एखाद्या शाळेचा वा महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी राज्य, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करीत असेल तर कोणत्याही संस्थेच्या संचालकाची, प्राचार्य, प्राध्यापकाची गर्वाने छाती फुगते. अमूक अमूक विद्यार्थिनी आमच्या महाविद्यालयाची असल्याचे अभिमानाने सांगितले जाते. कारण कुठल्याही महाविद्यालयाचा विद्यार्थी एखाद्या मोठय़ा पदावर जातो तेव्हा महाविद्यालयांतून मिळालेल्या ज्ञानावर त्याने करिअरमध्ये यश संपादित केलेले असते. म्हणून विद्यार्थी व महाविद्यालयांमध्ये वर्षांनुवर्षे ऋणानुबंध निर्माण करणारी माजी विद्यार्थी संघटनेची नोंदणी व्हावी लागते. अशी नोंदणीकृत संघटना महाविद्यालयाच्या बहुमानात भर घालते. महाविद्यालयाचे नॅक करताना महाविद्यालयांच्या गुणात वाढ करण्याचा हा देखील एक निकष आहे. सर्वच महाविद्यालयांच्या वा संस्थांच्या विद्यार्थी संघटना नोंदणीकृत असतात असे नाही. मात्र, विद्यार्थ्यांना एकत्र करून त्यांच्याकडून काही आश्वासने मिळवण्यात महाविद्यालये यशस्वी ठरतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माजी विद्यार्थी संघटनांच्या माध्यमातून कार्यक्रम घेणे, बक्षिसे प्रायोजित करणे, संस्थेत मोठी उपकरणे खरेदी करणे किंवा इमारतींच्या बांधकामासाठी मोठय़ा प्रमाणात माजी विद्यार्थी संघटनांमार्फत निधी मिळत असतो. शिवाय माजी विद्यार्थ्यांच्या हितसंबंधांचा फायदा महाविद्यालयांना मिळत असतोच. राज्यस्तरीय किंवा राष्ट्रीय स्तरावरील परिषदा, चर्चासत्रे, महाविद्यालयांचे वर्धापन दिनात मोठे राजकीय नेते, उद्योगपती, बँकर्स, सनदी अधिकारी, वकील यांना निमंत्रित करण्यात माजी विद्यार्थ्यांची मध्यस्थी उपयोगी ठरते. काही माजी विद्यार्थी त्यांच्या पालकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विद्यार्थ्यांसाठी बक्षिसे, पारितोषिकेही घोषित करीत असतात. माजी विद्यार्थ्यांचे योगदान ओळखूनच बहुतेक प्रत्येक नावाजलेल्या महाविद्यालयांमध्ये त्यांच्यासाठी मोठी संमेलने, परिषदा आयोजित केल्या जातात आणि त्यानिमित्त आख्खी तुकडी एकत्र येऊन जुन्या आठवणींना उजाळा देत असते.

माजी विद्यार्थ्यांमध्ये केवळ त्या महाविद्यालयांनाच नव्हे तर पुढील पिढीलाही त्याचा फायदा होतो. कारण रोजगार निर्मिती किंवा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी एक चांगले माध्यम असते.

काही विद्यार्थी उद्योगक्षेत्रात जातात तेव्हा मनुष्यबळाची गरज काही प्रमाणात का होईना महाविद्यालयातून पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून भागवली जाते. मात्र, असेही विद्यार्थी आहेत की महाविद्यालये, शाळा किंवा शिक्षण देणाऱ्या संस्थेविषयी त्यांना ममत्व नाही. म्हणून तर माजी विद्यार्थी संघटनांमध्ये सक्रिय असलेले विद्यार्थी बोटावर मोजण्याएवढेच असतात. हा दोष संस्थेचा की त्या मुलाचा! माजी विद्यार्थ्यांचे योगदान केवळ आर्थिक नव्हे तर भावनिक पातळीवरही जिव्हाळा फार महत्त्वाचा असतो. सामाजिक बांधिलकी त्यातून जपली जाते आणि दुसऱ्यांनाही अशी बांधिलकी जपण्याची प्रेरणा दिली जाते, म्हणून माजी विद्यार्थ्यांचे मोल पुढेही कायम राहीलच.

आमच्याकडे माजी विद्यार्थ्यांची नोंदणीकृत संस्था आहे. वर्षांतून दोनदा बैठका घेत असतो. आमच्या महाविद्यालयातील कित्येक विद्यार्थी आम्हाला आर्थिक मदत करतात किंवा एखाद्या कार्यक्रमाचे प्रायोजकत्व स्वीकारतात. संस्थेला आणि पर्यायाने विद्यार्थ्यांच्या पुढील पिढीला त्याचे फायदे होत राहतात. संस्था, महाविद्यालय चांगले असेल तर माजी विद्यार्थी शेवटपर्यंत संबंध ठेवतात. माजी विद्यार्थ्यांचे संस्थेशी असलेले संबंध नॅकद्वारे मोजले जातात. तो एक निकष त्यांनी ठेवलेला आहेच. माजी विद्यार्थी भेटतात तेव्हा आमच्या सारख्यांनाही भरून येते. डॉ. श्रीराम भुस्कुटे, भवभुती महाविद्यालय, आमगाव

 

ज्योती तिरपुडे

jyoti.tirpude@expressindia.com

 

मराठीतील सर्व कॅम्पसकट्टा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi articles on college student
First published on: 08-07-2017 at 02:23 IST