scorecardresearch

वस्तुकथा : चला, हवा येऊ द्या!

जपानमध्ये सहाव्या शतकात तर चीनमध्ये नवव्या शतकापासून कोरीवकाम केलेले पंखे प्रचलित आहेत.

वस्तुकथा : चला, हवा येऊ द्या!
(संग्रहित छायाचित्र)

संदीप नलावडे

sandeep.nalawade@expressindia.com

‘सायोनारा सायोनाराऽऽ’.. लव्ह इन टोकिओ चित्रपटातील या गाण्यावर नृत्य करणारी आशा पारेख किती सदाबहार वाटते ना! त्या काळी स्नेहसंमेलनात जपानी पंखा हातात घेऊन या गाण्यावर अनेक तरुणी थिरकल्या. पंखा हे वारा घालण्याचे साधन. जपानी पंखे तर जगभरात प्रसिद्ध असले तरी प्राचीन काळापासून उकाडय़ावर नियंत्रण मिळवण्यासाठी माणसे अशा प्रकारचा हाताने हलवणारा पंखा वापरत.

जपानमध्ये सहाव्या शतकात तर चीनमध्ये नवव्या शतकापासून कोरीवकाम केलेले पंखे प्रचलित आहेत. जपानमध्ये तर वटवाघळाच्या पंखासारखे घडीचे पंखे असत. तो त्यांच्या वेशभूषेचाच भाग झाला होता. केवळ जपान आणि चीनच नव्हे तर आशिया खंडातील अनेक देशांमध्ये हाताने हलवण्याचे पंखे प्रसिद्ध होते. भारतात प्राचीन काळापासून पंखे वापरले जात. उकाडा कमी करण्यासाठी बांबू, ताडपत्रे, झाडाची मोठी पाने, मोर व शहामृगाची पिसे, कागद यांचा वापर करून पंखे बनवले जात. राजघराण्यामध्ये तर पंख्याने हवा घालण्यासाठी खास कर्मचाऱ्यांची निवड केली जात असे. युरोपमध्ये १४ व्या शतकात अशा प्रकारच्या पंख्याचा वापर केला जाऊ लागला.

मात्र विजेवर चालणारे पंखे बनवण्याचे श्रेय जाते, ते एस. एय. व्हीलर या शास्त्रज्ञाला. न्यूयॉर्कमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनीअर असलेले व्हीलर हे सजर्नशील व्यक्तिमत्त्व. सतत नवनवीन गोष्टींच्या शोधात ते असत. न्यूयॉर्कमधील स्टॅटन बेटावर व्हीलर एके दिवशी बोटीची वाट पाहात उभे होते. एखाद्या गोष्टीचे निरीक्षण करणे हा त्यांचा स्वभाव. लांबून येणाऱ्या बोटीकडे ते निरखून पाहात होते. बोटीला पुढे ढकलणाऱ्या पंख्यामुळे लाटा पसरत पुढे जात होत्या. हेच तत्त्व वापरून गार हवेच्या लाटा आपल्याला तयार करता येतील का असा विचार त्यांच्या मनात आला आणि १८८२मध्ये त्यांनी ‘बझ्झ फॅन’ बनवला. विद्युत मोटारीचा वापर करून हा पंखा फिरत असे.

व्हीलर यांचा पंखा अधिक जड आणि एकाच गतीने फिरत असे. फिलिप डिइल या जर्मन वंशाच्या अमेरिकी शास्त्रज्ञाने विजेच्या पंख्यावर अधिक संशोधन करून १८८६मध्ये छतावरील पंखे बनवले. विद्युत मोटार आणि अन्य विद्युत यंत्राचा वापर करून फिलिप यांनी या पंख्याची निर्मिती केली. विशेष म्हणजे या पंख्याला केवळ दोनच पाती होती. त्याच काळात जॉन आणि जेम्स हंटर या पिता-पुत्राने पाणी आणि झोतयंत्र (टर्बाइन) यांचा वापर करून छतावरील पंख्याची निर्मिती केली. फिलिप डिइल हा मात्र आपल्या पंख्यावर सतत संशोधन करून त्यात बदल करत असे. पंख्याच्या मध्यभागी दिवा लावण्याची कल्पना त्याचीच. ही कल्पना अमलात आणल्यानंतर पंख्याला मागणी वाढली आणि छतावरील पंख्याची निर्मिती मोठय़ा प्रमाणात होऊ लागली.

विशेष म्हणजे सुरुवातीचे पंखे हे कमी हवा देणारे आणि अधिक आवाज करणारे असत. १९२०मध्ये पंख्यात बदल करून काही दोन पात्यांऐवजी चार पात्यांचे पंखे बनवण्यात आले. जे कमी आवाज करणारे आणि अधिक थंड हवा देणारे होते. १९५०मध्ये एअर कंडिशनरचा शोध लागल्यानंतर अमेरिकेत हळूहळू पंख्यांची मागणी घटली. मात्र भारत आणि आफ्रिकी देशांमध्ये पंख्याला मागणी वाढली. भारतीय उपखंड आणि आखाती देशांमध्ये सध्या पंख्यांचा वापर मोठय़ा प्रमाणात केला जात आहे.

मराठीतील सर्व कॅम्पसकट्टा ( Campuskatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या