन ते जमिनीत मुरणे या दोन्ही गोष्टी त्यातून साध्य झाल्या. सोबत पाणी टंचाईवर मात करण्यासाठी स्मार्ट सिटी होण्यापूर्वीच या उपाययोजना आधीच करायला हव्यात, असा संदेश विद्यार्थ्यांनी दिला.
शाळा-महाविद्यालयांच्या परीक्षा झाल्यावर नवीन शैक्षणिक वर्षांमध्ये विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर, वयाचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व, उत्पन्नाचा दाखला, तसेच शपथपत्राची आवश्यकता पडते. निव्वळ विद्यार्थ्यांनाच नव्हे तर ग्रामीण भागातील नागरिकांनाही सात-बारासारख्या इतरही कागदपत्रांची गरज भासते. ही कागदपत्रे त्वरित मिळावीत यासाठी विद्यार्थ्यांनी एक अर्ज तयार करून शासनाच्या एका विशिष्ट सव्‍‌र्हरमध्ये संपूर्ण डाटा साठवून ठेवल्यानंतर प्रमाणपत्रे नागरिकांना सहज उपलब्ध करून देणे किती सोपे जाईल, खास करून ग्रामिणांना त्याचा लाभ होईल आणि त्यासाठी ग्रामसभा मदत करेल, इथपर्यंत या स्मार्ट सिटीचा विद्यार्थ्यांनी विचार केला होता.
ज्योती तिरपुडे  jyoti.tirpude@expressindia.com